नाशिक

भटक्या कुत्र्यांना जेवण दिल्याच्या वादातून महिला डॉक्टरच्या घरावर दगडफेक

पंचवटी : प्रतिनिधी
भटक्या कुत्र्यांना जेवण दिल्याच्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट एका महिला डॉक्टरच्या घरावर जीवघेणी दगडफेक करण्यात झाल्याची धक्कादायक घटना मखमलाबाद परिसरातील रामकृष्णनगर, शांतीनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात घराच्या गॅलरीच्या काचा फुटल्या असून, लोखंडी गेटचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हल्ल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. स्वप्नाली गणेशराव देशमुख (33, रा. अभंग बंगलो, रामकृष्णनगर, शांतीनगर, मखमलाबाद) यांनी यासंदर्भात म्हसरूळ पोलिसांत तक्रार दिली आहे. डॉ. स्वप्नाली या मुंबईतील लुपीन हेल्थकेअर येथे कार्यरत असून, सध्या घरूनच (वर्क फ्रॉम होम) काम करतात. त्या त्यांच्या आई संगीता देशमुख आणि लहान मुलगी क्षितिजा यांच्यासह येथे राहतात. डॉ. स्वप्नाली यांच्या घरापासून दोन घरे सोडून राहणारे शेजारी सोमनाथ बाळासाहेब रायकर यांच्याशी काही दिवसांपूर्वी घराबाहेर भटक्या कुत्र्यांना जेवण देण्यावरून वाद झाला होता. याप्रकरणी डॉ. स्वप्नाली यांनी आधीच म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात धरून रायकर कुटुंबीयांकडून त्यांना सतत त्रास दिला जात होता. “तुम्हाला जर येथे राहायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील,” अशी धमकी देऊन संशयितांनी त्यांना यापूर्वी जीवे मारण्याचीही धमकी दिली होती.
परिसरात दहशत निर्माण करणार्‍या या संपूर्ण गुंडगिरीचा थरार डॉ. देशमुख यांच्या बंगल्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्टपणे कैद झाला आहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून, बेकायदेशीर जमाव जमवून घरावर हल्ला करणार्‍या सोमनाथ रायकर यांचा मुलगा, पत्नी आणि इतर चार अनोळखी साथीदारांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

रात्रीच्या सुमारास टोळक्याचा हल्ला

21 मे रोजी रात्री 08.54 वाजेच्या सुमारास डॉ. स्वप्नाली, त्यांची आई आणि मुलगी घरात असताना अचानक सोमनाथ रायकर यांचा मुलगा, पत्नी आणि त्यांच्यासोबत इतर चार अनोळखी तरुण बंगल्याबाहेर आले. या टोळक्याने रात्रीच्या शांततेत अचानक डॉ. स्वप्नाली यांच्या घराच्या दिशेने आरडाओरड करत अत्यंत हिंसक भाषेत शिवीगाळ सुरू केली. काही समजण्याच्या आतच या संशयितांनी बंगल्यावर जोरदार दगडफेक सुरू केली. या बेछूट दगडफेकीत डॉ. देशमुख यांच्या घराच्या गॅलरीला लावलेल्या महागड्या काचा फुटून आणि तडकून मोठे नुकसान झाले. तसेच मुख्य लोखंडी गेटवरही मोठे दगड आदळल्याने गेटचे नुकसान झाले आहे. घरात केवळ महिला आणि लहान मुलगी असल्याने या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशमुख कुटुंबीय प्रचंड घाबरून गेले. डॉ. स्वप्नाली यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून पोलीस हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि रात्रीच संशयितांना पोलीस ठाण्यात पाचारण केले.

Stones pelted at female doctor’s house over dispute over feeding stray dogs

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago