शिवारातील स्त्रीशक्ती

रोज शेतशिवारात सकाळी लवकर गेलं की अनेक गोष्टी नकळत दिसतात आणि विविध गोष्टी शिकवतात. ओलसर मातीचा गंध, पिकावरचे दवबिंदू आणि त्या दवात मिसळलेली स्त्रियांच्या श्रमाची कहाणी. सूर्योदयापूर्वी सुरू होणारी सकाळ दिवस संपून सूर्यास्तानंतरदेखील शेतातच संपताना दिसते. त्यांच्या घामालादेखील श्रमाचा गंध जाणवतो. महाराष्ट्र शासन कृषी विभागाची प्रतिनिधी म्हणून जेव्हा मी शेतांमध्ये फिरते, तेव्हा शासनाकडून आखल्या जाणार्‍या विविध महिला सक्षमीकरणाच्या योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी माझ्या आणि माझ्या सहकार्‍यांच्या खांद्यावर असते. भारत आणि महाराष्ट्राच्या शेतीव्यवस्थेत महिला शेतकर्‍यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. पेरणी, रोप लागवड, तण काढणे, कापणी, धान्य साठवण या प्रत्येक टप्प्यावर महिला उपस्थित असतात.
मजूर म्हणूनदेखील महिलांचीच संख्या अधिक आहे. अनेक ठिकाणी पुरुष शेतकरी इतर रोजगारासाठी बाहेर असताना शेतीची संपूर्ण धुरा महिला समर्थपणे सांभाळतात. त्यामुळेच महिला शेतकरी ही आपल्या देशाच्या अन्नसुरक्षेचा कणा आहे, हे शासन पातळीवर मान्य करूनच विविध धोरणे व योजना राबविल्या जात आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 हे महिला शेतकर्‍यांच्या कार्याची दखल घेण्याचं आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचं वर्ष आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग महिला शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून प्रशिक्षण, तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य आणि शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतमजूर महिलांनादेखील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून उपजीविकेचे साधन म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसायांसाठी हातभार लावला जातो. शेतावर प्रत्यक्ष काम करताना या योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवताना आणि अंमलबजावणी करताना एक आत्मीय समाधानाची जाणीव होते.
या लेखमालेची सुरुवात करण्यासाठी एक पवित्र दिवस आज आपण निवडला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा याला विशेष अर्थ आहे. कारण त्या होत्या म्हणून मी हे काम करतेय. महिलांसोबत उभं राहतायाव एवढं सक्षम आज सावित्रीबाईंमुळे बनलोय. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा जो पाया घातला, त्याच विचारांवर आजची महिला शेतकरी उभी आहे. शिक्षणामुळे तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला, नवीन प्रयोग स्वीकारण्याची तयारी वाढली. शासनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये महिला सक्रिय सहभाग घेत आहेत, हे शेतात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं.
महिला शेतकरी केवळ शेतीच नाही तर घर, कुटुंब आणि समाज यांचा समतोल राखते. त्यामुळे शासनाच्या योजना राबविताना महिलांच्या आरोग्य, पोषण आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. कृषी सखी, महिला बचत गट, सेंद्रिय शेती, शेतीपूरक उद्योग, ड्रोन दीदी , उमेद यांसारख्या उपक्रमांतून महिलांचा सहभाग वाढताना दिसतो. या माध्यमातून शेती अधिक शाश्वत आणि उत्पन्नवाढीची होत आहे.
शासन कर्मचारी म्हणून आमची भूमिका केवळ मार्गदर्शनापुरती मर्यादित नाही, तर शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तात्काळ उपाय सुचवणे, योग्य योजनेशी त्यांना जोडणे आणि शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी मदत करणे अशी आहे. महिला शेतकरी या प्रक्रियेतील महत्त्वाची भागीदार आहेत आणि त्यांचा सहभाग वाढवणं हे शासनाचं स्पष्ट धोरण आहे.
शिवारातील स्त्रीशक्ती ही लेखमाला म्हणजे महिला शेतकर्‍यांच्या आणि शेतमजुरांच्या योगदानाची दखल घेण्याचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महिला शेतकरी म्हणजे शेतीचा आधारस्तंभ आहे, हे समाजापर्यंत पोहोचवणं आपलं सर्वांच कर्तव्य आहे. आणि सोबतच प्रत्येक महिलेला सन्मानाची वागणूक देणं ही आपली जबाबदारी आहे.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीला शिक्षणाचं बळ दिलं. आज शासनाच्या माध्यमातून त्या शिक्षणाला कौशल्य, तंत्रज्ञान आणि संधीची जोड देण्याचं काम सुरू आहे. महिला शेतकरी सक्षम झाली तर शेती अधिक सक्षम होईल आणि शेती सक्षम झाली तर देशाची अन्नसुरक्षा अधिक भक्कम होईल. हीच शासनाची भूमिका आहे, हीच शिवारातील स्त्रीशक्ती आहे.

The female power of Shivara

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *