भिंतीवर लिहिलं भविष्य; श्रद्धाची बारावीत ‘टॉप’ झेप

भाजी विक्रेत्याच्या मुलीची जिद्द; 86.67 टक्के गुणांसह विज्ञान शाखेत शाळेत अव्वल

सिन्नर : प्रतिनिधी
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, आई-वडील बाजारात भाजीपाला विकून संसाराचा गाडा ओढणारे, अभ्यासासाठी वह्या, टेबल-खुर्ची, शिकवणी यांची कोणतीही सोय नाही. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत सिन्नरच्या भाटवाडी येथील श्रद्धा माणिक लोंढे हिने बारावी विज्ञान शाखेत 86.67 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सिन्नर शहरातील महात्मा फुले विद्यालयामधील या विद्यार्थिनीने आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाची नवी कहाणी घडवली आहे.
भिंत बनली अभ्यासाची वही
पिवळ्या कुर्त्यात हसतमुख उभी असलेली श्रद्धा आणि तिच्या मागे दिसणारी साधी, रंग उडालेली भिंत, पण ही भिंतच तिच्यासाठी ‘फळा’ ठरली. आर्थिक अडचणींमुळे अभ्यासासाठी आवश्यक साधने नसल्याने तिने घराच्या भिंतीवरच अभ्यास करण्याचा मार्ग निवडला.
खडूच्या सहाय्याने श्रद्धाने केमिस्ट्रीतील अवघड रिअ‍ॅक्शन्स, सूत्रे आणि संकल्पना थेट भिंतीवर लिहायला सुरुवात केली. अल्कोहोल, अल्डीहाइड, किटोन ते कार्बोक्झिलीक अ‍ॅसिड, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा संपूर्ण पट तिने भिंतीवर उभा केला. उठताबसता डोळ्यासमोर अभ्यास राहावा, यासाठी ही पद्धत तिने सातत्याने वापरली. सुविधांचा अभाव कधीच आड आला नाही. उलट उपलब्ध साधनांचा जास्तीत जास्त वापर करत श्रद्धाने स्वतःचा अभ्यास अधिक मजबूत केला. यश मिळूनही तिच्या चेहर्‍यावर अहंकार नाही, तर समाधान आणि आत्मविश्वास दिसून येतो.

‘स्वप्न असेल तर मार्ग नक्की सापडतो’

सुविधा नसल्या तरी चालतात, पण स्वप्न मोठं असावं आणि त्यासाठी मेहनत घ्यायची तयारी हवी. भिंती अडथळा नसतात, त्या यशाच्या साक्षीदार होतात. ‘नशीब नव्हे, जिद्द भविष्य घडवते.’
– श्रद्धा लोंढे, विद्यार्थिनी

आई-वडिलांचा कष्टमय आधार

श्रद्धाचे आई-वडील बाजारात भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कठीण परिस्थितीतही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कधीच खंड पडू दिला नाही. त्यांच्या कष्ट आणि प्रामाणिकपणाचेच हे फळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. श्रद्धाच्या यशात तिच्या आई- वडिलांसोबतच शिक्षकांचा मोठा वाटा आहे. वर्गशिक्षक एकनाथ माळी, गंधाके, राहुल वरंदळ, पटेल या शिक्षकांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेनेही तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत प्रोत्साहन दिले. अध्यक्ष नामदेव लोंढे, सचिव नामदेव लोणारे व संचालक मंडळानेही तिचे कौतुक केले.

 

The future is written on the wall; Shraddha’s ‘top’ leap in 12th

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *