संपादकीय

अपघाताचे गूढ हवेत घिरट्या घालतंय..?

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूला एक महिना होऊन गेला आहे. मात्र, आरोपांची उड्डाणे काही थांबत नाहीत. अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असलेले रोहित पवार यासंदर्भात अनेक आरोप करत आहेत आणि त्यांची उत्तरे सरकार देत नाही. केवळ चौकशी सुरू आहे, तपास यंत्रणा तपास करत आहेत, अशी गुळमुळीत उत्तरे दिली जात असल्याने कुठे पाणी मुरतंय का, अशी शंका आता सर्वांना येत आहे.
गेल्या 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना कोसळले. तेव्हापासून यामागे घातपात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. आ. रोहित पवारांनी याबाबत अनेकदा प्रेझेंटेशन करत अनेक मुद्दे मांडले आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणात पोलिसांत तक्रार करण्यासाठीही प्रयत्न केले होते. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. यावरून हे प्रकरण दिसते तितके सोपे नसल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले आहे. आता तर एक गंभीर चूक समोर आली आहे. विमान अपघात चौकशी विभाग (एएआयबी)ने एक महिन्यानंतर चौकशीचा पहिला प्राथमिक अहवाल दिला. या अहवालात अनेक चुका आढळून आल्याने त्यांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातील पहिली चूक म्हणजे विमान झाडाला धडकून पडल्याचा अहवाल आहे. याला आ. रोहित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही आक्षेप घेतला आहे.
कोणत्या झाडाला धडकून विमान कोसळले, असा प्रतिप्रश्न रोहित पवार यांनी केला आहे. कारण झुडपांची उंची आणि विमानाची उंची यांची तुलना करता येत नाही, असे सांगत त्यांनी एएआयबीचा हा मुद्दा खोडून काढला आहे. या अहवालात आणखी एक चूक आढळल्याचे रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यात बारामतीचा उल्लेख जिल्हा आणि बारामती महापालिका असल्याचे नमूद केले आहे. यावरून एएआयबी तपासाच्या बाबतीत खरोखरच गंभीर आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. रोहित पवार यांच्या आरोपानंतर एक महिन्याने डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली. म्हणजेच त्यांना नक्कीच काही त्रुटी आढळल्या आहेत.
ज्याप्रमाणे रोहित पवार आरोप करत आहेत तो घाव कुणाच्या तरी नक्कीच वर्मी लागत असेल, अन्यथा हे आरोप खोटे आहेत, असे एएआयबी किंवा डीजीसीएने स्पष्ट केले असते. या आरोपांवर कळस म्हणजे रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. याच व्हीएसआर कंपनीच्या विमानाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जात असताना नियमांचे उल्लंघन केले म्हणून विमान पाडण्याचा इशारा इराण आणि इराकने दिला होता. परवानगी न घेता विमान दुसर्‍या देशाच्या हद्दीत घुसत असेल तर त्या देशांचा तो अधिकार आहे. मात्र, अशी परवानगी न घेणे, ही संबंधित कंपनीची घोडचूक आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे अधिकारी या विमानात होते. व्हीएसआर कंपनीचा कारभार किती बेमुर्वतपणे सुरू आहे, याचा हा उत्तम नमुना आहे. ही घटना जानेवारी 2023 मधील आहे. रोहित पवार यांच्या या आरोपाने राज्यातच नव्हेस तर देशात खळबळ उडाली आहे.
तत्पूर्वी, तीन दिवसांपूर्वी जय अजित पवार यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. याच व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या विमानात कंपनीचा मालक कॉकपिटमधील पायलटच्या खुर्चीत खुशाल झोपलेला होता. ही केवढी गंभीर बाब आहे. मुळात पायलटच्या खुर्चीत बसून कुणी आरामात कसा झोपू
शकतो? एवढे असूनही या कंपनीच्या सर्व विमानांवर डीजीसीएने अजून संपूर्ण कारवाई केलेली नाही. डीजीसीएने केवळ व्हीएसआर कंपनीची काही विमाने जमिनीवर उतरवली आहेत. या कंपनीवर एवढे आरोपही होऊनही त्यांच्यावर अजून म्हणावी तशी कठोर कारवाई झालेली नाही. त्यामुळे व्हीएसआर कंपनीची कोण पाठराखण करत आहे, असा सवाल रोहित पवार करत आहेत. पवार यांनी याआधी तीन पत्रकार परिषदा घेऊन वेगवेगळे आरोप केले होते.
आता चौथ्या पत्रकार परिषदेत त्यांनी अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली होती, असा आरोप करत याचा गुन्हेगारी पद्धतीने तपास केला पाहिजे, अशी मागणी केली. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार वारंवार प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यातून अनेक शंकांना वाव मिळत आहे.
शिवाय त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याला अजून सरकारने होकार दिलेला नाही. एकूणच अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोबत व्हीएसआर कंपनीच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळेच या सर्व शंकांना कधी पूर्णविराम मिळेल आणि अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरील सावट कधी हटणार, हे महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्रकरणाला जी विविध वळणे मिळत आहेत ते पाहता ही चौकशी आहे की चौकशीचा फार्स, असे अनेकांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.

The mystery of the accident is hanging in the air..?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago