ठाकरे गटाचा वन विभागाला निर्वाणीचा इशारा, मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ठिय्या
नाशिक / नाशिकरोड : वि.प्र
वडनेर दुमाला येथे तीनवर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर या दहशतीतून नागरिक बाहेर येत नाही तोच पुन्हा आर्टिलरी सेंटर येथे दोन वर्षांच्या आयुष भगत या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पुन्हा तीन दिवसांपूर्वी वडनेर दुमाला शिवारातील आर्टिलरी सेंटरच्या आतमध्ये बिबट्याने दोन वर्षांच्या श्रुतीक गंगाधरवर केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. बिबट्याकडून एकामागोमाग हल्ले होत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.25) नागरिकांनी वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडक देत ठिय्या दिला. बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पाऊले उचलून बिबट्याला थेट शूट करण्याची मागणी मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांच्याकडे केली. तसेच आमच्या संयमाचा अंत आता पाहू नका, असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला.
यावेळी माजी नगरसेविका सुनीता कोठुळे, मनोहर बोराडे, योगेश गाडेकर, जयंत गाडेकर, भैया मणियार, सुधाकर जाधव, अमित जाधव, बंटी कोरडे, संजय हंडोरे, समाधान कोठुळे, अमोल अल्हाट, माधुरी ओहळ, उत्तम जाधव आदी उपस्थित होते. मुख्य वनसंरक्षकांना बिबट्याची प्रतिकृती भेट देत संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने म्हटले की, बिबट्यामुळे लहान मुलांचा बळी जातोय, परिसत दोन घटना घडल्या असून, सिन्नर येथे एक घटना घडली आहे. या प्रकरणी काय निर्णय घेताय याचे उत्तर द्या? आयुष भगतच्या घटनेनंतर मोर्चा काढल्यानंतर बिबट्या पकडला गेला.
पुन्हा त्यानंतर बिबटे पकडण्यासाठी पाऊले का उचलली नाहीत? तुमच्याकडे पिंजरा नसेल तर आम्ही स्वतः पिंजरे बनवतो आणि लावतो. वन अधिकारी लवकर जागेवर येत नाहीत. आम्हाला वाट बघावी लागते, याचे उत्तर कोण देईल? या भागात शेतकरीवर्ग असून, लोक शेतात जायला घाबरत आहेत. शेतकर्यांनी शेती केली नाही तर पोट कसे भरणार ? याचं उत्तर कोण देईल? याप्रकरणी चार दिवसांच्या आत कारवाही करा, आमचा अंत बघू नका, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. शाईद शेख, अन्सार शेख, दत्तात्रय पाळदे, वाळू पोरजे, अरुण गडकर, बाळू बोराडे, त्र्यंबक पोरजे, संजय गायकर, संजय पोरजे, नितीन हंडोर, राजू पवार, देवळालीगाव, विहितगाव, वडनेर दुमाला, पिंपळगाव, दाढेगाव, पाथर्डी गाव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
बिबट्याच्या दहश्तीमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. बिबट्याऐवजी नागरिकांना बंदिस्त होण्याची वेळ आहे. बिबट्यांचा संचार वाढतच चालला असून, वन विभागाने हातावर हात न ठेवता पिंजर्यांची संख्या वाढवून नागरिकांमधील दहशत कमी करण्यासाठी बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा; अन्यथा आम्ही आक्रोश केल्यास त्यास वनविभाग जबाबदार असेल.
-केशव पोरजे, उपजिल्हाप्रमुख, ठाकरे गट
बिबट्याला ठार करण्याची तातडीने परवानगी द्या
वन्यजीव विभागाचे शासनाला पत्र
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांत निष्पाप बालकावर हल्ला करून त्यांना ठार मारणार्या बिबट्याविरुद्ध आता वनविभाग अॅक्शन मोडवर आला असून, याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता बिबट्याला ठार मारण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे.
यासंदर्भात उपवन संरक्षण विभागाचे अध्यक्ष सिद्धेश सावर्डेकर, सहायक वनरक्षक प्रशांत खैरनार, मानद वन्यजीवरक्षक वैभव भोगले, एनटीसीए प्रतिनिधी अभिजित महाले, वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ आदींनी स्वाक्षर्या करून राज्य शासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, वडनेर भागात दोन लहान बालकांचा बळी घेणार्या बिबट्याला पिंजर्यात जेरबंद, बेशुद्ध करून पकडणे अथवा दोन्ही पर्याय शक्य नसल्यास बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्या. तसेच पत्रात म्हटले आहे की, पश्चिम नाशिक वन विभागांतर्गत नाशिक वनपरिक्षेत्रातील मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबट्या या वन्यप्राण्यास अटकाव करण्यासाठी मानव-वन्यजीव संघर्ष समितीची बुधवारी (दि.24) आढावा बैठक घेण्यात आली. वडनेर दुमाला या भागात राहणार्या दोनवर्षीय श्रुतीक गंगाधर या लहान बालकाला घरच्या अंगणातून बिबट्याने उचलून नेले होते. दुसर्या दिवशी लष्करी जंगलात त्याचा मृतदेह मिळून आला होता. वडनेर दुमाला आर्टिलरी सेंटर आजूबाजूला दाट झाडी असून, बिबट्याला येण्या-जाण्यासाठी मार्ग तसेच मुबलक प्रमाणात लपण्याकरिता जागा उपलब्ध आहे. घटना घराच्या आवारात घडली असून, लहान मुलांवर हल्ला होणे प्राण्यांचे अस्वाभाविक वर्तन दर्शवते. बिबट्या या वन्यप्राण्याने हल्ला केल्याची घटना मुलाला राहत्या घरातून वडिलांसमक्ष घेऊन गेल्यामुळे भविष्यात अशा प्रकारे बिबट्या प्राणी घराच्या आत घुसून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनेला कारणीभूत असलेला बिबट्या सदर क्षेत्रामध्ये आढळून आला असून, अशा परिस्थितीत पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये. नागरिकांचा रोष वाढू नये याकरिता ठोस उपाययोजना व्हावी. ही परिस्थिती पाहता बिबट्या हा मानवी जीवितास धोकादायक झाला आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…