STATE LAW AND ORDER

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सावधगिरी बाळगावी : गृहमंत्री 

 

मुंबई (महासंवाद) आगामी सण उत्सव काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सुसज्ज राहून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवावा. या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांनी योग्य ती सावधगिरी बाळगावी, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, इस्टर संडे या सर्व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव आनंद लिमये,मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, इस्टर संडे आणि रमजान हे सर्व सण – उत्सव शातंतेत आणि सुव्यवस्थेत पार पडावेत यासाठी पोलिसांनी विविध घटकांशी सुसंवाद वाढवावा. त्यांच्या बैठका घेऊन सर्व सुचनांचे पालन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सांगण्यात यावे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत.
आगामी सण, उत्सव कालावधीत काही अनिष्ट घटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्यावर जरब बसविण्यात यावी.
अतिशय संवेदनशील असलेल्या विभागामध्ये विशेष खबरदारी घेण्यात यावी. पुरेसा बंदोबस्त तैनात ठेवावा तसेच काटेकोर नियोजन करावे, असे निर्देशही श्री वळसे पाटील यांनी यावेळी दिले.
सोशल मीडियावर देखील विशेष लक्ष ठेवण्यात यावे. आक्षेपार्ह पोस्ट, संदेश प्रसारित करणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच अनुचित प्रकार करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
जनतेने पोलिसांना सहकार्य करावे. अफवा अथवा चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. तसेच सामाजिक शांतता धोक्यात येणारी वक्तव्ये कुणीही करू नयेत, असे आवाहन श्री. वळसे पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य पोलीस आणि मुंबई पोलीस यांनी केलेल्या पोलीस तयारीचा अहवाल सादर केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *