सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर स्वराज्याची पहाट घेऊन आलेला दिवस म्हणजे 6 जून. फिरंगी तारखेप्रमाणे 6 जून 1674 (तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596) रोजी शिवाजीराजे भोसले सिंहासनारूढ होऊन छत्रपती शिवाजी महाराज झाले. शिवराजाभिषेक सोहळा हा भारतीय नाही, तर जगाच्या इतिहासात स्वाभिमानाची नांदी देणारा प्रसंग ठरला. इथूनच खर्या अर्थाने सुरू झाले मराठा साम्राज्याचे व सर्वसामान्य रयतेचे युग.
आग्रा सुटकेनंतर महाराज शत्रूच्या ताब्यात असणारे प्रदेश, गडकिल्ले स्वराज्याला वायुवेगाने जोडत होते. सर्वसामान्य रयतेने आधीच शिवरायांना आपला राजा म्हणवून हृदयात स्थान दिले होते. पण शिवाजी महाराज हे त्या काळातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संकल्पनांनुसार अभिषिक्त राजे नव्हते. औरंगजेब हा शिवरायांना एक साधारण जमीनदार म्हणून संबोधत होता. त्यामुळे स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून मान्यता मिळविण्यासाठी आणि स्वराज्याला वैधानिक स्वरूप देण्यासाठी राजाभिषेक आवश्यक होता. राजाभिषेक प्रयोग हा अत्यंत महत्त्वाचा विधी होता. यासाठी मुख्य पुरोहित म्हणून काशीचे प्रसिद्ध विद्वान व धर्मशास्त्रज्ञ गागाभट्ट यांना रायगडावर आमंत्रित करण्यात आले. गेल्या तीनशे-चारशे वर्षांपासून महाराष्ट्र हा पारतंत्र्यात होता. अनेक शतकांपासून हा राजाभिषेकाचा विधी झाला नव्हता. त्यामुळे या विधीविषयी फारशी माहिती नव्हती. गागाभट्ट हे मूळचे महाराष्ट्राचे. त्यांचे पूर्वज पैठणचे मोठे विद्वान होते आणि काशी विश्वेश्वर यांच्या अग्रपूजेचा मान त्यांच्या घराण्याला होता. गागाभट्ट यांचा धार्मिक ग्रंथांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी असंख्य ग्रंथांचा अभ्यास करून राजाभिषेक विधीची रचना केली.
गागाभट्ट यांंनी महाराजांच्या वंशावळीचा अभ्यास करून त्यांना मेवाडच्या सिसोदिया राजघराण्याचे क्षत्रिय वंशज असल्याचे मान्य केले. या निर्णयामुळे राजाभिषेकाच्या मार्गातील सर्व धार्मिक अडथळे दूर झाले. रायगड फुलांनी सजविण्यात आला. राजवाडे, रस्ते आणि प्रवेशद्वारे आकर्षक करण्यात आली. विविध रंगांचे ध्वज व पताका लावण्यात आल्या. गडावर येणार्या पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था केली.
रायगड त्या काळात जणू एखाद्या स्वर्गनगरीप्रमाणे दिसत होता. रायगडावर हिंदूंचे तख्त तयार झाले होते. देशविदेशातील लोक रायगडावर दाखल होत होते. यात ब्राह्मण विद्वान, सरदार, जहागीरदार, व्यापारी, परदेशी प्रतिनिधी यांचा समावेश होता. सर्वसामान्य रयत आपल्या राजाला छत्रपती होताना बघण्यास आतुरली होती. राज्याभिषेक सोहळ्याच्या विधींना सुरवात झाली. त्यात महाराजांवर उपनयन संस्कार करण्यात आले. त्यांची तुलाही करण्यात आली. सोने, चांदी, जस्त, धान्य, फळे, लोणी, कापड, मसाले, रत्ने वगैरे यांद्वारे तुला करण्यात आली. महाराजांच्या पट्टराणी सोयराबाई व इतर राणींबरोबर वैदिक पद्धतीनुसार पुनर्विवाह करण्यात आला. त्यामुळे शिवाजीराजांचा वैदिक पद्धतीनुसार वैदिक मंत्रांनी सपत्नीक राजाभिषेक करण्यासाठी त्यांना कोणतीही अडचण आता नव्हती. विवाहानंतर लगेचच राजाभिषेकाच्या मुख्य विधींना सुरवात झाली. त्यात श्रीगणेश पूजन, सोळा मातृकांचे पूजन, नांदी श्राद्ध, विनायक शांती, ऐंद्री शांती, ग्रहशांती, नक्षत्र यज्ञ, निऋती शांती असे धार्मिक विधी करण्यात आले. यानंतर राजाभिषेकाचा मुख्य दिवस उजाडला. तीन टप्प्यांत हा राजाभिषेक विधी करण्यात आला. पहिला टप्पा म्हणजे अभिषेक विधी. यात महाराजांना सुगंधी अत्तर, उटणे लावून त्यांच्यावर तूप, दूध, दही, पाणी व पवित्र नद्यांच्या जलाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांनी वितळलेल्या तुपात आपला चेहरा बघून त्यांनी मुखावलोकन केले. महाराजांनी शुभ वस्त्रे धारण केली आणि राजसभेकडे प्रस्थान केले. दुसरा टप्पा म्हणजे, सिंहासनारोहण. महाराज राजसभेत आले, बत्तीस मण सोन्याच्या सिंहासनावर ते पाय न लावता आरूढ झाले. गागाभट्टांंनी महाराजांवर छत्र धरले. याच वेळी महाराजांना ‘छत्रपती‘ ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर,महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती की जय..! अशी घोषणा गागाभट्टांंनी केली. ढोल, ताशे, नगारे, तुतारी या वाद्यांच्या निनादात ब्रह्मांंड देहभान हरपून बसले होते. राजाभिषेकाच्या वेळी गागाभट्टांंनी शिवाजी महाराजांना अधिकृतपणे क्षत्रिय व सार्वभौम राजा घोषित केले. यानंतर तिसरा टप्पा होता तो म्हणजे, राजदशर्र्नाचा. महाराजांनी हत्तीवर बसून रायगडावर फेरफटका मारला. नंतर ते राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी गेले. तिथे त्यांना चारही वर्णांतील सुहासिनींनी ओवाळले. नंतर पुन्हा महाराज राजसभेत आले. राजदर्शन पुन्हा सुरू झाले.
इथे हेन्री ऑक्झेंडन महाराजांना भेटायला आला. ऑक्झेंडनने आपल्या अहवालात राज्याभिषेकाचे वैभव वर्णन केले आहे. राजाभिषेक सोहळ्याचा विधी आठ दिवस चालला. या लेखात मी राजाभिषेक असा उल्लेख केला आहे. राजाभिषेक, राज्याभिषेक, पट्टाभिषेक या तीनही शब्दांचा एकच अर्थ होतो. पण शिवराजाभिषेक हा उल्लेख मला अधिक योग्य वाटला. कारण दोन समकालीन व्यक्ती ज्यांनी राजाभिषेक पाहिला. तसेच त्यांनीही त्यांच्या ग्रंथात राजाभिषेक हाच शब्द प्रयोग केला आहे. एक म्हणजे महाराजांचा राजाभिषेक केला असे गागाभट्ट. गागाभट्टांनी या राजाभिषेकावर एक छोटा असा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे नाव देताना त्यांनी शिवराजाभिषेक प्रयोग असे दिले आहे. दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांनीही त्यांच्या बुधभूषणम् या ग्रंथात. पहिल्या अध्यायातील सुरवातीच्या काही श्लोकात ते भोसले कुळाचे वर्णन करतात. त्यात बाराव्या श्लोकात त्यांनी राजाभिषेक हा शब्दप्रयोग केला आहे. हा सोहळा भूतो ना भविष्यति असा होता. कारण ‘शिवराय हे केवळ इतिहास नाहीत; ते राष्ट्रनिर्मितीची अखंड प्रेरणा आहेत.’
The king became Chhatrapati!