प्रत्येक फोनवर अॅपशिवाय अनोळखी कॉलरचे नाव दिसणार, सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : प्रतिनिधी
अनोळखी नंबरवरून येणार्या कॉलमुळे हैराण झाला आहात? आता टेन्शन संपलं. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (डीओटी) ऐतिहासिक निर्णय घेत, देशभरात कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनएपी) सेवा सक्तीची केली आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2026 पासून तुमच्या मोबाइलवर अनोळखी नंबरसोबतच त्या व्यक्तीचे नावही दिसणार आहे, तेही कोणतेही अॅप डाउनलोड न करता.
डीओटीने 13 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, एअरटेल, जिओ, व्हीआय आणि बीएसएनएल या सर्व टेलिकॉम कंपन्यांना फोर-जी आणि फाइव्ह-जी नेटवर्कवर कॉलर नाव दाखविणे (सीएनएपी) डीफॉल्टने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारने सिक्युरिटी-बाय-डिझाईन चा नियम घातला आहे. म्हणजे कॉल संपताच ऑपरेटरला ते नाव त्यांच्या सिस्टममधून डिलीट करावे लागेल. ते नाव साठवून ठेवता येणार नाही.
कोणाला फायदा?
सध्या ही सेवा फक्त 4-जी आणि 5-जी वर लागू होणार आहे. 2-जी, 3-जी आणि लँडलाईनसाठी नंतर विचार केला जाईल. यामुळे स्पॅम, फसव्या कॉलवर आळा बसेल आणि ग्राहकाला कॉल घ्यायचा की नाही, हे ठरवणे सोपे होईल. ट्रू-कॉलरचे दिवस संपले का? याची चर्चा आता टेलिकॉम वर्तुळात रंगली आहे.
व्यवसायांसाठी विशेष सवलत
बिझनेस किंवा बल्क कनेक्शन असलेल्या कंपन्यांना त्यांचे ब्रँड नेम दाखवता येणार आहे. पण त्यासाठी नाव हे ट्रेडमार्क म्हणून नोंदणीकृत किंवा जीएसटी पोर्टलवर नोंदवलेले असणे बंधनकारक आहे. टेलिकॉम कंपनीकडून व्हेरिफिकेशन होईल.
कसं काम करणार सीएनएपी?
नंबर सेव्ह असेल तर तुमच्या फोनबुकमध्ये सेव्ह केलेले नावच दिसेल, नेहमीप्रमाणे. नंबर अनोळखी असेल तर : कॉल करणार्याच्या सिम रजिस्ट्रेशनच्या वेळी टेलिकॉम कंपनीकडे नोंदवलेले नाव स्क्रीनवर दिसेल. म्हणजे आता ट्रू-कॉलरसारख्या थर्ड-पार्टी अॅपच्या डेटाबेसवर अवलंबून राहावे लागणार नाही. माहिती थेट ऑपरेटरच्या व्हेरिफाइड डेटाबेसमधून येईल. परदेशी कॉल असेल तर : स्क्रीनवर नावाऐवजी इंटरनॅशनल कॉल असे लिहिलेले दिसेल.
The need for ‘Truecaller’ will come to an end starting November 1st