समाधान व्यक्त : मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरामध्ये ‘आपले नाशिक, हरित नाशिक’ या मोहिमेंतर्गत दुसर्या टप्प्यात पंचवटी परिसरात 7 एकर परिसरामध्ये सुमारे 2 हजार वृक्षलागवड करून नंदनवन फुलले आहे. या 7 एकरातील बहरलेल्या वृक्षांची पाहणी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी काल केली.
एन.आय.टी. महाविद्यालयाने नाशिक महापालिकेच्या जागेची स्वच्छता मोहीम राबवून वृक्षलागवडीसाठी जागा तयार करून घेतली आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या कामी पुढाकार घेऊन वृक्षलागवड, संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे.
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी काल भेट देऊन वृक्षांची पाहणी केली आहे. नाशिक शहरामध्ये 15000 वृक्षलागवडीचा संकल्प केला असल्याचे यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगून लागवड केलेले शंभर टक्के वृक्ष हे जगले आहेत. नाशिक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांची योग्य ती निगा राखण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे सर्वच झाडे व्यवस्थित वाढतील व जगतील. येणार्या काळातदेखील नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येईल, वा हरित नाशिक संकल्प साकार केला जाईल, असेही शेवटी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी उद्यान विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सुरेश पाटील, नीलेश बोरा, नगरसेवक धनंजय माने, बापू पिंगळे, स्वप्नील नन्नावरे, नगरसेविका जुई शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
म्हसरूळ येथील सीताकुंडाची पाहणी
नाशिक शहरातील विविध रस्त्यांची पाहणीदेखील मंत्री गिरीश महाजन यांनी केली. नाशिक प्रभाग क्रमांक 1 मधील प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सीताकुंडाचीदेखील पाहणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. सीताकुंडाची साफसफाई व स्वच्छता करण्याबरोबरच तेथे आवश्यक सुधारणा करण्यासाठी बांधकाम करण्यात येऊन दुरुस्ती करण्यात यावी, असे निर्देश यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिले. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त रमाने, बापू पिंगळे, स्वप्नील नन्नावरे, नगरसेविका जुई शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
The green belt in Panchavati has blossomed.