राज ठाकरे : नीट पेपरफुटीला खासगी क्लासेस जबाबदार
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाच बळी आतापर्यंत गेले आहेत. मात्र, प्रशासनाला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. प्रशासन ढिम्म आहे. जंतर-मंतरवरील आंदोलन ही केवळ सुरुवात आहे. यापुढील काळात तरुणाईचा संताप अधिक वाढेल. नाशिकमध्ये मनसेच्या काळात सिंहस्थाची कामे उत्तम झाली होती. सध्या फक्त गुजरातचे ठेकेदार मोठे करण्यासाठी कामे सुरू आहेत. महाराष्ट्रात ठेकेदार नाहीत का? खासगी क्लासेसमुळे पेपर फुटले जात असल्याचा आरोप करत क्लासेस आणि महाविद्यालये यांची मिलीभगत आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर प्रहार केला.
नाशिकच्या दोन दिवसीय दौर्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी काल सकाळी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाढलेले खड्डे, वृक्षतोड, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि कुंभमेळ्याच्या कामांवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे म्हणाले की, 2003 आणि 2015 या दोन्ही कुंभमेळ्यांचा अनुभव आपल्या समोर असून, 2015 मध्ये विकासकामे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झाली होती. त्या वेळी कामे सुरू असतानाही नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही. मात्र, सध्याच्या कुंभमेळ्याच्या तयारीत संपूर्ण शहर खड्ड्यांनी व्यापले असून, अपघातात नागरिकांचे बळी जात असतानाही प्रशासनाला त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचा आरोप त्यांनी केला.
कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना आणण्यात आल्याचा दावा करत, महाराष्ट्रात कंत्राटदार नाहीत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कामांपेक्षा कमिशनलाच प्राधान्य दिले जात असल्याची टीका करत, सध्याच्या कामकाजातून भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचेही ते म्हणाले.
स्मार्ट सिटी योजनेवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. स्मार्ट सिटीची घोषणा झाली, पण ती नेमकी कुठे गेली? नाशिकला स्मार्ट सिटीचे नेमके काय मिळाले? पूर्वी उभारण्यात आलेल्या बॉटनिकल गार्डन आणि बाळासाहेब ठाकरे संग्रहालयासारख्या प्रकल्पांचीही दुर्दशा झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेनंतर अनेकांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सुदाम कोंबडे, नगरसेविका मयुरी पवार तसेच शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
..तर आता भोगा
देशाच्या कुठल्याही शहरात तुम्हाला काही दिसत नाही. सगळी शहरं बरबाद होत आहेत. ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत, त्या फ्रॉड पद्धतीने हाताळल्या जात आहेत, हे लोकांनादेखील माहिती आहे. परंतु, जे मतदान करत आहेत, त्यांनीदेखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे. नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहेत. त्यावर इतकी आंदोलनं झाली, पण काही नाही, प्रशासन ढिम्म आहे. हे सगळं चालू असताना ज्यावेळी निवडणुका झाल्या, तेव्हा लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा, अजून काय बोलू शकतो मी, असे राज ठाकरे म्हणाले.
नाशिकच्या यश गोसावीचा प्रशासनाला विसर
विद्यार्थ्यांच्या नैराश्यावर आणि आत्महत्येवर बोलताना राज ठाकरे आक्रमक झाले. माझ्याकडे काही विद्यार्थी आले होते, त्यांच्या डोळ्यात प्रचंड भीती आणि निराशा होती. साहेब, परत ‘नीट’चा पेपर नाही ना फुटणार? असा प्रश्न जेव्हा विद्यार्थी विचारतात तेव्हा खूप वाईट वाटतं. नाशिकमधील यश गोसावी या विद्यार्थ्याने ‘नीट’चा पेपर फुटल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली. काल त्याचे नातेवाईक मला भेटले. आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांची यादी प्रशासनाकडून येते, पण त्या यादीत या नाशिकच्या यश गोसावीचे 22 वे नाव जोडायला या सरकारला आणि प्रशासनाला वेळ नाही
शिक्षणातील व्यापारीकरणावर हल्लाबोल
शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यापारीकरणावरही जोरदार टीका केली. महाविद्यालयांपेक्षा कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवत असल्याची खंत व्यक्त करत, महाविद्यालये आणि क्लासेस यांच्यातील कथित संगनमतावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दिलीप गावितांची भेट न झाल्याबद्दल दिलगिरी
नाशिक दौर्यात पॅरा धावपटू दिलीप गावित यांची भेट न झाल्याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली. दिलीप गावित मला भेटण्यासाठी आले होते, याची मला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मला सांगितले असते तर मी त्यांना निश्चित भेटलो असतो. त्यांच्या मनात गैरसमज झाला आणि ते नाराज झाले, याबद्दल मला खेद आहे. ते दिल्लीहून परतल्यानंतर मी स्वतः त्यांची भेट घेईन, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
The administration remains unmoved despite the loss of citizens’ lives!