नाशिक

प्रभागातील मतदारसंख्या दहा ते बारा हजारांनी वाढणार; उमेदवारांचा लागणार कस

2017 वेळी प्रभागात 40 हजार मतदार; आता थेट 52 हजार

नाशिक : गोरख काळे
नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, निवडणूक शाखेत पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत प्रभागातील मतदारसंख्येचे गणित पूर्णपणे बदलणार आहे. कारण 2017 च्या निवडणुकीत एका प्रभागासाठी सरासरी 40 हजार मतदारांचा प्रभाग असे चित्र होते; परंतु गत आठ वर्षांत मतदारसंख्या वाढली आहे. 2019 व 2024 या दोन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्याने मतदारसंख्या थेट पावणेचौदा लाखांपर्यत गेली आहे. परिणामी महापालिकेच्या एका प्रभागातील सरासरी मतदारसंख्या थेट 52 हजारांच्या पुढे जाणार आहे. यामुळे उमेदवारांचा निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे.
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेस गती मिळत असून, संभाव्य निवडणुकीपूर्वी शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. 2017 नंतर यावर्षी निवडणूक होत असून, या आठ वषार्ंत शहरातील मतदारसंख्येत तीन लाख मतदारांची म्हणजे प्रत्येक प्रभागात सरासरी दहा ते बारा हजार मतदारांची वाढ झाली आहे. वाढलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवणे, हे सर्व राजकीय पक्षांसाठी आव्हान ठरणार आहे. ओबीसी आरक्षण प्रकरण आणि विविध न्यायालयीन अडथळ्यांमुळे महापालिकेच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या.
या काळात दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुका पार पडल्या. शहरातील मतदारसंख्याही वाढली असून, प्रत्येक प्रभागात सरासरी दहा ते बारा हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2011 च्या जनगणनेच्या आधारे प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीवेळी दहा लाख 73 हजार 407 मतदारसंख्या होती. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत मिळून ती 12 लाखांच्या पुढे गेली आहे. महापालिका निवडणूक येईपर्यंत यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील सरासरी मतदारसंख्या थेट पन्नास हजारांच्या पार जाणार आहे.
वाढलेल्या मतदारांमुळे उमेदवारांची मात्र कमालीची धाकधूक वाढणार आहे. त्यातच नवीन प्रभाग रचनेदरम्यान सीमाबदल, जोडणी, तोडणी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रभागरचनेबाबत इच्छुकांमध्ये उत्सुकता आणि अस्वस्थता आहे. दरम्यान, वाढलेल्या मतदारसंख्येचा थेट प्रभाव निवडणुकीच्या निकालांवर होणार आहे. सध्यातरी राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांसमोर मतदारांना आकर्षित करण्याचे आव्हान असेल.

प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर?

प्रभागात जास्तीत जास्त मतदार असावेत, अशी भूमिका भाजपची आहे. 2017 साली भाजपचे सर्वाधिक 66 नगरसेवक निवडून आले होते. येत्या निवडणुकीत एका प्रभागातील मतदारसंख्या थेट पन्नास हजारांच्या पुढे जाणार असल्याने ते भाजपच्याच पथ्यावर पडणारे आहे.

प्रभागरचनेचा श्रीगणेशा!

महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख समिती असणार आहे. या समितीकडून शहरातील नदी, नाले, मोठे रस्ते, पूल, भौगोलिक चतुःसीमा विचारात घेऊन प्रभागरचना केली जात आहे. मात्र, याबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. 11 जूनपासून प्रभाग तयार करण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

सोशल मीडियासाठी स्वतंत्र टीम

महापालिका निवडणुकीसाठी काही इच्छुकांनी जोरात तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रभागातील नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियासाठी स्वतंत्र टीमची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी काही इच्छुक तयारी करत आहेत. सोबतच प्रभागात जनसंपर्क, प्रचार, मतदार यादीतील नावे, नवमतदारांचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान माजी नगरसेवकांसह इच्छुकांसमोर आहे.

गेल्या वेळी 821 उमेदवार रिंगणात

नाशिक महापालिकेसाठी एकूण 31 प्रभाग तयार करण्यात आले असून, त्यातून 122 नगरसेवक निवडून जातात. त्यावेळी 821 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदारांची संख्या दहा लाख 73 हजार 407 होती. यंदा उमेदवारांची संख्या हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

देवळाली मतदारसंघात साडेतीन प्रभाग

नाशिक पूर्व, पश्चिम व मध्य हे पूर्ण विधानसभा मतदारसंघ शहरात येतात. मात्र देवळाली मतदारसंघ 80 ते 85 टक्के ग्रामीणमध्ये मोडतो. शहरी भागात 19, 22, 31 असे पूर्ण प्रभाग येतात. प्रभाग 27 मधील काही भाग देवळालीत मोडतो. प्रभाग 19 मध्ये तीन सदस्य असून, उर्वरित दोन्ही प्रभागांत चार सदस्य असून, असे एकूण बारा नगरसेवक या साडेतीन प्रभागातून महापालिकेवर निवडून जातात. या प्रभागांतील मतदारसंख्या लाखाच्या आसपास गृहीत धरली, तरी महापालिका हद्दीतील मतदारसंख्या थेट पावणेचौदा लाखांपर्यंत जाईल.

जनसंपर्कासाठी खटाटोप

गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राजवट असल्याने बहुतेक माजी नगरसेवकांची जनतेशी असलेली संपर्काची नाळ तुटली आहे. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवक व इच्छुकांकडून प्रभागातील नागरिकांशी जनसंपर्क करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणूक लढविण्याची तयारी करताना अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुक पुन्हा लोकांशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपर्क करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.

पश्चिममध्ये सर्वाधिक मतदार

नाशिकमधील तिन्ही मतदारसंघांतील मतदारसंख्येचा तुलनात्मकद़ृष्ट्या पाहिले तर पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक चार लाख 83 हजार 495 मतदारसंख्या आहे. त्याखालोखाल पूर्व मतदारसंघ येतो.

विधानसभानिहाय मतदारसंघ (नोव्हेंबर 2024)
मतदारसंघ         पुरुष                               महिला                           एकूण
नाशिक पूर्व           2 लाख 10 हजार 66            1 लाख 99 हजार 161            4 लाख 9 हजार 239
नाशिक मध्य        1 लाख 75 हजार 14             1 लाख 70 हजार 196            3 लाख 45 हजार 393
नाशिक पश्चिम     2 लाख 57 हजार 420         2 लाख 26 हजार 67             4 लाख 83 हजार 495
एकूण                                                                                                           12 लाख 38 हजार 127

Gavkari Admin

Recent Posts

त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड, पोलिसही झाले चकित

पोलिसांपासून बचाव करण्यासाठी   त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड तीन वर्षांपासून फरार पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला अटक…

15 hours ago

हिट अँड रन: शाळेत जाणाऱ्या मुलीचा डंपरच्या धडकेने मृत्यू

डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ आज दि…

16 hours ago

नाराजीनाट्याचा बुरखा

राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती…

19 hours ago

आयारामांना पायघड्या; निष्ठावानांना संतरज्या!

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक…

19 hours ago

अपेक्षांच्या बळी मुली

नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने…

19 hours ago

अश्व धावले रिंगणी

इंदापुरात अविस्मरणीय रिंगण सोहळा इंदापूर : पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल…

20 hours ago