नाशिकच्या आकाशात सूर्यकिरण विमाने साकारणार तिरंगा

उद्यापासून दोन दिवस विमानांचा थरार; नाशिकची सून करणार शोचे धावते वर्णन

नाशिक : प्रतिनिधी
भारतीय वायुदल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून गंगापूर धरण परिसरात 22 व 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी बारा या कालावधीत होणार्‍या एरोबॅटिक शोमध्ये सूर्यकिरण लढाऊ विमाने तिरंगा साकारणार आहेत. या शोची जय्यत तयारी पूर्णत्वास आली आहे. नाशिकची सून असलेल्या फ्लाइट लेफ्टनंट आणि सूर्यकिरण टीमच्या जनसंपर्क अधिकारी कवल संधू या शोचे धावते वर्णन करणार आहेत.
सूर्यकिरण एरोबॅटिक शोची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वरील माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भारतीय वायुदलाचे स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल, संदीप दयाळ, फ्लाइट लेफ्ट. कवल संधू, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, संरक्षण दलाच्या सदर्न कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते.
सूर्यकिरण टीम 1996 मध्ये स्थापन झाली आहे. या टीमने देश-विदेशात झालेल्या 750 पेक्षा एरोबॅटिक शोमध्ये सहभाग नोंदविला आहे.
आशिया खंडातील ही सर्वोत्तम टीम मानली जाते. या टीममध्ये लढाऊ वैमानिक, अभियंता, कुशल तंत्रज्ञ यांच्यासह दीडशे जणांचा समावेश आहे. सूर्यकिरण शो च्या प्रात्यक्षिकांसाठी हॉक एमके 132 या स्वदेशी प्रशिक्षणार्थी विमानांचा वापर केला जाणार आहे. या विमानांचा 2015 मध्ये समावेश करण्यात आला आहे. ही विमाने वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवीत असताना त्यातून केशरी, पांढरा आणि हिरवा रंग म्हणजे तिरंगा रंग सोडला जातो. त्यासाठी या विमानात केलेल्या तांत्रिक सुधारणाही नाशिक येथेच करण्यात आल्या आहेत. सूर्यकिरण टीममध्ये स्कॉड्रन लीडर गौरव पटेल यांच्यासह ग्रुप कॅप्टप अजय दशरथी, डेप्युटी लीडर ग्रुप कॅप्टन सिद्धेश कार्तिक, स्क्वॉड्रन लीडर जसदीप सिंह, संजेश सिंह, राहुल सिंह, अंकित वसिष्ठ, दिवाकर शर्मा, एडवर्ड प्रिन्स, ललित वर्मा, विंग कमांडर राजेश काजला, विंग कमांडर तेजेश्वर सिंह यांचा, तर तांत्रिक टीमध्ये विंग कमांडर अभिमन्यू त्याग, स्कॉड्रन लीडर संदीप दयाळ, फ्लाइट लेफ्ट. मनील शर्मा यांचा समावेश आहे. सूर्यकिरण विमाने प्रात्यक्षिक सादर करताना त्यांच्यात किमान पाच मीटर अंतर राहील. ते गंगापूर धरणावर वेगवेगळी प्रात्यक्षिक सादर करतील. त्यासाठी सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली आहे. सूर्यकिरण टीममधील विमाने बुधवारी (दि. 21) रोजी सकाळी 9 वाजेदरम्याननाशिक शहरात दाखल होतील. फ्लाइट लेफ्ट. असलेल्या कवल संधू यांचे सासर नाशिक असून ते या एरोबॅटिक शोचे संपूर्ण धावते वर्णन करणार आहेत. नाशिककर नागरिकांनी एरोबॅटिक शोचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्यासह स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल, संदीप दयाळ यांच्यासह जिल्हा प्रशासनाने केले आहे.

एरोबॅटिक शोमुळे नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तरुणांना देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. या बरोबरच नाशिकचे पर्यटन वाढणार आहे. नागरिकांनी या शोचा निश्चित लाभ घेऊन भारतीय हवाई दलाच्या थरारक कसरती प्रत्यक्ष पाहाव्यात.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

‘सदैव सर्वोत्तम’ हे सूर्यकिरण टीमचे बोधवाक्य आहे. त्यानुसार 22 व 23 जानेवारी 2026 रोजी गंगापूर धरण परिसरात सर्वोत्तम एरोबॅटिक शोचे प्रदर्शन करण्यात येईल.
– कवल संधू, फ्लाइट लेफ्टनंट तथा जनसंपर्क अधिकारी, सूर्यकिरण टीम.

Suryakiran planes will create the tricolor in the sky of Nashik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *