सटाणा प्रतिनिधी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मध्यप्रदेशमधील उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराच्या चांदीच्या गाभार्याची पॉलिश करण्याचा मान सटाणा शहरातील रेणुका ज्वेलर्सच्या जाधव बंधूंना मिळाला आहे. राहुल उर्फ दादू जाधव,गौरव जाधव यांना श्री महाकलेश्वर मंदिर प्रबंध समिति उज्जैनचे प्रशासक तथा अप्पर जिल्हाधिकारी यांनी श्री महाकालेश्वर मंदिराच्या चांदीच्या गाभार्याची पॉलिश करण्यासाठी शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी आमंत्रित केले असून 7 फेब्रुवारीपर्यंत जाधव बंधूंनी हे काम पूर्ण करावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
गत अनेक वर्षांपासून संत शिरोमणि देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सव काळात महाराजांच्या चांदीच्या मूर्तीची पॉलिश जाधव बंधु करत असून नाशिक येथील नवश्या गणपती मंदिरातील चांदीची पॉलिश करण्यासोबतच सिन्नरच्या कालभैरव मंदिरातील चांदीच्या मूर्त्यांची पॉलिश जाधव बंधूंकडून होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिर प्रबंध समितीने श्री महाकालेश्वरांच्या चांदीच्या गाभार्याची पॉलिश करण्याकामी सटाणा शहरातील रेणुका ज्वेलर्सचे राहुल उर्फ दादू जाधव,गौरव जाधव,रोहन भुजवा यांची नियुक्ती केल्याने शहरवासीयांकडून जाधव बंधूंचे अभिनंदन होत आहे.