देवळा : प्रतिनिधी
तालुक्यातील वासोळ येथे विक्रीसाठी आणलेल्या तलवारी हस्तगत करण्यास नाशिक ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून यासंबंधी दोन संशयितांना अटक करण्यात आली तर ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार दिनांक ०६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशाने सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, नाना शिरोळे, नामदेव खैरनार, भगवान निकम, हेमंत गिलबिले , प्रदीप बहिरम आदी देवळा पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असतांना प्राप्त गुप्त बातमीच्या अनुषंगाने वासोळ गावातील मराठी शाळेचे समोर वासोळ – मेशी रस्त्यावर सायंकाळी पाच वाजता मोटारसायकल क्रमांक एम एच. ४१ क्यू ७५७१ वरून चालक निलेश नथूसिंग गिरासे, वय २१ वर्ष व मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेला परवेज शौकत शेख, वय ४० वर्ष दोघे रा. वासोळ, ता. देवळा, जिल्हा नाशिक हे त्यांचेजवळ लोखंडी तलवार विक्रीच्या उददेशाने बाळगतांना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच त्यांच्याजवळ रक्कम रुपये ५८, ८०० किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर पोलिस हवालदार भगवान निकम यांच्या फिर्यादीवरून निलेश गिरासे व परवेझ शेख तसेच त्यांना हत्यार पुरवणारा अज्ञात व्यक्तीवर देवळा पोलिसात हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरिक्षक मयूर भामरे यांनी दिली