सावकार वैभव देवरेने बळकावलेल्या संपत्तीचे पोलीस करणार मूल्यांकन,

नाशिक : प्रतिनिधी
खासगी सावकार आणि खंडणीखाेर वैभव देवरेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्यावर दाखल पाच गुन्ह्यांतील दुसऱ्या गुन्ह्यांत ताे नव्याने अटक असून पाेलीस काेठडीची मुदत संपणार असल्याने आज(दि. २६) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, इंदिरानगर पाेलिसांनी देवरेच्या एकूण मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना पत्रव्यवहार केला आहे.
कमी कर्ज असूनही जास्तीची मुद्दल सांगत पंधरा पटीने वसुली करणाऱ्या संशयित वैभव यादवराव देवरे(रा. चेतनानगर) याच्या गुन्हेगारी स्वरुपाच्या व्याजवसुलीमुळे त्रस्त पाच ते सहा कर्जदारांनी फिर्याद नाेंदविल्या आहेत. त्यानुसार इंदिरानगर पाेलीसांत पाच स्वतंत्र गुन्हे दाखल असून व्यावसायिक विजय खानकरी यांना बारा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी देवरेविरुद्ध गुन्हा नोंद आहे. त्याच्या घरझडतीत पंधरा ते साेळा बँक खात्यांची पुस्तके, एका व्यक्तिसह हॉटेलचे पंचावन्न लाख रुपयांचे ‘बेअरर चेक’, पाच कार, एक ट्रॅक्टर व चार दुचाकी असल्याचे समोर आले. यासह सटाण्यात पाच एकरचे फार्म हाउस असून, पत्नीच्या नावे तीन फ्लॅट आहेत, असे आढळून आले. दरम्यान, (दि. १३) इंदिरानगरातील कर्जदार महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिने देवरेकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले. प्रतिमहा दहा टक्के दराने व्याजाचे तीस हजार रुपये दिले. तरीही देवरेने तिच्या दोन कार बळजबरीने ताब्यात घेतल्या. यासह अश्लील भाषेत शिवीगाळ करुन विनयभंग केला. तर, भाजपचे तत्कालिन पदाधिकारी जगन पाटील यांनाही २० लाख रुपयांचे कर्ज देत देवरेने व्याजासह तब्बल तीन कोटी रुपये उकळत प्राॅपर्टी नावावर करुन घेतली.

तक्रारी घटल्या
देवरेविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाल्यावर इतर त्रस्त कर्जदारांनी पाेलीस ठाणे गाठत तक्रारींचा पाढा वाचला. त्यानुसार मागील काही दिवसांत पाच ते सहा तक्रारदार समाेर आले. त्यानंतर विविध कलमांन्वये गुन्हे नाेंदविण्यात आले. मात्र, आता नव्याने देवरेविरुद्ध तक्रार आलेली नाही. तर, आता अवैध सावकारीतून देवरेने कमविलेली प्राॅपर्टी, दागिने, बंगला, महागडी वाहने, जमीन, फार्म हाउसची माेजदाद सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *