शिवाजीवाडी येथील युवकाच्या मृत्यूनंतर परिसरात तणाव; दवाखान्यात रात्री उशिरापर्यंत जमाव
जुने नाशिक : वार्ताहर
वडाळा रोडवरील शिवाजी वाडी येथे काल (दि.१०) रात्री घाबरून पळ काढत असताना जमिनीवर कोसळून एक युवक गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याला बेशुद्धावस्थेत दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेनंतर वडाळा रोडवरील एका खाजगी रुग्णालयाच्या आवारात रात्री उशिरापर्यंत शेकडोंचा जमाव जमला होता. तसेच मोठी गर्दी उसळली होती. यावेळी मुंबई नाका पोलीस ठाणे व भद्रकाली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौज फाटा परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. या घटनेत रवींद्र मारुती भांगरे (२५) हा युवक मृत पावला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान शिवाजी वाडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती काही बघ्यांनी दिली आहे.