– मुकुंद बाविस्कर
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला रामकुंड येथे ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने औपचारिक सुरुवात झाली. जय श्रीरामच्या जयघोषात आणि वेदमंत्रोच्चारात झालेल्या या सोहळ्यात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, विविध सामाजिक व धार्मिक संघटना, तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली. श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातर्फे पवित्र रामकुंड येथे हा सोहळा घेण्यात आला होता.
यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, जगद्गुरूरामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, संजयदास महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्यासह विविध आखाड्यांचे संत-महंत उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. शंखनाद, मंत्रोच्चार आणि टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. पुरोहित संघाच्या सदस्यांनी वेदमंत्रोच्चार केले. यावेळी परिसरात भक्तिमय आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
मेलोडियस क्लबतर्फे रंगली मैफल
विविध संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली व अनेक गायक, गायिकांनी गायलेली सुमधुर गाणी ऐकण्याची संधी नाशिककर रसिकांना मिळाली. द म्युझिकल लेगसी मैफलीत सादर झालेल्या गाण्यांनी बहार आणला. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मैफल उत्तरोत्तर रंगली. महाकवी कालिदास कलामंदिरात ही विनामूल्य मैफल झाली. संयोजक उदय बापू पाटील यांनी स्वागत केले. डॉ. प्रकाश पाटील, डॉ. संजय वराडे, हरीश ठक्कर, अनिल पोटे, प्रकाश गोसावी, सरोज भायभंग, मनीष अहिरे, मोनादीदी आदी उपस्थित होते. मराठी गाण्यांना रसिकांची विशेष पसंती लाभली. एल. एस. ब्रदर्स यांनी उदय व जयश्री पाटील यांची सुंदर चित्रे रेखाटली.
नाशिकची भूमी ही दिव्य क्रांतिभूमी
नाशिक क्षेत्राचे गुणवैशिष्ट्य म्हणजे, ही क्रांतिभूमी आहे. क्रांतीच्या मुळातच दोन तेजस्वी तत्त्वे सामावली आहेत. एकतर स्वधर्म आणि दुसरे स्वराज्य. यासाठी आपल्या पवित्र भूमीचे वेगळेपण इतिहासाच्या पृष्ठावर सुवर्णाक्षराने उमटले गेले आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक देवेंद्रनाथ पंड्या यांनी केले. रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने गोदावरी सेवा सत्संगादरम्यान देव, देश आणि धर्मासाठी… या विषयावर ते बोलत होते. यावेळी मंचावर समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, तसेच नृसिंह कृपादास प्रभू यांची उपस्थिती होती. गोदाघाटावरील चित्पावन मंगल कार्यालय येथे हे व्याख्यान झाले. दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहनांनी याच भूमीत क्षत्रपांचा निःपात केला होता.
संगिनी महिला मंडळातर्फे जनजागृती
संगिनी महिला जागृती मंडळातर्फे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ऑनलाइन निबंध, कविता व चित्रकला स्पर्धा झाली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ हुतात्मा स्मारकात झाला. यावेळी संगिनी महिला जागृती मंडळातर्फे निबंध, कविता आणि चित्रकला स्पर्धांमधील विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी अॅड. श्यामला चव्हाण म्हणाल्या, की आजच्या काळात महिला विविध क्षेत्रांत कार्यरत असून, त्यांना केवळ मासिक पाळीच्या दिवसांतच नव्हे, तर इतर वेळीही शारीरिक व मानसिक विश्रांतीची गरज असते. मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर करून वैज्ञानिक व संवेदनशील दृष्टिकोन समाजात रुजविणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
मानवधन संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात
मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश कोल्हे लिखित ’अरे माणसा, उठ तू जागा हो’ या पुस्तकाचे प्रकाशन परशुराम साईखेडकर नाट्यगृहात उत्साहात झाले. प्रकाश दायमा, अजिंक्य वाघ, सुनील कुटे, आ. सीमा हिरे व दीपचंद सिंग यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाला महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी प्रस्तावना दिली आहे. मानवी मूल्ये, सामाजिक बांधिलकी व आत्मजागृतीचा संदेश देणार्या पुस्तकाचे मान्यवरांनी कौतुक केले. या कार्यक्रमात मानवसेवा जीवनगौरव पुरस्कार देऊन केशव गावित यांचा सन्मान करण्यात आला. अपंगत्वावर मात करून विश्वविक्रमात नोंद करणारे सागर बोडके यांचा विशेष गौरव करण्यात आला. संस्थेतील शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचाही गौरव करण्यात आला.
शाल ही काव्यरत्नांची पुस्तकाचे प्रकाशन
शाल ही काव्यरत्नांची या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मातृभूमी प्रबोधन हॉलमध्ये झाला. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गंगाधर आहिरे, अविनाश आहेर, महामंडलेश्वर नंदगिरी, एन. एस. साळवे, प्रसाद जामखिंडीकर, लेखिका शालिनी भालेराव आदी उपस्थित होते. सामाजिक, राजकीय विषयांवर अतिशय चिंतनशील कवितांबाबत लेखिका शालिनी भालेराव यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. याप्रसंगी प्रा. गंगाधर आहिरे म्हणाले की, एका स्त्रीने आपल्या मनातील विचार कागदावर उतरविणे आणि त्याचा काव्यसंग्रह प्रकाशित करणे, ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे (अतिरिक्त कार्यभार) यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेे. स्पंदन-2026 मधील विजेते विद्यार्थी संघ व विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या एकत्रित सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. कौशिक, संजय मराठे, संदीप राठोड, अमृता खार्डेकर, रवींद्र रांधव, नाना परभणे, चेतना पवार, उल्हास कुलकर्णी यांनी विविध हिंदी व मराठी गीते सादर केली. यंदाच्या स्पंदन राज्यस्तरीय युवा महोत्सव स्पर्धेतील निवडक विजेत्यांनी कलाप्रकार सादर केले. यात सोलापूर येथील साई
आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वॉय नॉट ही एकांकिका सादर केली.
मुक्त विद्यापीठात फुले समग्र वाङ्मय ग्रंथ वितरण
सन 2026 हे वर्ष महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जन्म वर्ष म्हणून केंद्र व राज्य शासन विविध उपक्रमांद्वारे साजरे करत आहे. त्याअंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङ्मय ग्रंथ वितरण कार्यक्रम विद्यापीठातील सावित्रीबाई फुले अध्यासनाद्वारे आयोजित केला होता. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक संतोष चव्हाण, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी सुदर्शन चव्हाण, महाज्योती नाशिक विभागाच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रा. प्रतिमा पगार, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. संजीवनी महाले, सावित्रीबाई फुले अध्यासन प्रमुख डॉ. रामदास भोंग यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यापीठातील प्राध्यापक अभ्यासकांना 125 ग्रंथांचे वाटप करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या.
सावानात साने गुरुजी स्मृतिदिन
सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे थोर साहित्यिक, समाजसेवक पांडुरंग सदाशिव साने अर्थात, साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव गिरीश नातू, सहाय्यक सचिव जयेश बर्वे, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर, ग्रंथसचिव देवदत्त जोशी, बाल भवन प्रमुख सुरेश गायधनी, पुस्तक मित्रमंडळ प्रमुख मंगेश मालपाठक, व्यवस्थापक दिलीप अहिरे यांच्या हस्ते साने गुरुजींंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात साने गुरुजींंचे साहित्य, त्यांचे राष्ट्रप्रेम, समाजसेवेची तळमळ आणि विद्यार्थ्यांप्रति असलेले प्रेम याविषयी करंजकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा समाजाला आजही प्रेरणादायी वारसा लाभत असल्याचे गिरीश नातू व जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.
The Goda Ghat resounded with the clarion call marking the preparations for the Simhastha Kumbh Mela.