चंद्र आहे साक्षीला!

आटवलेल्या दुधाचा आस्वाद घेत कोजागरी साजरी

नाशिक : प्रतिनिधी
शहरात सोमवारी (दि. 6) रात्री पारंपरिक आणि उत्साही वातावरणात कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. आकाशात उजळलेल्या पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात नागरिकांनी घराच्या गच्चीवर, सोसायट्यांत आणि उद्यानांत एकत्र येत कोजागरी साजरी केली. आटवलेले दूध, संगीत आणि खेळांमुळे शहर उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाले.
गंगापूररोड, कॉलेजरोड, पंचवटी, सिडको, इंदिरानगर या भागांत कोजागरीचे विशेष कार्यक्रम पार पडले. अनेक महिला मंडळे, युवक मंडळे, तसेच शाळा-महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा आणि हास्य स्पर्धा घेण्यात आल्या. काही ठिकाणी कोजागरी नाइट या नावाने संगीत कार्यक्रमाचे आयोजन झाले.
कोजागरी पौर्णिमेला शरद पौर्णिमाही म्हटले जाते. या रात्री चंद्राच्या किरणांचा आरोग्यावर आणि मनःशांतीवर सकारात्मक परिणाम होतो, असा समज आहे. त्यामुळे रात्री चंद्रप्रकाशात दूध पिण्याची परंपरा पिढ्यान् पिढ्या सुरू आहे. अनेक ठिकाणी कुटुंबीयांनी एकत्र येऊन चंद्रदर्शन करून गरमागरम दुधाचा आस्वाद घेतला.
दरम्यान, महाविद्यालयीन युवक-युवतींनीही यानिमित्ताने मित्रपरिवारासह सेलिब्रेशन केले. शहरात सर्वत्र शांततेत आणि आनंदी वातावरणात हा सण पार पडला. पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेण्यात
आली होती.

परंपरा आणि आरोग्य

शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांत औषधी गुण असतात, असा समज आहे. त्यामुळे या दिवशी चंद्रप्रकाशात दूध पिणे आरोग्यास हितावह मानले जाते.

दुधाच्या किमतीला उकळी!

कोजागरीला दुधाच्या मागणीत वाढ होत असल्याने दूध विक्रेत्यांकडून दुधाच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचे चित्र होेते. रविवारी (दि. 5) 85 रुपये लिटर असलेला दुधाचा भाव सोमवारी (दि. 6) शंभर रुपये लिटरपर्यंत पोहोचला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *