नाशिक

बहुजन समाजाचा दीपस्तंभ : अ‍ॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे

शिक्षण व विधी क्षेत्रात स्वकर्तृत्व, सेवाभाव आणि ध्येयवाद यांच्या बळावर ज्यांनी आपले मोठेपण सिद्ध केले, ज्यांनी आपल्या जीवनात सेवा, शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता, बांधिलकी, मानवता, न्याय इत्यादी जीवनमूल्यांना कायम प्राधान्यक्रम दिला, असे समाजसेवी व्यक्तिमत्त्व अर्थात, कर्मवीर अ‍ॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे ऊर्फ दादासाहेब. दादासाहेबांची आज (दि. 12 मार्च) शंभरावी जयंती. त्यानिमित्त…

प्रखर बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा आणि प्रगाढ व्यासंगाच्या बळावर त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देवळाली येथील झोरास्ट्रियन बोर्डिंग हायस्कूलमधून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी नाशिकमधील एचपीटी कॉलेजातून बी.ए., पुण्यातील लॉ कॉलेजातून एलएल.बी. आणि मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम. ए. पदवी प्राप्त केली. ज्ञान आणि कर्माची सांगड घालून आपला आणि भोवतालच्या समाजाचा विकास केला पाहिजे, हे त्यांनी मनात पक्के केले आणि पदवीनंतर नाशिकमध्ये वकिली व्यवसायाला प्रारंभ केला. ज्येष्ठ विधिज्ञ कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले. थोर शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर रामन यांनी म्हटल्याप्रमाणे देशसेवा करण्यासाठी लोकनेता होणे अपरिहार्य नाही. साहित्य, विज्ञान, कायदा, शेती अशा कोणत्याही माध्यमातून देशसेवा घडू शकते. तद्वत दादासाहेब गोरगरीब व नाडलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलीपेशाकडे वळले असावेत.
कायद्याचे सखोल ज्ञान घेतलेल्या दादासाहेबांना कृषिजीवन आणि ग्रामीण सामाजिक वास्तव यांची पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे सामाजिक बांधिलकी, न्याय आणि सेवा यांना प्राधान्य देत त्यांनी वकिलीचा कधीही धंदा होऊ दिला नाही. ते करारी बाण्याचे आणि पुरोगामी विचारांचे होते. त्यांची वकिली व्यवसायावर खूप निष्ठा होती. व्यासंग आणि कठोर मेहनत या गुणांमुळे एक ’निष्णात कायदेपंडित’ अशी सर्वदूर त्यांची ख्याती झाली होती. व्यक्तित्व विकास नसणार्‍या माणसाकडून समाजपरिवर्तनाचे काम होऊ शकत नाही. हे ते जाणून होते. त्यांनी शिक्षण आणि न्याय या क्षेत्रांत काम करताना तत्त्वांशी तडजोड न करता सेवा, सत्यनिष्ठा आणि कार्यतत्परता या बाबी महत्त्वाच्या मानल्या. ते नाशिक जिल्ह्याचे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून कार्यरत होते. त्यांनी नाशिक बार असोसिएशनचे 25 वर्षे अध्यक्षपद सांभाळून या क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात वकिलांसाठी चेंबर्सची उभारणी केली. तसेच नाशिक जिल्हा अ‍ॅडव्होकेट मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. नाशिक महानगरपालिकेमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. सामाजिक सेवा देताना कर्मवीरांच्या कार्याचा वसा आणि वारसा त्यांनी कायम जपला. प्रपंचासाठी वकिली व्यवसाय सांभाळत त्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विकासासाठी अखंड यज्ञ केला. त्यांना प्रसिद्धीचे वावडे होते. ते कर्तव्यकठोर होते. शिक्षणसंस्था ही एकमेकांच्या गाठीभेटीची जागा किंवा विरंगुळ्याचे ठिकाण नाही, तर समाजकार्याची पाठशाळा आहे, अशी त्यांची मनोभूमिका होती. संस्थेच्या प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गास त्यांची आदरयुक्त भीती होती. कुठलाही भेदाभेद अमंगळ मानून त्यांनी गोरगरीब परिवारातील शिक्षित तरुण-तरुणींना संस्थेत नोकर्‍या दिल्या. त्यात त्यांचा पूर्णतः निरपेक्षभाव असायचा. त्यांनी मविप्र समाजचे सरचिटणीस व अध्यक्ष या पदांवर दीर्घकाळ काम करून या पदांना पुरेपूर न्याय दिला.
तत्त्वनिष्ठ विचारांच्या साहेबांनी संस्थेचा गुणात्मक विकास, दर्जेदार शिक्षण आणि शाखाविस्ताराला नेहमी अग्रक्रम दिला. त्यामुळे बहुजन समाजासाठी शिक्षणाचे जाळे खेड्यापाड्यांपर्यंत विणले गेले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या 73 माध्यमिक शाळा व आठ महाविद्यालये सुरू झाली. त्यात एका ट्रेनिंग कॉलेजचाही समावेश असल्याने माध्यमिक शाळांसाठी प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध होऊ लागले.
संस्थेसाठी सरकारी अनुदानावर पूर्णपणे विसंबून न राहता अनेक दानशूरांकडून त्यांनी निधी जमवला. स्वतःच्या सत्कारावेळी मिळालेली पाच लाख रुपयांची थैली संस्थेसाठी निधी म्हणून जमा केली. नाशिक जिल्हा छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे ते अध्यक्ष या नात्याने छत्रपती शिवराय त्रिशताब्दी समिती स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ भव्य पुतळा त्यांच्या कार्याची साक्ष देत आहे. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या विधीसभा, एक्झिक्युटिव्ह कौन्सिल व इतर अनेक मंडळांवर यशस्वीपणे काम केलेले होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकलाच व्हावे, यासाठी भोळे आयोगासमोर त्यांनी अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला.
राजसत्तेतील प्रतिष्ठेची पदे त्यांना खुणावत असताना त्यांनी शिक्षणप्रसार हेच आपले कार्यक्षेत्र निवडले. गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शैक्षणिक सवलती व तत्सम फायदे मिळवून देण्यात ते कायम पुढाकार घेत राहिले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना संस्थेने संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात व 78 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सन्मानपूर्वक गौरविले. नाशिक गौरव मानांकित दादासाहेबांची शिक्षणतज्ज्ञ, कडक प्रशासक, परखड विधिज्ञ, निष्काम कर्मयोगी अशी प्रतिमा जनतेच्या मनावर कायम कोरलेली आहे. आज (दि. 12 मार्च) त्यांची जयंती. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

The beacon of Bahujan Samaj: Adv. Baburao Ganpatrao Thackeray

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago