दरात 30 टक्क्यांपर्यंत वाढ; सततच्या पावसाचा फटका
लासलगाव : वार्ताहर
स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असणारी तिखट लाल मिरची सर्वसामान्यांसाठी यावर्षी महागात पडणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, ही दरवाढ थेट सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देणारी ठरत आहे. गेल्या हंगामात मुबलक उत्पादनामुळे मिरचीचे दर आटोक्यात होते. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे संपूर्ण चित्र बदलले आहे.
यंदा खरीप हंगामात मिरचीचे पीक फुलोर्यात असतानाच सततच्या पावसाने शेतकर्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली, परिणामी उत्पादनात लक्षणीय घट झाली. विशेषतः ‘बेडगी’सारख्या दर्जेदार मिरचीचे नुकसान अधिक झाल्याने बाजारात आवक कमी झाली आहे.
गेल्या वर्षी हंगामात ‘बेडगी’ मिरचीचा दर 350 रुपयांच्या पुढे गेला नव्हता. मात्र, यंदा त्याच मिरचीचे सरासरी दर तब्बल 30 टक्क्यांनी वाढले आहे. कोल्हापूर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथून मोठ्या प्रमाणावर मिरचीची आवक होते, तर गुजरातमधून येणारी आवक तुलनेने अत्यल्प असते. मात्र, यंदा सर्वच राज्यांमध्ये पावसाचा फटका बसल्याने बाहेरून येणार्या मिरचीचे प्रमाणही कमी झाले आहे.
एकूणच, सततचा पाऊस, घटलेले उत्पादन आणि कमी आवक यामुळे यंदा लाल मिरचीचे दर यंदा चढेच राहण्याची शक्यता आहे.
असे आहेत लाल मिरचीचे नवे दर
सध्याच्या लाल मिरचीच्या बाजारभावांकडे पाहिले तर बेडगी मिरचीचे दर प्रतिकिलो 300 ते 500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, चपाटा 280 ते 350, रेशमपट्टा 380 ते 500, गंटूर 240 ते 280, तेजा (लवंगी) 250 ते 290, काश्मिरी 800 ते 1000, बोर मिरची 700 ते 800 रुपये प्रतिकिलो विकली जात आहे.
उत्पादन घटल्याने दर वाढले असून, ग्राहकांनी आतापासूनच मिरची खरेदी करताना हात आखडता घ्यायला सुरुवात केली आहे. दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होताना दिसत आहे. स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील ही महत्त्वाची वस्तू महागल्याने सर्वसामान्य गृहिणींपासून हॉटेल व्यावसायिक मिरची कमी प्रमाणात खरेदी करत आहे.
– अबूबकर शेख, मिरची मसाला व्यावसायिक, लासलगावThe red pepper crop has increased this year.