देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे, तितकेच देवीलाही आहे, हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते. भारतात अन्य संप्रदायांप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे. पंचायतन पूजेत शिव, विष्णू, गणपती आणि सूर्य यांसमवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच दरवर्षी नवरात्रोत्सव देशभर साजरा केला जातो.
भारतात विविध संप्रदाय कार्यरत आहेत. या संप्रदायांनुसार संबंधित देवतेची उपासना प्रचलित आहे. गाणपत्य, शैव, वैष्णव, सौर्य, दत्त आदी संप्रदायांप्रमाणे शाक्त संप्रदायाचे अस्तित्वही प्राचीन काळापासून भारतात आहे. शाक्त संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे शक्ती उपासना करणारे अनेक शाक्त भारतात सर्वत्र आढळतात. आद्य शंकराचार्यांनी पंचायतन पूजेची प्रथा भारतात चालू केली. त्यात देवीचे स्थान महत्त्वाचे आहे. भारतात ज्या उपास्यदेवतांची उपासना केली जाते, त्या प्रमुख पाच देवतांपैकी एक शक्ती, म्हणजे देवी आहे. तंत्रशास्त्राचे पालन करणारे तांत्रिक तंत्रशास्त्राचे जनक सदाशिवाची उपासना करतात, त्याप्रमाणे त्रिपुरसुंदरी, मातंगी, उग्रतारा आदी तांत्रिक शक्तींचीही उपासना करतात. शिवाप्रमाणेच शक्तीही तंत्रशास्त्राची आराध्य देवता असल्याचे सुस्पष्ट होते.
पार्वतीमाता ही शिवाची अर्धांगिनी असली, तरीही शिवाकडून गूढ ज्ञान प्राप्त करताना पार्वतीची भूमिका एखाद्या जिज्ञासूची असल्याचे जाणवते. तीव्र जिज्ञासेपोटी तिला तहानभूक आणि झोप यांचेही भान राहत नाही. ज्ञानप्राप्तीच्या लालसेने ती शिवाला अनेक प्रश्न विचारते. यातूनच शिव-पार्वतीचा वार्तालाप किंवा त्यांचे संभाषण यांचा उल्लेख पुराणांत झालेला आढळतो. पार्वती स्वतः आदिशक्ती असली, तरी गुरुसमान असणार्या शिवाकडून ज्ञानार्जन करण्यासाठी ती जिज्ञासू आणि मुमुक्षु यांचे मूर्तिमंत स्वरूप बनते. त्यामुळेच शिवाने पार्वतीला तंत्रशास्त्राचे गूढ ज्ञान दिले. पार्वतीने शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले होते. केवळ झाडाची पाने खाऊन राहिल्यामुळे पार्वतीला अपर्णा हे नाव प्राप्त झाले. पार्वती हिमालयराजाची कन्या आणि राजकुमारी होती. ती सुंदर व सुकोमल होती, तरीही शिवाला प्रसन्न करण्याचा तिचा दृढनिश्चय असल्यामुळे तिने देहाची तमा न बाळगता बर्फाने आच्छादलेल्या प्रांतात विशिष्ट मुद्रा धारण करून प्रदीर्घकाळ तप केले. तिच्या तपाची उग्रता इतकी होती की, त्यातून निर्माण झालेल्या ज्वाळा संपूर्ण ब्रह्मांडात पसरत होत्या आणि स्वर्गावर अधिपत्य मिळवलेल्या तारकासुरालाही भयभीत करून टाकणार्या होत्या. नवदुर्गांपैकी ब्रह्मचारिणी हे रूप हातात जपमाळ घेऊन तापसी वेश धारण केलेल्या तपस्यारत पार्वतीचेच प्रतीक आहे. पार्वतीला अपर्णा आणि ब्रह्मचारिणी या नावांनीही संबोधले जाते. कैलासावर निवास करत असताना स्नानाच्या वेळी कक्षाच्या पहार्याची सेवा करण्यासाठी पार्वतीने अंतःप्रेरणेने स्वतःच्या मळापासून गणपतीची निर्मिती केली. सुरक्षेच्या वैयक्तिक कारणास्तव जरी गणपतीची निर्मिती केलेली असली, तरी पार्वतीमुळे जगताला आराध्य दैवत श्रीगणेश लाभले आहेत, हे त्रिवार सत्य आहे. देवी कौशिकीची निर्मितीही अशाच भावातून झालेली आहे. समुद्रमंथनाच्या वेळी मंदराचल पर्वताने स्वतःमध्ये शोषून घेतलेल्या विषाच्या प्रभावापासून त्याची मुक्तता करण्यासाठी शिवासमवेत गेलेल्या पार्वतीने त्याच्यावर करुणामय दृष्टीने कृपा केली. तेव्हा मंदराचलातून बाहेर पडणारा विषारी वायू शिवशंकर स्वतः शोषून घेत असताना काही अंशाचा परिणाम पार्वतीवर होऊन ती काळी झाली. उमेला तिचा गौरवर्ण अतिशय प्रिय असल्याने पुन्हा गौर वर्ण प्राप्त करण्यासाठी तिने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी तपाला आरंभ केला.
तिच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी तिला गौर वर्ण पुन्हा प्रदान केला. त्याच वेळी तिच्या श्यामवर्णातून कौशिकी नावाच्या देवीची निर्मिती केली. या देवीने पुढे शुंभ-निशुंभ या दैत्यांचा वध केला. यावरून स्वतःच्या श्यामवर्णाचे निमित्त साधून पार्वतीने जगाला त्रस्त करणार्या शुंभ-निशुंभ या दैत्यांचा संहार करणार्या देवीची निर्मिती केली. श्रीगणेशाचा शिरच्छेद केल्याचे समजल्यावर पार्वती विव्हल होऊन रुदन करू लागते आणि पुढच्याच क्षणी नवदुर्गेचे उग्र रूप धारण करून देवतांना कठोर वचन सुनावते. गणपतीला हत्तीचे मस्तक लावल्यानंतर पार्वतीचे उग्र रूप शांत होऊन ती उमेचे रूप धारण करते. देवी कौशिकीवर प्रहार करण्यासाठी आलेल्या असुरांना दंड देण्यासाठी पार्वती चंडी, चामुंडा, असे उग्र रूप धारण करून असुरांचा संहार करते आणि दुसर्याच क्षणी पुत्रीसमान असणार्या कौशिकीच्या प्रेमापोटी काळजीने व्याकूळ होते.
ब्रह्मदेवाकडून अजेय होण्यासमवेत चारही वेद प्राप्त करणार्या दुर्गमासुरामुळे धर्माला अवकळा प्राप्त झाली होती. अशा परिस्थितीत देवतांचे बळ क्षीण झाले होते. तेव्हा दुर्गमासुराला केवळ स्त्रीशक्तीच नष्ट करू शकत होती. कारण अन्य देवतांकडून अवध्य असण्याचे वरदान दुर्गमासुराला प्राप्त झालेले होते. तेव्हा पार्वतीने आदिशक्तीचे स्वरूप प्रगट करत श्री दुर्गादेवीचे रूप धारण केले आणि दुर्गमासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. महिषासुराचा वध करण्यासाठी पार्वती, लक्ष्मी अन् सरस्वती या तिन्ही देवींची शक्ती एकत्रित होऊन त्यातून महिषासुरमर्दिनी देवीची निर्मिती झाली. मायावी शक्तीच्या साहाय्याने युद्ध करणार्या महिषासुराला पराभूत करून देवीने त्याचा शिरच्छेद केला. पार्वतीने चामुंडा रूप धारण करून चंड-मुंड या दैत्यांचा संहार केला. कालीचे रूप धारण करून असंख्य असुरांचा वध करून देवतांना अभयदान दिले.
The Glory of the Goddess
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…