इस्त्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर अट्टहासाने युद्ध लादले आणि जगाला वेठीस धरले. गेल्या वर्षीदेखील पॅलेस्टाइनबरोबर असेच मिनी युद्ध झाले होते तेव्हा अमेरिका-इस्त्रायलला माघार घेण्याची वेळ आली. स्वतःला जगाचा पोलीस अशा तोर्यात वावरणार्या अमेरिकेकडून नेहमीच दंडेलशाही केली जाते. इराणमधील तेलावर कब्जा मिळवायचा आहे आणि त्यासाठी अमेरिका इस्त्रायलला पुढे करून इराणमधील सत्ता उलथवून टाकायची आणि आपल्या मर्जीतील सरकार आणून तेल व्यापारावर नियंत्रण मिळवायचे, हा अमेरिकेचा अट्टहास आहे.
आता 17 दिवस झाले तरी युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.अमेरिकेच्या शक्तीपुढे इराण कितीकाळ तग धरणार असे वाटत असताना इराण वरचढ ठरू लागला आहे, असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे आणि अमेरिकेने केलेली नसती उठाठेव अंगाशी येऊ लागली आहे. मात्र, या युद्धाने जगाची चिंता वाढवली आहे. याला कारण म्हणजे आखाती देशांकडून होणारा तेलपुरवठा आणि त्यावर जगाचे अवलंबून असलेले अर्थकारण. त्यातच इराणचा ताबा असलेली होर्मुझ सामुद्रधुनी इराणने वाहतुकीसाठी बंद केली आणि केवळ मित्र देश असलेल्या चीन व रशिया यांच्या जहाजांना वाहतुकीची परवानगी दिली आहे. इराण आजवरचा भारताचा जुना मित्र. इराणकडून भारताला तेलपुरवठा होत होता. मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे आपण इराण तसेच रशियाकडून तेल खरेदी कमी केली. याचा परिणाम आता देशात गॅस, तेलपुरवठ्यावर जाणवू लागला आहे. तसा तो इतर देशांमध्येदेखील जाणवत आहे.
संकट काळात सर्वांनी एकजूट होऊन संकटाचा सामना केला पाहिजे आणि यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, हे अपेक्षित आहे. मात्र, गॅस तुटवड्याची चाहूल लागताच सरकारने घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसची किंमत वाढवली. व्यावसायिक गॅसचे बुकिंग बंद झाले, घरगुती गॅस बुकिंगचा कार्यकाळ वाढवला, त्यामुळे साहजिकच जनतेत संभ्रम निर्माण झाला आणि या संकटात लुटीची संधी जिकडेतिकडे साधली जात आहे. कुठे ब्लॅकने गॅस विक्री होत आहे, तर कोणाकडे मोठ्या संख्येने गॅस सिलिंडर सापडत आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक, औद्योगिक कारखाने, छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय काही प्रमाणात बंद होत आहेत. गॅससाठी लांबच लांब रांगा लागत आहेत, तर अनेक ठिकाणी हाणामारीचे प्रसंग ओढवत आहेत. त्यातच संकटात लुटीची संधी साधत काही विमान कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली आहे. सरकारकडूनदेखील अधिकृत माहिती वेळेत दिली नाही. दहा- बार दिवसांनंतर पेट्रोलियममंत्र्यांनी संसदेत निवेदन केले.
गॅस इंधनाचे संकट आहे मात्र, सरकार ते खुल्या मनाने मान्य करत नाही. यामुळे अफवांचा बाजार आणि काळाबाजार दोन्हीही तेजीत आहे. काही ठिकाणी पाइपलाइनद्वारे तसेच सिलिंडरद्वारे पुरवठा सुरळीत आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांचे बुकिंग होत नाही की सिलिंडर मिळत नाही. सरकार म्हणते जनतेने पॅनिक होऊ नये, कोणीही अफवा पसरवू नये. मात्र, परिस्थितीच अशी असते की, जनतेच्या
मनात चलबिचल होणे अपरिहार्य ठरते.
अफवा पसरविणार्याविरुद्ध तसेच काळाबाजार, नफेखारांविरुद्ध कठोर कारवाई तितक्याच तत्परतेने होणे गरजेचे आहे. मात्र, अनेकदा कारवाया तोंडदेखलेपणाच्या ठरतात. कोरोना काळातदेखील अशीच परिस्थिती होती. तेव्हादेखील माणुसकीला काळिमा फासत अनेकांनी लुटीची संधी साधली होती आणि जनता लुटली गेली होती. डॉक्टरी, दवाखाने, हॉस्पिटल्स, मेडिकल यांच्या बरोबरच शाळा, शिक्षणसंस्था, शासन प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य यांनी लुटीची संधी साधली. नोटबंदी काळातदेखील जनता याच अनुभवातून गेली.
अजूनही युद्ध किती काळ चालेल याबाबत अनिश्चितता आहे आणि युद्ध संपल्यावरदेखील परिस्थिती सुधारण्यासाठी काही काळ जावा लागेल. जसजसे दिवस जातील तसतशी परिस्थिती बिकट होत जाणार. आधीच आर्थिक संकट, महागाई, बेरोजगारीचा सामना करताना सगळ्यांचीच दमछाक होत आहे. युद्धाचा परिणाम सर्वच गोष्टींवर होणार. अशावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांना पूरक भूमिका घेऊन जनतेला धीर द्यायला हवा. जनता तर सरकारवर विश्वास ठेवते, पण सरकारनेदेखील जनतेवर विश्वास ठेवायला हवा. या सगळ्यांत अफवांचा गरम बाजार तर तेजीत काळाबाजार मात्र सुरू
आहे.
The ‘hot’ market of rumors; the ‘black market’ is booming
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…