स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सिन्नर : प्रतिनिधी
गेल्या महिन्यात सिन्नर तालुक्यातील मनेगाव, दोडी, दुशिंगवाडी, धोंडवीरनगर तसेच राहाता
तालुक्यातील देर्डे- कोर्हाळे शिवारातून मेंढपाळांच्या मेंढ्या चोरी करणार्या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्यास
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातून ताब्यात घेत गजाआड केले. मेंढ्या चोरट्यांचा तपास लागत नसल्याने गेल्या आठवड्यात मेंढपाळांनी नाशिक- पुणे महामार्गावर दोडी शिवारात रास्ता रोको आंदोलन केले होते.
रावल ऊर्फ राहुल कालू बंजारा (वय 21, रा. कछालिया, ता. तलेरा, जि. बुंदी, राजस्थान) असे स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. बंजारा याने आणखी सहा जणांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या टोळीने गेल्या महिन्यात मध्यरात्रीच्या सुमारास शेतवस्त्यांवर मुक्कामी असलेल्या मेंढपाळांच्या सुमारे 90 मेंढ्या चोरून नेल्या होत्या. याबाबत सिन्नर, वावी तसेच राहाता पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व वावी पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश शिंदे यांच्या पथकांनी आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत, तसेच महाराष्ट्र व परराज्यातील अभिलेखावरील आरोपींची माहिती घेऊनसदर घटनास्थळांवरील उपलब्ध भौतिक पुराव्यांचे अचुक तांत्रिक विश्लेषण केले. तेव्हा हे गुन्हेगार राजस्थानातील असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानात जाऊन सलग चार दिवस संशयित आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवली. कोटा शहर परिसरातून सराईत गुन्हेगार रावल ऊर्फ राहुल कालू बंजारा (वय 21, रा. कछालिया, ता. तलेरा, जि. बुंदी) यास शिताफीने ताब्यात घेतले.
या आरोपीस विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने अब्दुल बारी (रा. कोटा), राजू मदन बंजारा (रा. कछालिया, जि. बुंदी), लक्ष्मण मदन बंजारा (रा. कछालिया, जि. बुंदी), किसन कालू बंजारा
(रा. कछालिया गाव, जि. बुंदी), चिंटू कालू बंजारा (रा. कछालिया गाव, जि. बुंदी), बिंदू राजू बंजारा (रा. कछालिया गाव, जि. बुंदी, रा. राजस्थान) यांच्या मदतीने मेंढ्यांची चोरी केल्याची कबुली दिली. या आरोपींची टोळी ही दिवसा मेंढपाळ वस्त्यांवर पाहणी करून रात्री चारचाकी वाहनांमधून येऊन मेंढ्यांची चोरी करत असल्याचे निष्पन्न झालेे. चोरी केल्यानंतर या आरोपींनी आरोपी अब्दुल बारी याच्यामार्फत मेंढ्यांची विक्री केली. त्यातून मिळालेले पैसे आपापसांत वाटून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यातील आरोपीस वावी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात अटक करण्यात आलीआहे. त्याच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती इको कार(आरजे 20-यूबी 5627) जप्त करण्यात आली आहे. इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत असून, चोरीस गेलेल्या मेंढ्या कोणास व कोठे विक्री केल्याबाबत पुढील तपास करीत आहेत.
पकडलेल्या आरोपींंकडून मेंढ्या चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलिस अंमलदार माधव साळे, धनंजय शिलावटे, विनोद टिळे, दीपक गुंजाळ, सतीश हगुटे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विश्वनाथ धारबळे, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
राहुलवर राजस्थानातही शेळ्या चोरीचे गुन्हे
रावल ऊर्फ राहुल बंजारा हा या टोळीचा म्होरक्या असून, त्याच्यावर यापूर्वी राजस्थानात शेळ्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी राजस्थानातील कोटा व बुंदी जिल्हयातील ग्रामीण भागात शेळीपालनाचा व्यवसाय करत असल्याने त्यांना मेंढ्यांच्या कळपांबाबत माहिती होती. त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील महामार्गालगतचे मेंढपाळ वस्त्यांवर मेंढ्यांची चोरी करण्यासाठी ते सिन्नर तालुक्यात आल्याचे तपासात समोर आले.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…