गोड साखरेच्या दरवाढीची कडू चव

साखर ही रोजच्या स्वयंपाकघरातील अगदी सामान्य वस्तू. चहाचा कप असो, घरातील गोड पदार्थ असोत किंवा सणासुदीची मिठाई-साखरेशिवाय अनेक गोष्टींची चव अपुरी वाटते. त्यामुळे साखरेच्या दरात झालेली वाढ ही केवळ एका वस्तूच्या किमतीत झालेली वाढ म्हणून पाहता येणार नाही. तिचे पडसाद थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर उमटतात. सध्या साखरेच्या दरवाढीमुळे चहा, मिठाई, शीतपेयांसह अनेक खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खरेच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांत झालेली वाढ विशेष चिंताजनक आहे. काही बाजारपेठांमध्ये साखरेचा दर 75 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे, तर किरकोळ बाजारातही ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारातील या चढ-उताराचा थेट परिणाम घरगुती अर्थसंकल्पावर होणार आहे. आधीच अन्नधान्य, खाद्यतेल, डाळी, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींनी सामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडवले आहे. त्यात साखरेची भर पडणे म्हणजे महिन्याच्या खर्चावर आणखी एक भार.
साखरेची किंमत वाढली की, केवळ घरातील चहाचा खर्च वाढत नाही. चहाच्या टपर्‍या, हॉटेल, उपाहारगृहे, बेकरी, मिठाईची दुकाने आणि शीतपेय उत्पादक यांच्यावरही त्याचा परिणाम होतो. साखर ही अनेक उत्पादनांमधील महत्त्वाची कच्ची सामग्री असल्याने तिच्या किमतीत वाढ झाली की, उत्पादकांकडे दोनच पर्याय उरतात-नफा कमी करणे किंवा उत्पादनाची किंमत वाढवणे. प्रत्यक्षात दुसरा पर्याय स्वीकारला जाण्याची शक्यता अधिक असते. परिणामी अंतिम ग्राहकाच्या खिशातूनच अतिरिक्त पैसा बाहेर जातो.
मिठाई उद्योगासाठी तर साखरेची दरवाढ अधिक गंभीर आहे. सण, लग्नसमारंभ आणि विविध कौटुंबिक कार्यक्रमांत मिठाईला मोठी मागणी असते. अशा काळात साखरेच्या किमती वाढल्यास मिठाईचे दर वाढणे स्वाभाविक आहे.
त्याचा परिणाम ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर होतो. पूर्वी ज्या पैशांत एखादे कुटुंब किलोभर मिठाई घेत असे, त्याच पैशांत आता कमी प्रमाणात खरेदी करावी लागू शकते. त्यामुळे साखरेची दरवाढ ही हळूहळू संपूर्ण बाजारपेठेत महागाईची साखळी निर्माण करू शकते.
यामागे मागणी आणि पुरवठ्याचे गणितही महत्त्वाचे आहे. साखरेचे उत्पादन, साठा, निर्यात, इथेनॉल निर्मितीकडे वळवला जाणारा ऊस आणि बाजारातील उपलब्धता या सर्व घटकांचा दरावर परिणाम होतो. सरकारने या परिस्थितीकडे केवळ ग्राहकांच्या दृष्टीने नव्हे, तर ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योग या दोन्ही बाजूंनी संतुलितपणे पाहण्याची गरज आहे.
शेतकर्‍याला उत्पादनासाठी वाढता खर्च सहन करावा लागतो. खत, औषधे, मजुरी, वीज, पाणी आणि वाहतूक या सर्व खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे उसाला योग्य दर मिळणे आवश्यक आहे. मात्र, त्याच वेळी ग्राहकाला साखर परवडणार्‍या किमतीत मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील हे संतुलन बिघडू नये, यासाठी शासनाने दीर्घकालीन धोरण आखणे गरजेचे आहे.
साखरेच्या दरवाढीचा सर्वांत मोठा फटका मात्र मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना बसतो. उत्पन्न वाढण्याचा वेग कमी आणि खर्च वाढण्याचा वेग अधिक असेल, तर घरगुती बजेट कोलमडते. म्हणूनच साखरेच्या किमतीवर नियंत्रण ठेवताना कृत्रिम हस्तक्षेप करण्याऐवजी उत्पादन, साठवणूक, वितरण आणि बाजारातील पारदर्शकता यावर भर देणे आवश्यक आहे.
साखर गोड असली तरी तिच्या वाढत्या किमतीची चव मात्र सर्वसामान्यांसाठी कडू ठरत आहे. चहाच्या कपापासून मिठाईच्या ताटापर्यंत आणि शीतपेयांच्या बाटलीपासून उद्योगांच्या उत्पादन खर्चापर्यंत या दरवाढीचे पडसाद उमटणार असतील, तर सरकारने वेळीच परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेऊन ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे. महागाईचा भार सतत सामान्यांच्या खांद्यावर टाकणे हा कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या आरोग्यासाठी चांगला संकेत नाही.

The bitter taste of sweet sugar price hike

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *