जांबुटकेत देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जमिनीचे हस्तांतरण

नाशिक : प्रतिनिधी
देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे आकारास येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्य करारांचे आदान-प्रदान करण्यात आले.
कुंभ उद्योग संगम आणि नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेसमेन्ट समीट काल हॉटेल ताज गेट वे येथे पार पडले. त्यात या जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न, औषध प्रशासन व विशेष सहाय मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आदी
उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरचे दस्तऐवज हस्तांतरित केले. यामुळे आदिवासी क्षेत्रातील औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच स्थानिक आदिवासी बांधवांचे कौशल्य विकास आणि शाश्वत रोजगारासाठी उपयुक्त ठरणार आहे. या क्लस्टरच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी व्हीईएल नागपूर यांच्यामार्फत त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे शाश्वत जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अंदाजित 28 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला. हा प्रकल्प सामाजिक दायित्वअंतर्गत राबविण्यात येणार आहे. यामध्ये रचना, निधी, उभारणी व 25 वर्षे संचलनाची जबाबदारी समाविष्ट आहे. या उपक्रमामुळे पाण्याची गुणवत्ता, आरोग्य, पर्यावरणीय शाश्वतता यामध्ये दीर्घकालीन सुधारणा होणार आहे. यासह वेस्टइन वाइनयार्ड रिसोर्ट अ‍ॅण्ड स्पातर्फे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, 600 जणांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार आहे. याशिवाय, ब्रह्मांदन पाइप्स लि. तर्फे 100 कोटी रुपये, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नाशिककडून 750 कोटी रुपये, सह्याद्री फार्म्स-पोस्ट
हॉर्वेस्ट केअरकडून 457.2 कोटी रुपये, एनएसजे ग्लोबल लॉजिस्टिककडून 100 कोटी रुपये, ठाकरे इस्टेट प्रा. लि.कडून 150 कोटी रुपये, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक्स इंडस्ट्रीजकडून 110 कोटी रुपये, दिलीप टेक्सटाइल्स यांच्याकडून 200 कोटी रुपये, ट्रायडंट ग्रो एक्स्पोर्ट्स यांच्याकडून 119.85 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. संबंधितांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाबरोबर सामंजस्य कराराचे आदान-प्रदान केले.

The country’s first tribal industry cluster in Jambutka

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *