तेजोमय दीपोत्सव समृद्धीचे दान!

वसूबारसपासून सुरू झालेला दीपोत्सव तितकाच उत्साह आणि आत्मविश्वास घेऊन आला आहे. या दीपोत्सवात मिणमिणार्‍या पणतीपासून ते आकाशातल्या आतषबाजीतून उत्साहाची ऊर्जा ओसंडून वाहताना दिसते. छोट्याशा पणतीतून टीचभर वातपण मनामनातल्या अंधारावर प्रचंड मात करते. त्या पणत्यांकडे पाहिल्यानंतर मनातले नैराश्य सहजपणे पिटाळले जाते.
आपल्या शक्ती आणि कुवतीप्रमाणे ही छोटीशी पणती आपल्या आजूबाजूचा अंधार दूर करते. लांबवरच्या पांथस्थालासुद्धा आशेचा किंवा आत्मविश्वासाचा किरण दाखवते. खरेतर दीपोत्सवाचा हाच मोठा संदेश ठरतो. कितीही संकटं आली, आव्हाने आली तरीसुद्धा न डगमगता आपल्या शक्ती आणि कुवतीप्रमाणे प्रकाशाचा मार्ग शोधता येतो. आपल्याच आत्मविश्वासातून आकाशालाही गवसणी घालता येते. अशा प्रकारचा उत्साह आणि ऊर्जा देण्याचे काम या दीपोत्सवाच्या माध्यमातून होते. कोणताही संकल्प किंवा उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतेच. हे प्रयत्न करताना येणार्‍या अडचणींना शरण न जाता त्यातून मार्ग काढता येतो. स्वतःबरोबर इतरांसाठीदेखील सहाय्यभूत होता येते. म्हणूनच पणती किंवा आकाशकंदिलातील प्रकाश हा आत्मविश्वास जागवणारा असतो. विशेष म्हणजे, मन आणि शरीराचा निसर्गाशी समन्वय साधून एक अनोखे समाधानही प्राप्त करता येते. ही किमया फक्त भारतीय संस्कृतीतच पाहायला मिळते. कारण दूर डोंगरावरची एखादी झोपडी जरी असली, तरी तिथे तेवणारा आकाशकंदील आणि गर्भश्रीमंतांच्या बंगल्यांवर लटकणारे आकाशदिवे या दोघांकडे पाहिल्यानंतर आनंद आणि समाधान समान स्वरूपात प्राप्त होते. म्हणजेच आपल्या मनाच्या व्यापकतेला आकाशाचे कोंदण प्राप्त करता येते. हेदेखील या दीपोत्सवाचेच अनोखे वैशिष्ट्य आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात वसूबारसला होणारी गोधनाची पूजा, संपन्नतेचा विचार सांगणारी धनत्रयोदशी म्हणजे आपल्याकडे असलेल्या धनाविषयी आदर व्यक्त करण्याची मोठी संधी असते.
समृद्धीचे वरदान
संपूर्ण दीपोत्सव हा समृद्धी आणि संपन्नतेचे वरदान देणारा असतो. आपल्याकडे जे आहे किंवा जे प्राप्त झाले आहे त्याच्याविषयी कृतज्ञ राहून आनंदी राहण्याचा संस्कार हीसुद्धा मनाची समृद्धीच असते. स्वतःजवळ असलेल्या धनाचा विचार न करता अशाश्वत सुखाच्या मागे न धावता स्वतःमध्येच असलेल्या आनंदाला ओळखून समाधान प्राप्त करता येते. याच प्रवृत्तीला संपन्नता किंवा संपत्ती म्हणता येते. भारतीय संस्कृतीने अन्य कोणत्याही भौतिक सुखापेक्षा विचार आणि संस्कारांच्या संपन्नतेला सर्वाधिक महत्त्व दिलेले आहे. धनत्रयोदशी याच मनरूपी धनाचे स्मरण करणारी म्हटली पाहिजे. प्राचीन काळात आजच्यासारखे चलन किंवा पैसाअडका नव्हता. शेतीतून मिळणारे अन्नधान्य हीच संपत्ती मानली जायची. त्याचीच देवाणघेवाण होऊन समाजातले जीवनव्यवहार चालू असायचे. हेच खरं धन आहे, असे मानून त्याचीच पूजाअर्चाही केली गेली. पुराणकथांमधून आजच्या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी देवता प्रकटली. तिच्या हाती अमृतकलश होता. म्हणजेच समाजाच्या आयुरारोग्यासाठी उपयुक्त असे अमृत धन्वंतरीने देवाधिकांना दिले होते; परंतु त्याचा मतितार्थसुद्धा हाच आहे की, समुद्राचं मंथन करून जगाच्या हितासाठी अमृत प्राप्त करता येते. भारतीय संस्कृती हीसुद्धा अशाच विचार आणि संस्कारांच्या माध्यमातून समाजहिताचे सण, उत्सव साजरे करणारी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सगळ्या प्रकारचे भेद मावळतात. आनंदाचा समान अनुभव या दीपोत्सवातून किंवा सण-उत्सवातून प्रत्येकाला घेता येतो. दीपावलीतले पणत्यांचे महत्त्व आजही का टिकून आहे, तर याचे रहस्यच हे सण-उत्सव सामान्यातल्या सामान्य माणसाचा त्याच्या परिस्थितीचा विचार करणारे आहे. अशांचाही आत्मविश्वास दुप्पट करण्याचे काम या उपक्रमातून होत राहते. म्हटलं तर दीपोत्सव हा हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य सण ठरतो. दुसरीकडे, हाच दीपोत्सव व्यापक अर्थाने संपूर्ण विश्वाला आनंदमय जीवन जगण्याचं रहस्य सांगून जातो. व्यक्ती किंवा मनुष्यजीवन म्हटल्यावर काही ना काही कारणांमुळे अपयश किंवा नैराश्य येण्याची शक्यता असते. पण त्याला कवटाळून न बसता सतत पुढे जाण्याचा किंवा आपले संकल्प सिद्ध करत राहण्याची ऊर्जा या दीपोत्सवातून मिळते.
सातत्यपूर्ण शृंखला
सलग पाच दिवस साजर्‍या होणार्‍या या प्रकाशपर्वामध्ये प्रत्येक दिवसाचे एक आगळेवेगळे महत्त्व नोंदले गेले आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेच्या अभ्यंगस्नानाचे महत्त्व सांगून स्वतःमधल्या आणि समाजातल्या विकृतींवर विजय मिळविण्याचा संदेश दिला जातो. बलिप्रतिपदेला संपत्तीचा अहंकार कसा घातक ठरतो, हे सांगून ज्यांच्यामुळे समृद्धी किंवा समाधान प्राप्त होते त्यांच्याविषयी कृतज्ञता आणि आदर ठेवण्याची शिकवण दिली गेली. म्हणूनच या दिवशी घरातल्या वडीलधार्‍यांविषयी निष्ठा व्यक्त करण्याची संधी प्राप्त होते. भाऊबीजेला बहीण-भावातल्या स्नेह आणि प्रेमाचा सर्वोच्च क्षण अनुभवता येतो. शिवाय समाजातल्या बंधुभावालादेखील नकळतपणे प्राधान्य मिळते. अगदी आश्विन अमावास्येच्या दिवशी होणारे लक्ष्मीपूजन म्हणजे प्राप्त केलेल्या लक्ष्मीची आराधना करण्याचा आणि ती तितक्याच चांगल्या कामासाठी विनियोग करण्याचा विचारही सांगितला गेला.
या सगळ्यांमधून सारांशरूपाने एक सकारात्मक ऊर्जेचाच संस्कार दृढ होताना दिसतो. व्यक्तीपासून समाजापर्यंत प्रत्येकाने सामंजस्य आणि सहकार्याचेदेखील महत्त्व व्यक्त केले जाते. या काळात एकमेकांना दिल्या जाणार्‍या शुभेच्छा म्हणजे भारतीय संस्कृतीने रुजवलेला सर्वत्र ’सुखिनः सन्तु’चा मूलभूत आविष्कार ठरतो. व्यक्ती आणि समाजातल्या जाणिवांना सतत प्रगल्भ करीत राहणे, स्वार्थ संकुचितता नाहीशी करीत राहणे, असा विचार दृढ करत राहण्याची एक सातत्यपूर्ण शृंखला म्हणजेच दीपोत्सव ठरतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *