राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

मुंबई :
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची काल निवड झाली. सुनेत्रा पवार यांच्या नावाला एकमताने अनुमोदन दिले. त्यांच्या निवडीची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वरळी येथील ‘एनएससीआय’ डोम येथे पार पडलेल्या या बैठकीत राज्य आणि केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावाला मंजुरी दिली. अध्यक्षपदासाठी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचीही नावे चर्चेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. त्यातच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका मुलाखतीत पटेल यांचा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. टीका वाढल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर येत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस त्यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करून चर्चेला
पूर्णविराम दिला.

महाराष्ट्रात सुनेत्रा पर्व सुरू : तटकरे

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले, जेव्हा अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा राजधर्म आणि धर्मशास्त्राचं पालन करत आम्ही अजितदादांच्या पाठीशी उभे राहिलो. आज अजितदादा गेल्यानंतर 40 वर्षे त्यांची सावलीसारखी साथ देणार्‍या सुनेत्रा पवारांच्या मागे उभं राहणं, हाच आमचा राजधर्म आहे. आम्ही टीकेचे धनी झालो तरीही आम्ही सुनेत्रा पवारांच्यासोबत उभे राहणार आहोत. सुनेत्रा पर्व आजपासून या महाराष्ट्रात सुरू झालं आहे.

Sunetra Pawar appointed as National President of NCP

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *