– वैभव पगार
रविवार, 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयामुळे पुढे ढकलण्याचा शासनाचा निर्णय हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, भिवंडी पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद असून, त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
महाराष्ट्रातील लाखो युवक-युवती शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करतात. या परीक्षेसाठी अनेक महिने कठोर परिश्रम, आर्थिक खर्च आणि मानसिक तयारी करावी लागते. काही वर्षांपूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिका फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेली, भरती प्रक्रिया रखडली आणि परीक्षेवरील विश्वास डळमळीत झाला होता. त्या वेदना आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. यावेळी मात्र संभाव्य गैरप्रकाराची माहिती मिळताच शासनाने वेळ न दवडता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. काहींना हा निर्णय गैरसोयीचा वाटू शकतो; परंतु परीक्षा झाल्यानंतर गैरप्रकार उघडकीस येऊन पुन्हा परीक्षा घेण्यापेक्षा, आधीच सावधगिरी बाळगणे अधिक योग्य ठरते. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे संरक्षण झाले आणि गैरप्रकार करणार्यांना कठोर संदेश मिळाला. तथापि, विद्यार्थ्यांची शासनाकडे आणखी एक महत्त्वाची अपेक्षा आहे. ‘पवित्र’ शिक्षक भरती प्रणालीअंतर्गत सुरू असलेली शिक्षक भरतीप्रक्रिया अधिक गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण झालेले हजारो उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना पात्र उमेदवारांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भरतीप्रक्रिया तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. पारदर्शक परीक्षा आणि वेळेत भरती या दोन्ही गोष्टी शिक्षणव्यवस्थेसाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. शासनाने शिक्षक पात्रता परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे. आता याच पारदर्शकतेसोबत शिक्षक भरतीलाही गती मिळाली तर लाखो युवकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. शेवटी एवढेच-प्रामाणिक विद्यार्थ्यांची मेहनत सुरक्षित ठेवणारी, गैरप्रकारांवर कठोर कारवाई करणारी आणि वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण करणारी व्यवस्था हीच विद्यार्थ्यांची खरी अपेक्षा आहे. शासनाने उचललेले हे पाऊल त्या दिशेने आशादायी सुरुवात ठरली आहे.
The Curse of Paper Leaks