एकत्र राहतील काय?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
मतदार याद्यांतील घोळ दूर करावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आल्याचे गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस (मंगळवार व बुधवार) दिसून आले. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद बरीच कमी झाली असूनही या पक्षांनी लढत राहण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे. काँग्रेस मात्र स्वबळाच्या हवेत आहे. लवकरच म्हणजे दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजेल. शक्तिशाली भाजपा आणि त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा समावेश असलेल्या महायुतीचा विरोधकांना सामना करावा लागणार आहे. मतदार याद्यांतील घोळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंसह सर्व विरोधकांना एकत्र येणे भाग पडले. ‘महाविकास आघाडी’ला ‘राज’बळ या मथळ्याखाली गेल्या आठवड्यात आम्ही विरोधक एकत्र असल्याचे विवेचन केले. विरोधकांचे आव्हान झाले, तरी सत्ताधार्‍यांसाठी म्हणावे तितके सोपे नाही. पण प्रथम महाविकास आघाडीतील अगोदरचे तीन प्रमुख पक्ष एकत्र राहणार काय? आणि चौथ्या पक्षाला म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेला ते प्रवेश देणार काय? हे मुख्य प्रश्न आहेत. समजा, त्यांनी तसे केले तरी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत अन्य दोघांशी जुळवून घेणार काय? हाही प्रश्नच आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतदान करायचे असतानाही महायुतीतील भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची काय वाताहत झाली. मोदी यांचा करिष्मा, भक्कम प्रचार यंत्रणा, पैशाचा ओघ, सरकारी यंत्रणा आदी सगळ्याच जमेच्या बाबी असूनही महायुतीचे गणित बिघडले. मात्र, नंतर विधानसभेत ते सावरलेच आणि पाशवी बहुमताने सत्तेवर कसे आले, हा संशोधनाचा विषय होता आणि आहे. सत्ताधार्‍यांकडून याचे श्रेय लाडक्या बहिणींना दिले जात आहे. तीन महिन्यांत लाडक्या बहिणींनी एवढे होत्याचे नव्हते करून टाकले यावर प्रामाणिकपणे कोणाचा विश्वास बसत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या टीमचा तर मुळीच विश्वास नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही मतदार याद्यांतील घोटाळे सप्रमाण समोर आणले आहेत. महाराष्ट्रात आता महापालिकेच्या तोंडावर हाच विषय विरोधी पक्षांनी लावून धरला आहे. त्याला उद्धव ठाकरे यांच्या भाषेत निवडणूक आयोगातील कठपुतळे बाहुले कितपत दाद देतील, हाही प्रश्न आहे. तरीही विरोधी पक्षांना लढावे लागणार आहे आणि एकत्र राहावे लागणे, ही काळाची गरज आहे. मनसे राज्यात सगळीकडेच समान शक्ती असलेला पक्ष नाही. मुंबईसह किमान पाच महापालिकांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. मुळात याच महापालिका सगळ्यांत प्रमुख आणि महत्त्वाच्या आहेत. वेगळे झाल्याने आणि सुरुवातीचे काही दिवस सत्तेची ऊब असल्यामुळे उद्धव ठाकरेंना राज यांनी वेगळी चूल मांडल्याची उणीव भासली नाही. त्यांनी आणि त्यांच्या शिलेदारांनी राज यांना टोमणे मारण्यातच धन्यता मानत त्यांचा विझलेला पक्ष अशी संभावना केली. जेव्हा भाजपाने शिवसेनेला झटका देत वेगळे होणे पसंत केले आणि शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेंचे कथित शिलेदार फोडत शिवसेनेला पंगू केले, तेव्हा उद्धव आणि या भाजपच्या कथित राजकीय कारस्थानात सहभागी नसतानाही राज यांनाही आपण काय गमावले असल्याची जाणीव झाली असावी. काही कारणे आणि काही घडवून आणलेली कारणे, काही योगायोग आणि काही कौटुंबिक स्वरूपाचे सोहळे यामुळे दोन्ही बंधू एकत्र आले, याचा त्यांच्या कार्यकर्त्यांना आनंद आहे. उद्धव ठाकरेंचा आवाज म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाऊ शकतो त्या संजय राऊतांनीही पाच महापालिकांत एकत्र येण्याबाबत सुतोवाच केले आहे. सध्या तेवढे दोन्ही पक्षांसाठी पुरेसे असावे असे म्हणता येते. त्याचे कारण बाळासाहेब ठाकरेंनी शून्यातून शिवसेना उभी केली आणि तिला सत्तेवर नेऊन बसवले. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी प्रमुख शहरांत सेनेचा दरारा निर्माण केला. त्यांनी ज्या शिलेदारांना घडवले तेच आपले राज्य स्थापून मोकळे झाले आहेत.हे सगळे आपल्या डोळ्यांदेखत झाले आणि आपल्यातल्या दुहीमुळे झाले हे ठाकरे बंधूंना चांगले कळले आणि आता वळलेही असावे. त्यातून जर ते एकत्र लढणार असतील तर त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी ती आनंदवार्ता ठरावी. महाआघाडीत राज यांचा प्रवेश अवघड दिसतो व त्यामागे कारण म्हणजे काँग्रेस. काँग्रेसची निर्णय प्रक्रिया अत्यंत संथ आहे. राज यांना घ्यायचे काय? यावर विचार करण्यातच कदाचित पुढच्या विधानसभेपर्यंत वेळ घेतील. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानांवरून तेच संकेत मिळत आहेत. मुळात राज यांनीही काँग्रेससोबत जाण्यात फारसे स्वारस्य असल्याचे दाखवलेले नाही. शरद पवारांना त्यांची किंवा राज यांना शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण नाही. समजा तसे असले तरी ज्या पाच महापालिकांत दोघे ठाकरे बंधू एकत्र येऊ इच्छितात तेथे काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत आली नाही तरी दोघा भावांचे फारसे बिघडत नाही. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याने जर सत्ताधार्‍यांना आव्हान आणि मात दिली जात असेल तर राज्यात एक नवीन राजकीय समीकरण तयार होईल. मनसेला सोबत घेतले, तर उत्तर भारतीय आणि मुस्लिम मते हातची जातील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी तयार करतानाच्या वेळी काँग्रेसला ही भीती वाटली नाही. निवडणूक आयोगासमोर जाताना सर्व विरोधक एकत्र दिसले, पण ते एकत्र राहतील काय? पक्षांच्या प्रमुखांनी एकत्र येण्याबाबत काय तो निर्णय घेतला, तरच पुढची वाटचाल निश्चित होईल. उद्धव ठाकरे यांना राज सोबत हवे आहेत. काँग्रेसने नकार दिला, तरी त्यांना काहीच फरक पडणार नाही. दोघांचे लक्ष मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ व नाशिक या महापालिकांवर आहे. त्यासाठी काँग्रेस सोबत आहे की नाही, याचा विचार ते करणार नाहीत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *