तपोवनातील 1800 वृक्षतोडीस स्थगिती द्यावी

मनसेची मनपा प्रशासनाकडे मागणी

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्याच्या नियोजनांतर्गत तब्बल 1800 हून अधिक वृक्षतोडीचा मनपा प्रशासनाने घेतलेला निर्णय तातडीने स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ मनसेतर्फे आंदोलनही करण्यात आले.
साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी साधुग्राम उभारण्यासाठी सुमारे 1150 एकर परिसर निश्चित करण्यात आला असून, तपोवनातील मनपाच्या 54 एकर जागेवर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, पुनर्रोपण आणि फांद्यांची छाटणी करण्याचा प्रस्ताव आहे. या ठिकाणी कडुलिंब, चिंच, जांभूळसह अनेक मोठी, सावलीदार आणि परिसंस्थेसाठी महत्त्वाची झाडे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड नाशिकच्या हवामान, जलसाठा आणि पर्यावरणीय संतुलनाला दीर्घकालीन हानी पोहोचवणारी असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
मनपाने जाहीर केलेल्या हरित कुंभ – हरित नाशिक संकल्पनेला फाटा देत जुनी झाडे तोडण्याचा निर्णय घेणे हे दुर्दैवी असल्याचे मनसे पदाधिकार्‍यांनी नमूद केले. नाशिकची पर्यावरणीय ओळख जपणे ही मनपाची प्राथमिक जबाबदारी असल्याने वृक्षतोडीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा शहरभर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलिम मामा शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाताई डेरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, संतोष पिल्ले, नीलेश शहाणे, योगेश दाभाडे, सत्यम खंडाळे यांच्यासह पदाधिकारी व पर्यावरणप्रेमी
उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *