तापमानाचा पारा 5.4 अंशांवर
निफाड : तालुका प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात थंडीचा मुक्काम वाढला असतानाच शुक्रवार (दि. 19) निफाड कृषी संशोधन केंद्रावर 5.4 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. अवघा तालुका गारठला आहे. थंडीची वाढती तीव्रता बघता पुढील काही दिवस या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा गत दोन महिन्यांपासून तापमान सरासरी सहा अंशांवर स्थिरावले असून, आता तापमान त्यापेक्षाही कमी झाले आहे. दररोज सकाळ सायंकाळ नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. उत्तरेकडून येणार्या वार्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. पुढील पंधरा दिवस थंडीचा माहोल कायम राहील, असा अंदाज आहे.
वाढती थंडी गहू, हरभरा, कांदा पिकासाठी पोषक ठरत आहे. द्राक्षबागेसाठी मात्र हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. थंडीपासून बचावासाठी तरुणाई सायंकाळी शेकोटीची आधार घेऊ लागली आहे. साहजिकच मागील आठवडाभराचा कालावधी पाहिला, तर तापमानाचा पारा झपाट्याने खाली येत असल्याचे दिसत आहे.
यंदा परतीच्या दीर्घकाळ लांबलेल्या पावसाने हातात
आलेली खरिपासह रब्बी हंगामातील पिके वाया गेली. आता पावसाळा संपल्याने निदान फळबागा आणि भाजीपाला पिके व्यवस्थित येतील, अशी अपेक्षा होती. मात्र आताची थंडी बघता यात आणखी वाढ झाली, तर दवबिंदू गोठणे, द्राक्षमण्यांना तडे जाणे, पाने करपणे याबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
– सोपान खालकर, शेतकरी, भेंडाळी
The lowest temperature recorded at the Naphad Agricultural Research Station was 5.4 degrees Celsius.