नाशिक

सप्तशृंगगडावरील निसर्गसौंदर्याची तरुणाईला भुरळ

धबधबे प्रवाहित, घाटरस्त्यावर वाहन सावकाश चालवण्याचे आवाहन

दिंडोरी : प्रतिनिधी
सह्याद्री पर्वताच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे 4,600 फूट उंचीवर असलेला भाविकांचे श्रद्धास्थान असलेला सप्तशृंगगड बरसणार्‍या पावसामुळे हिरव्या भरजरी शालूने नटला आहे. गडावरील बहरलेल्या निसर्गसौंदर्याची भाविकांबरोबरच तरुणाईला भुरळ पडली आहे. येथील शांत वातावरणात धबधब्यांचा आनंद दूरवरून लुटावा, अशी इच्छा भाविकांची होत असते. घाटरस्त्यावर वाहने सावकाश चालवा, अशी सूचनावजा माहिती त्यांना स्थानिकांकडून देण्यात येत आहे.
गडावर कधी जोरदार, तर कधी रिमझिम या दुहेरी वातावरणाच्या मिलापाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या आठ-दहा दिवस झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने गडावरील निसर्ग खुलला आहे. गडावरील दर्‍याखोर्‍यांतील छोटे-मोठे धबधबे प्रवाहित होऊन चोहीकडे मनसोक्त बरसू लागले आहेत. त्यातच बहरलेल्या वृक्षवेली, उमललेली रानफुले, कारवीची निळ्याशार रंगाची फुले पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.
त्यातच दाट धुक्याच्या झालरीमुळे गडावरील सृष्टिसौंदर्य पर्यटकांबरोबरच भाविकांनाही मोहित करत आहे. त्यामुळे भक्तीसह निसर्गमय असा दुहेरी आनंद लुटण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. दरम्यान, गडाच्या घाटरस्त्यावर डोंगराच्या कड्यावरून कोसळणार्‍या धबधब्यांबरोबर लहान-मोठे दगड येत असल्याने भाविक, पर्यटकांनी धबधब्याखाली न जाता दूरवरूनच आनंद लुटण्याची आवश्यकता आहे. याबाबत माहिती फलकही लावण्यात आले आहे. घाटरस्त्यावर व पठारी भागात दाट धुके असल्याने भाविकांनी वाहने सावकाश चालविण्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रदक्षिणा मार्ग धोकादायक
नांदुरी-सप्तशृंगगड घाटरस्त्यात छोट्या-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने संबंधित विभागातर्फे जाळी बसविण्याचे कामही करण्यात आले आहे. या भागात वाहने थांबवू नयेत, याबाबत ग्रामपंचायतीने सूचना दिल्या आहेत. गडावरील प्रदक्षिणा मार्ग सर्वांंत धोकादायक असून, हा मार्ग गेल्या सहा वर्षांपासून बंद केला आहे. तरीही काही भाविक या भागात शिरकाव करतात. या मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात. सप्तशृंगगडावर जाताना वळणाचा घाटरस्ता असून, भाविकांनी आपले वाहन काळजीपूर्वक चालवावे जेणेकरून अपघात होणार नाही.

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago