आस्वाद

दुर्गेचे युग

– राजेश शिरभाते

नवरात्रीचा उत्सव सध्या सुरू आहे. त्यानंतर रावणावरील विजयाचा दिवस विजयादशमी येईल. नवरात्र म्हणजे आदिशक्ती, स्त्रीशक्तीची भक्ती किंवा आदर व्यक्त करण्याचा उत्सव. हा उत्सव विविध पद्धतीने साजरा केला जातो. पारंपरिक पूजाअर्चाबरोबरच समाजातील नारीशक्तीचा गौरव करणारेही विविध कार्यक्रम सध्या जागोजागी होत आहेत. सध्याच्या युगाकडे जर बारकाईने पाहिले तर आपल्याला हे युग दुर्गेचे किंवा नारीशक्तीचे युग आहे की काय, असे वाटायला लागते.

पुरुषप्रधान संस्कृती म्हणून जरी आपल्या संस्कृतीला ओळखले जात असले, तरी सध्या सर्वच क्षेत्रांत महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध जबाबदार्‍या अगदी लीलया पेलत आहेत. पुरुषांबरोबरची स्पर्धा नव्हे, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि कर्तव्यदक्षतेची अभिव्यक्ती सध्या आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहे. हा काळाचा महिमा आहे. सावित्रीबाई फुलेंनी लावलेल्या बीजाचा झालेला हा वटवृक्ष आहे. ब्रिटिश राजवटीच्या ज्या काही सकारात्मक बाबी होत्या त्याचाही हा मोठा विजय आहे, असे म्हणायला हरकत नाही.
आज जगातील असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले नाही. त्या विविध कार्यक्षेत्रात तर आहेतच आहेत. त्याचबरोबर समाजाला पुढे नेण्याचाही प्रयत्न करत आहेत. त्यांची अंगभूत संवेदनशीलता आणि एकाच वेळी विविध कार्यसिद्धीस नेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्या या सर्वच क्षेत्रांत कार्यरत आहेत. अंतराळापासून ते अगदी पाणबुडीच्या अभ्यासापर्यंत किंवा मग दोन्ही ध्रुवावर चाललेला अभ्यास, विमानोड्डाण आणि समाजकार्यातही त्यांच्या कामाचा डंका वाजत आहे. या वर्षीचे शांततेचे नोबेल पारितोषिकही एका महिलेला मिळाले याचाही आनंद आहे. समाजात काही चांगले घडविण्याबरोबरच समाजातील दुष्प्रवृत्तीवर थेट प्रहार करणार्‍या महिला अधिकार्‍यांचीही संख्या काही कमी आहे. आपल्या देशात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सनदी अधिकारी झालेल्या महिला ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहता या देशासाठीही एक आशादायक चित्र उभे राहिलेले आहे. देशात काही लोकांकडून मनुस्मृती या स्त्रियांना कायम खालच्या दर्जावर ठेवणार्‍या संस्कृतीच्या लोकांनाही याच महिला थेट आव्हान देत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा विरोध न करता त्या आपल्याच मोठ्या कामाने
स्वतःचे अस्तित्व दाखवून देणार्‍या ठरलेल्या आहेत. आज लेखिका, वकील, बँक अधिकारी, सनदी अधिकारी, संगणकामध्ये तज्ज्ञ, व्यवस्थापन आणि हॉटेल व्यवसायामध्ये तर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. भारतालाही अशा अनेक महान महिलांची एक मोठी परंपरा लाभलेली आहे. हे आपले भाग्यच म्हणावे लागेल.
या देशातील आजही सर्वांत कर्तृत्ववान पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचाच उल्लेख होत असतो. आपल्या शत्रूला पराजित करून एक देश निर्माण करण्याचे त्यांचे कर्तृत्व वादातीत आहे. ते त्यानंतर कधीही झाले नाही. त्या जरी पंडित नेहरूंच्या कन्या असल्या, तरी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. आपल्या देशातील अनेक महिलांनीही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले काम केलेले आहे. माजी परराष्ट्रमंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांचेही नाव परदेशसंबंधांच्या क्षेत्रात आजही आदराने घेतले जाते. हीच परंपरा आजही कायम आहे. अगदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींपासून ते आजही निवडणूक आयोगाच्या गैरप्रकारांच्या विरोधात आंदोलन करणार्‍या नेहा बोरा हिच्यापर्यंत ही परंपरा सुरूच आहे. आज मुलींच्या शिक्षण घेण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाला पुढे आणले पाहिजे, ही भावना अगदी गावांमधूनही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय तरुणांना निर्माण झालेली संधी पाहता आज देशातल्या अगदी कानाकोपर्‍यांतील तरुण-तरुणीही मोठ्या प्रमाणात परदेशात कार्यरत असल्याचे पाहायला मिळते. आपली परंपरा जपत त्यांनी अनेक क्षेत्रांत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.
देश चालवण्यात तर त्यांचा सहभाग असतोच. त्याचबरोबर देशाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यातही त्यांनी आघाडी घेतली आहे. या देशात गेल्या काही वर्षांत जणू सरकारच्या विरोधात ’ब्र’ काढणेही गुन्हा ठरत होता, त्या देशात एक मोठे आंदोलन निर्माण करण्यातही या महिला किंवा अगदी लहान मुलींनी आघाडी घेतली होती. त्यांच्यावर पुरुष पोलिसांकडून किंवा काही वेळा तर पोलिसांच्या वेशात या आंदोलनात घुसलेल्या गुंडांकडूनही अत्याचार झाले, तरी त्या माग हटल्या नाहीत. त्यांच्या या नारीशक्तीला काही प्रमाणात सरकारनेही विरोध करण्याची भूमिका घेतली. अगदी एका महिला आंदोलक तरुणीला सर्वांच्या समोर चुकीचा स्पर्श करणार्‍या एका पोलिसाला मोठ्या अधिकाराची जागा देण्यात आली आणि त्याचा गौरव करण्यात आला. हा अपमानही या महिलांनी सहन केला. तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. आज तुम्ही कोणत्याही कार्यालयात गेलात तर तुमच्या हे लक्षात येईल की तिथे महिला कर्मचार्‍यांची आणि अधिकार्‍यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली दिसेल. त्यांची कामकाज करण्याची पद्धतही वेगळी जाणवेल. त्या तुमच्या कामाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहतील. नारीच्या या शक्तीला या नवरात्रीच्या निमित्ताने सलाम! पारंपरिक पद्धतीने दसर्‍याच्या दिवशी श्रीरामाकडून रावणाचे दहन केले जाते. यापुढे कदाचित हे रावणदहनही एखाद्या मुलीच्या हस्ते होईल असे चित्र सध्या तरी सुरू झाले आहे. या नव्या दुर्गेच्या युगाचे आपण स्वागत केले पाहिजे.

कर्तृत्वाची दखल
आजही जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाचे आणि पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाच्या बातम्याही लोकांपर्यंत पोहोचवणार्‍या अनेक महिला पत्रकार या आदरास पात्र आहेत. निवडणूक आयोगातील गैरप्रकार पुढे आणणारीही एक महिला पत्रकारच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अगदी अभिजित दीपके यांना विमानातून अटक करण्यासाठीही आपल्याला महिला पोलिस अधिकार्‍यांचीच मदत घ्यावी लागली. त्यांनी ज्या पद्धतीने अगदी थेट विमानात घुसून दीपके व त्यांच्याबरोबरच्या लोकांना अटक केली, हे कार्य अगदी ऐतिहासिक आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेतलेली आहे.

 

The Era of Durga

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago