नाशिक

दिवे उजळले, पण श्वास कोंडला!

– अश्विनी पांडे

निसर्गाची मुक्त उधळण, आल्हाददायी हवामान, हिरवळ आणि तुलनेने शुद्ध हवा ही नाशिकची ओळख. मात्र, यंदा दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीने विदारक विरोधाभासी चित्र समोर आले. दिव्यांच्या प्रकाशात उजळलेल्या शहराच्या आकाशात धुराचे दाट आवरण निर्माण झाले आणि नाशिकच्या शुद्ध हवेचे प्रदूषणकारी हवेत रूपांतर झाले आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची अपेक्षा प्रशासनाकडून करताना आपण स्वतः किती जबाबदारीने वागतो, याचाही विचार आता प्रत्येक नागरिकाने करण्याची वेळ आली आहे.

नाशिक शहराला दिवसेंदिवस प्रदूषणाचा विळखा वाढत आहे. त्यात यंदा दिवाळीत हवा प्रदूषणाचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले. दिवाळीपूर्वी सुमारे 150 असलेला शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक लक्ष्मीपूजनानंतर 223 वर पोहोचला. काही स्थानिक निरीक्षणांमध्ये दिवाळीच्या रात्री निर्देशांक 900 ते एक हजाराच्या पुढे गेल्याचेही समोर आले. प्रदूषणाची कारणे केवळ फटाक्यांपुरती मर्यादित नाहीत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली रस्त्यांची खोदकामे, बांधकामांमधून उडणारी धूळ, वाहनांची वाढती संख्या, औद्योगिक उत्सर्जन आणि कचरा जाळण्याचे प्रकार यांचाही हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
हवा प्रदूषणाचे गंभीर परिणाम आरोग्यावरही होत असल्याचे अनेक वेळा दिसले आहे. फटाक्यांमधून बाहेर पडणारे पीएम 2.5 आणि पीएम 10 हे सूक्ष्म धूलिकण श्वसनसंस्थेत पोहोचतात. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, घशाची खवखव, खोकला, दम लागणे यांसारख्या त्रासांपासून दमा, फुफ्फुसांचे विकार, हृदयविकार आणि पक्षाघातासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी प्रदूषित हवा अधिक धोकादायक ठरते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 70 लाख अकाली मृत्यूचा संबंध वायुप्रदूषणाशी आहे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर-2025 अहवालानुसार, 2023 मध्ये भारतात वायुप्रदूषणाशी संबंधित 20 लाखांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने बांधकामस्थळी धूळ नियंत्रण, रस्त्यांची नियमित स्वच्छता, औद्योगिक उत्सर्जनावर देखरेख आणि नियमभंग करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. प्रदूषण मोजण्यापुरते न थांबता त्यावर नियंत्रणासाठी वर्षभर ठोस उपाययोजना व्हायला हव्यात.
प्रदूषण रोखण्याची जबाबदारी केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची किंवा महापालिकेची नाही. नागरिकांनीही अनावश्यक फटाके फोडणे टाळणे, कचरा न जाळणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून अपेक्षा करताना आपण स्वतः किती जबाबदारीने वागतो, याचाही विचार केला पाहिजे. राज्यात अनेक भागांत दुष्काळाचे चटके जाणवत असताना दिवाळीत मात्र फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा उन्माद पाहायला मिळाला. एका बाजूला पाण्यासाठी वणवण फिरणारी गावे, संकटात सापडलेला शेतकरी आणि टंचाईचे सावट, तर दुसरीकडे फटाक्यांच्या धुरात आणि कर्णकर्कश आवाजात हरवलेला उत्सवाचा आनंद या विरोधाभासातून सामाजिक संवेदनशीलता हरवत चालल्याचे दिसले. रात्री 8 ते 10 ही निर्धारित वेळ असतानाही अनेक भागांत मध्यरात्रीपर्यंत आतषबाजी सुरू होती. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसविण्यात आले. ध्वनी आणि वायुप्रदूषणाचे नियम पायदळी तुडवले जात असताना संबंधित यंत्रणांकडून नियमभंग करणार्‍यांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही. नाशिकचा विकास व्हावा, सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी भव्य व्हावी, पण या विकासाच्या धावपळीत शहराची शुद्ध हवा हरवू नये. उंच इमारती, रुंद रस्ते आणि झगमगाट यांच्याइतकीच स्वच्छ हवा हीदेखील शहराच्या प्रगतीची ओळख असली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नाशिककराचे कर्तव्य आहे. दिवाळीत दिवे लावण्याइतकीच स्वच्छ हवा जपण्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात उजळली, तरच नाशिकची ओळख आणि शहराचे आरोग्य टिकून राहील.

 

The lamps were lit, yet breath was stifled!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चहाच्या पिशव्यांमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…

15 hours ago

ताम्रपटातील प्राचीन नाशिक

- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…

16 hours ago

महागाईचे विष!

- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…

16 hours ago

सोनिया गांधींचे पुस्तक यशस्वी

- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…

16 hours ago

दिवाळी संपली; पुढे काय?

- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…

16 hours ago

विद्यार्थी : समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार

विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…

16 hours ago