लाईफस्टाइल

नवरात्रातल्या रंगांची ओढ

नवरात्र म्हटलं की, प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच जादू जागी होते. ढोल-ताशांचा गजर, देवीच्या आरतीचा मंगल नाद, गरब्याच्या तालावर थिरकणारे पाय आणि दररोज बदलणार्‍या रंगांचा तो आल्हाददायक अनुभव… हे सगळं मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. खास करून नऊ दिवसांचे नऊ रंग, ही नवरात्रीची परंपरा, आजच्या आधुनिक पिढीलाही तितकीच आकर्षित करते.

नाशिकसारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक नगरीत नवरात्र साजरी करण्याचा अनुभव तर अजून खास. पंचवटीच्या घाटावर देवीच्या आरत्या, चौकात लागलेले मंडप, कॉलेजमध्ये रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेले तरुण-तरुणी, तर जुन्या वाड्यांतल्या पारंपरिक पोथ्यांच्या वाचनामुळे वातावरण अगदी दिव्य होतं.
नऊ रंग, नऊ दिवस- भावना वेगवेगळ्या
प्रत्येक दिवशी ठरलेल्या रंगाचा पोशाख घालण्याची परंपरा गेल्या काही वर्षांत शहरात लोकप्रिय झाली आहे. सकाळपासून ऑफिसला, शाळा-कॉलेजला, बाजारात सगळीकडे तोच रंग झळकत असल्याचं पाहायला मिळतं. जणू एखाद्या अदृश्य धाग्याने समाज एकत्र बांधला गेला आहे.
पहिल्या दिवशी पिवळा रंग ः नवीन सुरुवातीची, प्रकाशाची खूण. दुसर्‍या दिवशी हिरवा ः निसर्गाशी नातं जोडणारा. लाल, पांढरा, निळा, गुलाबी, जांभळा, असे रंग जणू प्रत्येक दिवशी जीवनातील वेगवेगळ्या भावनांना उजाळा देतात.
लहानपणी नवरात्र म्हटलं की, फक्त देवीच्या मूर्तीचं दर्शन आणि प्रसादातील खीर-पुर्‍या आठवायच्या. पण कॉलेजच्या काळात या नऊ रंगांची ओढ वेगळीच जाणवली. सकाळी उठून आईला विचारायचं, आज कोणता रंग आहे? आणि मग कपाटात शोधाशोध सुरू व्हायची.
कपड्यांमधून रंगांची ओळख
नवरात्रातल्या या रंगपरंपरेमुळे प्रत्येकाच्या वेशभूषेत एक वेगळा आत्मविश्वास दिसतो. कॉलेजच्या वर्गात सगळेच विद्यार्थ्यांनी जर त्या दिवशीचा रंग परिधान केला असेल, तर एक वेगळंच एकोपा आणि उत्साहाचं वातावरण तयार होतं. नाशिकमधल्या गंगापूर रोडवरील कॉलेजात तरुणींच्या गटांनी जुळवून आणलेल्या साड्या आणि सलवार सूट्स पाहिले की, वाटतं नवरात्र हा फक्त धार्मिक सोहळा नाही, तर सामाजिक सलोख्याचंही प्रतीक आहे. तरुण मुलगेसुद्धा शर्ट, टी-शर्ट, रिबन अगदी रुमालापर्यंत तोच रंग वापरतात. कधीकधी तो रंग जुळवणं हेही एक रोमांचक काम असतं. कपाटात जर योग्य रंगाचा पोशाख नसेल तर मित्र-मैत्रिणींकडून उधार घेणे, आईच्या साड्यांमधून योग्य रंग शोधणे- या सगळ्यात एक मजा दडलेली असते.
गरबा आणि रंगांचा संगम
नवरात्र म्हटलं की, गरब्याचा उल्लेख केल्याशिवाय चालत नाही. संध्याकाळच्या थंड वार्‍यात, सजवलेल्या मंडपात ढोल-ताशांचा गजर सुरू झाला की पाय आपोआप थिरकायला लागतात. प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगात सजलेल्या तरुणी गरब्याच्या वर्तुळात फिरताना पाहिल्या की, नवरात्राची खरी जादू जाणवते. रंगीत पोशाख, चमकदार दागिने आणि प्रकाशझोतात झळकणारे हसरे चेहरे, यामुळे वातावरण जणू एखाद्या चित्रपटाच्या दृश्यासारखं वाटतं. नाशिकमधील कॉलेजांत आणि हाउसिंग सोसायट्यांमध्ये आयोजित गरबा नाइट्समध्येही या नऊ रंगांचं विशेष स्थान असतं. प्रत्येकाच्या पोशाखातून जणू देवीच्या विविध रूपांची झलक दिसते.
आठवणींची पेटी
लहानपणी शाळेतल्या नवरात्रातील निबंध स्पर्धा आठवते. त्यावेळेस आम्ही नवरात्रातले नऊ दिवस या विषयावर लिहिताना रंगांचा उल्लेख केल्याशिवाय लेख पूर्णच होत नव्हता.
आईने ठेवलेल्या देवीच्या मूर्तीजवळ रोज त्या दिवसाच्या रंगाचा फुलांचा हार चढवायचा हा नियम घरात काटेकोर पाळला जायचा. कधी चुकून तो रंग मिळाला नाही तर आई नाराज व्हायची.आजही त्या जुन्या फोटो अल्बममध्ये गुलाबी ड्रेस घातलेला माझा फोटो पाहिला की, नवरात्रातल्या त्या रंगांची आठवण मनाला गुदगुल्या करते.
आधुनिकतेसोबत परंपरेचा संगम
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर नवरात्र रंग हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. नाशिकमधल्या तरुणाईचे फोटो इन्स्टाग्रामवर बघितले की जाणवतं, परंपरा आता फॅशनमध्ये रूपांतरित झाली आहे. मॉल्स, रस्त्यावरील दुकाने, बाजारपेठ सगळीकडे नवरात्रातल्या रंगांचे कपडे, दागिने, अ‍ॅक्सेसरीज यांची मागणी वाढते. व्यापार्‍यांसाठीही हे दिवस उत्साहाचे असतात. अर्थात, रंगांची ही परंपरा फक्त बाह्य रूपापुरती मर्यादित नाही. नवरात्र आपल्याला जीवनात रंग भरायला शिकवतं. प्रत्येक दिवस वेगळ्या भावनेचं, वेगळ्या ऊर्जेचं प्रतीक असतो.
नवरात्रातल्या नऊ रंगांची ओढ ही फक्त कपड्यांपुरती नाही. ती मनाच्या रंगांची गोष्ट आहे. एकोपा, श्रद्धा, उत्साह, प्रेम, आनंद हे सगळेच रंग समाजाच्या कॅनव्हासवर उमटतात.
नाशिकसारख्या परंपरांनी नटलेल्या शहरात ही परंपरा अजूनच अर्थपूर्ण वाटते. घाटावरील आरत्या, कॉलेजातील रंगीत पोशाख, शेजारीपाजारींचा एकोप्याचा जल्लोष हे सगळं मिळून नवरात्राचा सोहळा अधिकच रंगतदार होतो.
प्रत्येक वर्षी नवरात्र संपल्यावर मन रिकामं वाटतं, पण या नऊ रंगांच्या आठवणी पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला आनंद देत राहतात. आणि म्हणूनच नवरात्र फक्त देवीचं पूजन नसून जीवनात रंग भरण्याचं एक सुंदर साधन आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago