हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

– विष्णू वाघ

नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी पद्धत फारसी नव्हती पण जाहिरातीच्या युगात ती सुरू झाली त्यातला एक रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा सृष्टीचा, समृद्धीचा, नवचैतन्याचा अन् निसर्गाच्या सृजनशक्तीचा आहे. नवरात्रीतील हिरवा रंग म्हणजे नव्या आशांचा, दिव्यत्वाचा आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा आहे. जशी हिरवीगार पालवी झाडांना नवे जीवन देते, तशीच नवरात्रातील हिरवी रंगछटा मनात उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकतेची पेरणी करते.
निसर्गाच्या कुशीत फुललेली हिरवाई म्हणजे अवनीचे खरे सौंदर्य आहे. झाडे, वेली, पाने, रानफुले आणि डोंगरदर्‍यांतील हिरवळ आपल्याला जीवनात सुंदर संदेश देतात. नवरात्रीच्या या मंगल पर्वात हिरव्या रंगाचा सन्मान करताना निसर्गाचेही रक्षण करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. देवीच्या भक्तीसोबत निसर्गाचीही सेवा केली गेली पाहिजे. हिरवाई जपली पाहिजे, पर्यावरण समृद्ध केले गेले पाहिजे. नवरात्रोत्सवात अनेक ठिकाणी हरिनाम सप्ताहदेखील सुरू आहेत. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे या गावी असाच हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि त्या सप्ताहातून झाडे लावा-झाडे जगवा हा संदेश दिला जात आहे, ज्यांचे संत पूजन आहे, ज्यांची संतपंगत आहे, ज्यांचे कीर्तन आहे त्या कीर्तनकार महिलांना, ज्यांचा सत्कार आहे त्या सर्वांना आंब्याचे रोपटे भेट दिले जात आहे. असे जेव्हा समाजात सकारात्मक चित्र दिसते तेव्हा खर्‍या अर्थाने हिरवा रंग नवरात्रीचा, हिरवा रंग हा साज निसर्गाचा आहे असेच वाटते. हाच पर्यावरण संवर्धनाचा संकल्प गावोगावी केला गेला तर यातून नक्कीच या धरतीवर हिरवाई निर्माण होईल.
हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा असे तेव्हाच बोलता येईल जेव्हा जिथे जिथे नवरात्री साजरी होते तिथे निसर्ग संवर्धनाचे कार्य होत आहे. निसर्ग संवर्धनाचा, समृद्धीचा आणि नवचैतन्याचा हा वसा आहे हा प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे आणि तो जनजागृतीतून नक्कीच प्रत्येकापर्यंत पोहोचेल. नवरात्र हा आदिशक्तीच्या उपासनेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्सव आहे. थेंबे थेंबे तळे साचे अशी म्हण आहे. अशाच प्रकारे थोडी थोडी निसर्गाबद्दल जनजागृती केली तर एक दिवस जसे तळे तयार होते तसे निसर्ग संवर्धनाचे कार्य होईल यात तीळमात्र मात्र शंका नाही. नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रत्येक रंगाला एक विशेष महत्त्व दिले जाते. त्यांपैकी हिरवा रंग हा निसर्ग, नवचैतन्य, समृद्धी, आशा आणि जीवनातील सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. हिरवा रंग म्हणजे निसर्गाने पृथ्वीला दिलेली सुंदर देणगीच आहे. झाडांच्या पानांतील हिरवाई, शेतातील डोलणारी पिके, डोंगरांवरील हिरवी शाल आणि पावसाळ्यात नव्याने बहरणारी सृष्टी मनाला विशेष आनंद आणि प्रसन्नता देते. नवरात्रीमध्ये हिरवा रंग परिधान करणे म्हणजे नव्या आशांचे, भरभराटीचे आणि आनंदाचे स्वागत करणे होय. हिरवा रंग मनाला शांतता देतो आणि जीवनात नव्या क्रांतीची प्रेरणा देतो, अशी सांस्कृतिक धारणा आहे. जशी देवीची उपासना आपल्याला शक्ती, भक्ती, धैर्य आणि सद्बुद्धीचा संदेश देते, तसाच हिरवा रंग आपल्याला निसर्गाशी नाते जोडण्याची प्रेरणा देतो. प्रत्येकाने निसर्गाशी नाते जोडले, निसर्गसंवर्धन केले तर आता जो काही दुष्काळ पडला आहे अशी समस्या वारंवार येणार नाही. देवी ही शक्तीचे प्रतीक आहे. निसर्गदेखील एक महान शक्ती आहे. निसर्ग आपल्याला अन्न, पाणी, हवा, औषधे आणि निवारा देतो. झाडे आपल्याला प्राणवायू देतात, नद्या जीवनाला आधार देतात, तर वनराई असंख्य जीवांना आश्रय देते. म्हणूनच निसर्गाचे रक्षण करणे हीसुद्धा एक प्रकारची जनसेवाच आहे आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. हिरवाई म्हणजे जीवनाचा श्वास आहे, हिरवीगार झाडे केवळ पृथ्वीचे सौंदर्य वाढवत नाहीत, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. नवरात्रीत देवीच्या चरणी फुले अर्पण करताना एखादे झाड लावण्याचा संकल्प केला तर बदल निश्चित आहे. देवीची आराधना करताना निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारीही स्वीकारली तर तेच देवीला वंदन होईल. नवरात्रीचा उत्सव आनंदाने साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेणे ही काळाची गरज आहे.

The color green—of Navaratri and of nature

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *