(भाग 1)
‘अनादी मी अनंत मी
अवध्य मी भला…’
तात्याराव सावरकरांच्या या ओळी ऐकल्या की कुणास ठाऊक? मी माझ्या अथांग भूतकाळात का शिरतो!
होय! खरोखर मी अनादीच, माझा जन्म कुठला, कधीचा मला खरेच माहीत नाही. धरतीमातेच्या कुशीत माझे पूर्वज कधीतरी जन्माला आले आणि मी त्यांची कितवी पिढी हे तर मलाही माहीत नाही. पण जन्माला आलो तेच ‘बापवृक्ष’ म्हणून.
कधीतरी मी पण छोटेसे पिलूच होतो ना! त्या आधी धराउदरात बाळमुठी चोखत पहुडलेलेलो होतो. मृदा माझे संरक्षण करीत माझे गर्भवासीपण जतन करत होती. निसर्गनियमाप्रमाणे मी पण गर्भातून बाहेर आलो. मृदेच्यावर तांबूस पोपटी कोवळ्या पानांसह अंकुरलो आणि माझ्या धरामातेने माझे भरणपोषण केले. मऊ वत्सल मुदामातेने बाळघुटी पाजल्या, वरुणदेवतेने जल देऊन तृष्णातृप्ती केली. तर सूर्यदेवतेने ऊर्जाप्रदान करत अन्ननिर्मितीची शिकवण दिली. वायूने माझ्या पानापानांतून आनंदी सळसळते नादमय सुमधुर सामवेद निर्माण केले. खगगीतांनी माझ्या रंध्रारंध्रात ममता प्रकटवली. सर्वांचाच मी ऋणी आहे. सूर्यदेवतेला, वरुणदेवतेला नमस्कार करण्यासाठी त्यांच्या दिशेने वाढत वाढत पानांचे हात जोडतोय. माझ्या हातांच्या चिपळ्या टाळ्या वाजवतोय, फांद्या मृदंग वाजवतायत, काड्या काटक्यांच्या पोकळीतून मधुर बासरी वाजतेय, पानांच्या हालचालीतून सळसळीचे संगीत निर्माण करतोय. परमेश्वराने मानवासारखे तोंड गळा नाही दिला पण त्या ईश्वरासाठी कवन म्हणण्यासाठी मी खूप उतावीळ आहे. धरती मातेच्या कुशीत अजूनही मुळे घट्ट आहेत. युगानुयुगे अवनीमाता माझे कित्येक हरित बंधू प्रसवत आहे. तिच्या मुलाबाळांना पोषण देत त्यांना घट्ट पकडून आहे. त्या धरती मातेचे आभार मानण्यासाठी वंदन करण्यासाठी तर माझी कित्येक मुळे मी जमिनीच्या दिशेने पाठवत असतो. धरणीमातेचे चरण स्पर्श करण्यास कितीतरी आनंदी उत्सुक असतात ते! खूप काही देणे लागतो मी धरणी मातेच्या अंतरीचे आणि पर्यावरणाचेही. कितीतरी सूक्ष्मजीव माझ्या मुळांभोवती घुटमळत असतात. त्यांचे पोषणही होते आणि जमिनीत इतर झाडांच्या वाढीसाठी कित्येक सूक्ष्मद्रव्यांची निर्मिती ते करत असतात. जमिनीत जलसंवर्धन करण्यास माझी मुळे प्रचंड सक्षम आहेत. जमिनीची धूप थांबवण्यासाठीची धुरा माझ्या मुळांनी स्वशिरावर घेतलेली आहे. माझ्या देहातल्या चयापचय क्रियेतून उत्सर्जित झालेले कित्येक घटक माझी मुळे भवतालच्या मातीत मिसळतात. मातीची सुपीकता वाढवतात. पोषकता वाढवतात, पाने, फुले सुगंध आणि प्राणवायु दरवळवतात आणि पर्यावरण जगण्यास पोषक बनवतात. शेतीत उत्तम उत्तम पिकांची निर्मिती करण्यासाठी बळीराजा त्याच्या शेतीत माझ्या भोवतालच्या मातीची पखरण करतो. कित्येक पक्ष्यांची घरटी अंडी आणि त्यांची बाळे माझ्या सुरक्षित पर्णकवचात सुखेनैव, सुरक्षित नांदत आहेत. वानरांसारखे पशूदेखील स्वच्छंद क्रीडा अनुभवतात. अंडी पिलांच्या संरक्षणार्थ कित्येक पक्ष्यांनी माझ्या खोडात ढोली तयार केल्या आहेत.
सीता मातेला रावणाने पळवून नेल्यानंतर भगवान राम माझ्या फांद्यांना, खोडांना, पानांना विचारत होते, ‘सीता कुठे आहे?…. तुम्ही जानकीला कुठे बघितले का?…’ त्या वेळेला मात्र देवाने मला वाचा दिली नाही याचे मनस्वी वाईट वाटले.
मला पाय नाहीत, जागेवरून हलताही येत नाही म्हणून नशिबाला मी खूप दोष दिला. नाहीतर सीतामातेच्या शोधासाठी आणि राक्षस रावणाच्या संहारार्थ वानरसेनेसह मी पण लंकेच्या दिशेने निघालो असतो. पण भगवान श्रीरामांचा स्पर्श झाल्यानंतर पावित्र्य काय असते! याचा खरोखर अनुभव आला. आणि श्री हनुमंताने आमच्याच ज्ञातीतल्या संजीवनी बुटींसाठी पूर्ण मंदारपर्वत लक्ष्मणाच्या उपचारासाठी दुरवरून आणला यासाठी ज्ञातीविषयी प्रचंड अभिमान वाटला. आणि हनुमंताविषयी खूप कृतज्ञ भाव निर्माण झाला.
देवाची देणगी आहे रात्रंदिवस हवेतला कर्ब वायू आणि प्रदूषण शोषून इतर प्राणिमात्रांसाठी आवश्यक असलेला प्राणवायू हवेत उत्सर्जित करण्याचे काम माझ्या फांद्या फांद्यातून धुमारलेली हरितपर्णे इमाने इतबारे करत आहेत. ब्रह्मदेवांनी जेव्हा माझी निर्मिती केली तेव्हाच माझ्या रंध्रात संजीवन निर्मिले. शेंड्यापासून बुडख्यापर्यंत प्रत्येक भाग संजीवन औषधींनी बनवला. ज्याचा उपयोग पूर्वी ऋषीमुनींनी तर केलाच, पण महान तपस्विनी सावित्रीने तर पतीचे प्राण परत आणले. तिच्या स्मरणार्थ सार्याच माता-भगिनी वटसावित्री पौर्णिमा साजरी करतातच. भोळ्याभाबड्या माझ्या भोवती श्रद्धेने दोरेही गुंडाळतात. एका जन्मासाठी एक दोरा म्हणतात. पण बाया बापड्यांनो तुम्ही माझ्या आणि माझ्या ज्ञाती बांधवांना संधी देवुन आमची कत्तल रोखून आमच्या अस्तित्वाची ग्वाही दिलीत तर तुमच्या पतीच्या मुलाबाळांच्या प्रत्येक जन्मांसाठी आरोग्याचे अनंत आशीर्वाद देतो मी तुम्हाला.
माझ्यासारखाच माझा सखा पिंपळ त्यालाही लोक याच श्रद्धेने पुजतात. पती-पत्नीचे एकंदरीतच विश्व कुटुंबाचे नाते अखंड जपले जावे म्हणून वृक्षांची पूजा आणि वृक्षांमध्येच ब्रह्मा, विष्णू, महेशाचे अधिष्ठान शोधत वृक्षांना मनोभावे दह्या दुधाचा अभिषेक करत, गोडाधोडाचा, गुळखोबर्याचा नैवेद्य अर्पण करत मृदा संवर्धन करणे, मृदेची संजीवन शक्ती वाढवणे. पूर्वजांनी निर्मिलेल्या प्रथा किती तात्विक आणि शास्त्रशुद्ध आहेत.
भारतीय समाजात सगळेच सणवार तसेच तर निर्मिलेले आहेत. उत्क्रांतीच्या ओघात जन्माला आलेला सर्वांत बुद्धिमान प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. या मानवाला आमच्यापासून मिळणार्या अन्नावर प्रक्रिया करून सात्त्विक भोजन निर्मितीचे ज्ञान आहे. पण आमच्यासारखे प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न निर्मितीचे इंद्रियच नाही. आणि कित्येकांना त्याचेदेखील ज्ञान नाही. आमच्यापासून मिळणारा अन्न वस्त्र निवारा कदाचित त्याच्या खिजगणतीतही नाही. स्वतःच्या आधुनिकतेपुढे, त्याच्याच दृष्टीने असलेल्या प्रगतीपुढे, लोकसंख्या वाढीपुढे त्याला माझी आणि माझ्या ज्ञातीबांधवांची अडचण होऊ लागली आहे. जंगलात राहणार्या माणसाने नागर वसाहती करण्यासाठी आमच्यासारख्या पालनकर्त्यांचाच अडथळा मानत आमच्या कितीतरी बांधवांना मुळासकट उपटले. गरती भूमाता उघडी बोडकी करत त्याच्या स्वप्नातल्या इमल्यासारखे गगनचुंबी मजले बांधत बांधत स्वर्गास हात टेकवण्यास निघाला. वृक्षांच्या अस्तित्वाने आणि साधकांच्या अति पवित्र साधनेने पुनीत झालेल्या तपोभूमीस हजारो ज्ञाती बांधवांची कत्तल करण्याचे योजले गेले. तर काही हळव्या जन्मानेच माणूस असलेल्या भूमिपुत्रांनी प्रामाणिकपणे, सद्हृदयतेने वसवलेल्या देवराईत या माणुसकीला अधोगतीस नेणार्या प्रगतिशील मानवाने, त्याच्याच माणूस या नावाला काळीमा फासत अग्नितांडव निर्मिले. त्या वेळेला मनुष्य प्राण्याविषयी मनात प्रचंड संतापजनक अगतिकता दाटून आली. पण ब्रह्मयाने ‘बापवृक्ष’ म्हणून चराचरासाठी निर्मिती केली. बाप अगतिक होऊ शकतो, उद्विग्न होऊ शकतो, शाप नाही देऊ शकत. हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकलो नाही. हतबलता नैराश्य मनात दाटले असले तरी याच काळात मानवतेच्या प्रतिमाही बघायला मिळाल्या.
(क्रमश:)
जनस्थानातल्या तपोभूमीत माझ्या बांधवांची कत्तल रोखण्यासाठी जनतेने केलेले आंदोलन, त्यात सामान्य नागरिक होते, विद्वान होते, हळव्या मनाचे साहित्यिक होते, शुद्ध राजकीय हेतुने भारलेले लोक होते, विद्यार्थी होते, शिक्षक होते, माता भगिनींच्या संघटना होत्या, पुढे जाऊन सरकारचा निर्णय काहीही असो पण मुठभर का असेना लोकांचेही प्रेम बघून जगात हिरवाईच्या शाश्वत अस्तित्वाची खात्री पटते. मन खूप भरून आले. या लोकांच्या प्रेमापोटीच तर जीवात जीव आहे तोपर्यंत संपूर्ण जगताला प्राणवायू जीवन आणि जिवन दोन्ही देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच प्रयत्न करेन. आणि त्या गिरी इशाला नक्कीच हात जोडून प्रार्थना करेन राक्षस विध्वंसक अमानवी वृत्ती बाजुला सारून आमच्या ज्ञातिबांधवांच्या जिवित सुरक्षित ठेव म्हणून.
एकेकाळी माझ्या भवतालात असलेले प्राणी आणि पक्षी तुमच्या भवतालात घुसले तुमची पाळीव जनावरे क्वचित प्रसंगी तुमची प्रिय बाळेही त्यांनी पळवली हे निश्चितच वाईट झाले. पण अगदी मनापासून सांगा तुम्हाला अन्न वस्त्र निवारा पुरवणारे आम्ही आहोत. पण ही मानवजात आमच्याच मुळावर उठली. उरलेसुरले छंद म्हणून माझ्या सानिध्यात वावरणार्या, सुखाने बागडणार्या पशुपक्ष्यांचीही तुम्ही निर्घुण शिकार केली. ’जिवो जीवस्य जीवनम्’ ही ब्रम्हदेवाने निर्मिलेली निसर्गसाखळी उद्ध्वस्त केली. मग हे पाप नव्हते का? आमची कत्तल केल्यावर आमच्या सानिध्यातल्या पशुपक्ष्यांना निवारा नाही उरला. मग ते तुमच्या रहिवासात घुसल्यावर त्यांच्या नावाने कंठ शोष करण्यात काय अर्थ आहे? देवराईतले माझे ज्ञाती बांधव जळताना बघून हृदय तीळ तीळ तुटत होते. पिळवटून निघाले होते. काही मानवांना माझ्या ज्ञाती बांधवांची मृत शरीर बघून नक्कीच शोक झाला. बाकीचे मात्र आम्हाला त्याचे काही घेणे देणे नाही याच अविर्भावात होते.
तर काही आता आपल्याला सिमेंटचे जाळे पसरवुन (आमचा संहार करून आणि इतर मानवांनाही लुटुन) कोट्याधीश होता येईल या स्वैर उच्छृंखल अमानवी आनंदात होते. अरे पण मानवांनो तुम्ही गेल्यावर सरणावर देखील आमच्याच वृक्ष बांधवांचे अवशेष असतात ना!
अठराव्या शतकात औद्योगिक क्रांती झाली आणि मानव जात आमच्या मुळावर उठली हे तितकेच खरे आहे. औद्योगिक क्रांतीची देणगी म्हणून वायू प्रदूषण जलप्रदूषण आणि मृदा प्रदूषण सुद्धा झाले हे त्रिवार सत्य आहे. आधुनिकीकरणाच्या मागे लागता लागता बहुतेक मानवाचे बुद्धीप्रदूषण आणि भावनाप्रदूषण देखील झाल्याचे दिसते. म्हणूनच चराचराला देव मानणारा माणूस यंत्रांचा शोध लावता लावता स्वतः यंत्र होऊन बसला. भावना हरपल्या आणि आमच्या सोबतच तो इतर मानवांसाठीही वेदनाहीन झाला. त्याचे परिणाम तर आपण सारे उघड्या डोळ्यांनी बघतच आहोत. जिवंतपणी तर माणूस आमच्या कत्तली करून जमीनी लाटतोच आहे पण मेल्यानंतर सुद्धा त्याच्या स्वतःच्या दफनासाठी आमच्या कत्तली करून त्यांच्या स्मशानभूमी साठी जमिनी लाटतोच आहे. त्यापेक्षा विद्युत दाहिनीचा पर्याय काही सुह्द, सुसंस्कृत, सुसंस्कारीत मानवांनी शोधुन काढला तो सर्वोत्तम नाही का?
आज मानवाच्या
ऐषोआरामासाठी घरातील लाखो करोडो रुपयांचे फर्निचर बनवले जाते. पण ते आमच्यासारख्या लाखो करोडोंचा बळी देऊनच. मानवाला आरामात जगताना बघून आम्हाला खरेच खूप आनंद होतो. पण आमची ज्ञाती जगली तरच तुमच्या पुढच्या पिढीला सुख लाभणार हे निश्चित. माणसाच्या शरीराच्या पोषणासाठी सारे मिनरल्स, व्हिटॅमिन्स, खनिजे सूक्ष्म मूलद्रव्ये आमच्याच सेवनातून तर मिळतात ना! याची जाणीव ठेवली तरी खूप आहे. आमच्या जगण्यामध्ये मानव जातीतले राजकारण न आल्यास सगळ्यांचे जगणे निश्चितच सुखी निरामय होणार हे निश्चितच.
एक स्वप्न आहे माझे, हल्लीच जनस्थानात पवित्र भूमीत कुंभमेळा येऊ घातलाय. येणार्या साधूंच्या संतांच्या महंतांच्या हातून एक एक मृदा संवर्धक, भवताल अशुद्धी, प्रदुषणहारक वृक्ष लावल्यास पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत अतिशुद्ध हरिततम तपोभूमी तयार झालेली असेल. हेच संत महात्मे एकेका झाडाखाली बसून जनउद्धारणार्थ दैवी जप करतील. आमच्या पारावर बसून वृद्ध बाया बापड्या शिळोप्याच्या गप्पा मारतील. लहान लेकरे पारंब्यांना लोंबकळत सुंदर गाणी म्हणतील, माहेरवाशिनी फांद्यांना झोके बांधून पाडवा, आखाजी , होळीचे गाणे म्हणतील. झाडाच्या शीतल सावलीत बसून वेदांचा अभ्यास करणारे विद्यार्थी उद्याचे विद्वज्जन असतील. मानव आणि चराचर कल्याणासाठी अखंड सेवाव्रती असतील. वेदांच्या ऋचा, पुराणातील स्तोत्र, मानवाच्या मनातील तिमिरहारक असतील. त्यातीलच एक संत झाडांच्या खोडाला कवटाळून ’वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…..’ टाळ चिपळ्यांच्या तालात गात असेल, तर एक कोणी संत आमच्याच शितल निर्भय सावलीत ’आनंदवन भूवरी ………’ सुखेनैव गात गात जंगलातून वनातून निर्भीडपणे फिरत असेल…….