ध्यमिक शाळेमधील शिक्षकांपुढे कमी वयात मुला-मुलींमध्ये घडणारी प्रेमप्रकरणे कशी हाताळायची, हा मोठा प्रश्न उभा असतो. साधारणतः वय वर्षे 12 ते 19 या कालखंडातील कुमार अवस्था ही खरोखरच वादळी असते. या काळात मुलांचे वर्तन अस्थिर, चंचल आणि भावनिकदृष्ट्या अतिसंवेदनशील असते. या अवस्थेला यौवनारंभ असेही म्हणतात. या काळात मुला-मुलींमध्ये विशेष शारीरिक, मानसिक आणि जैविक बदल
घडत असतात.
या वयात कोणतीही बंधने नकोशी वाटतात. मानसिक विकास झपाट्याने होत असतो. कर्तृत्वापेक्षा सौंदर्याकडे ओढ वाढत जाते. आपण आकर्षक दिसावे, लक्ष वेधून घ्यावे, अशी इच्छा मनात जोर धरते. या सार्या प्रक्रियेमुळे ही मुले अनेकदा गोंधळलेल्या अवस्थेत असतात. त्यातच विरोधलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण ही नैसर्गिक भावना या वयात उत्पन्न होऊन ती अधिक तीव्र बनते. बालकही नाही आणि पूर्ण प्रौढही नाही अशा मधल्या अवस्थेत ही मुले अनेकदा बंडखोरी करण्याकडे वळतात.
काही मुले त्यांच्या भावनांचे दमन करण्यासाठी दिवास्वप्नांचा आधार घेतात; तर आजच्या मुक्त वातावरणामुळे सोशल मीडिया आणि मोबाइलच्या वापरामुळे बरीच मुले आपल्या भावनांना मोकळा प्रवाह देण्याचे धाडस करतात. यातून अनेकदा गंभीर परिस्थिती उद्भवते.
या वयात निर्माण होणार्या प्रेमसंबंधांचा त्यांच्या शैक्षणिक जीवनावर मोठा परिणाम होताना दिसतो. ज्या वयात शिक्षण, करिअर आणि भविष्याची पायाभरणी व्हायला हवी, त्याच वयात भावनिक गुंतलेपणामुळे एकूणच जीवनाला धोकादायक वळण लागण्याची शक्यता असते. शाळेमधील शिक्षकांना जेव्हा अशा प्रकरणांची ‘कुणकुण’ लागते, तेव्हा त्यांच्याकडे हे हाताळण्यासाठी शास्त्रीय किंवा मनोवैज्ञानिक प्रशिक्षण नसते. त्यामुळे टोमणे मारणे, उघडपणे रागावणे किंवा कधीकधी मारहाण करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा पालकांना समजल्यावर विशेषतः मुलीचे शिक्षण थांबवले जाते किंवा वाद-भांडणे, मारहाणीचे प्रसंग घडतात. काही प्रकरणे तर पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतात.
पूर्वी सोशल मीडिया नसल्याने ही प्रकरणे ‘नजरा-नजर’, ‘ओझरते स्मित’ ते ‘प्रेमपत्र’ इतपतच मर्यादित असायची; परंतु आज उत्तेजन वाढवणारे सोशल मीडिया, वेबसीरिज आणि भावनांना ढवळून काढणारी गाणी यामुळे मुला-मुलींचा तोल सहज ढळतो.
प्रेम ही पवित्र भावना आहे, पण त्यात वयाची परिपक्वता अत्यंत आवश्यक असते. केवळ आकर्षणाला प्रेम समजण्याची चूक धोकादायक ठरते. या वयातील मुले परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करू शकत नाहीत. शारीरिक जवळीक साधण्याची इच्छा निर्माण होते आणि ते अधिक धोकादायक ठरू शकते. मराठी सिनेमातील एक गीत या भावना स्पष्टपणे दर्शवते… तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं… या गीतात या वयात मनात जन्मणार्या भावना किती गुंतागुंतीच्या असतात हे सुंदरपणे मांडले आहे. म्हणून या वयात होणार्या बदलांविषयी मुलांना योग्य माहिती, मार्गदर्शन आणि शास्त्रीय शिक्षण देणे आवश्यक आहे. शरीरातील, मनातील बदलांकडे तटस्थपणे पाहण्याचा सल्ला वडीलधार्यांनी दिला पाहिजे. प्रेमप्रकरण उद्भवल्यास शिक्षक आणि पालकांनी शांतपणे, संयमाने आणि समजून घेऊन त्या मुलांचे समुपदेशन तज्ज्ञांकडून केले पाहिजे. मारहाण किंवा शिक्षा देणे यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. अशी प्रकरणे हळुवारपणे, संवादाने आणि वैज्ञानिक पद्धतीने हाताळली गेली पाहिजेत.
कुमारवयातील प्रेम ही चूक नसून नैसर्गिक प्रक्रिया आहे; चूक फक्त तिचे अज्ञानात केलेले व्यवस्थापन आहे. शिक्षक, पालक आणि समाज यांनी एकमेकांशी सहयोग करून मुलांना योग्य मार्गदर्शन दिले, तर ते भटकणार नाहीत, तर फुलांसारखी उमलतील. त्यांच्यातील भावना दाबण्याऐवजी समजून घेऊया. कारण योग्य समज आणि संवादच भविष्यातील संकटांना रोखू शकतो.