महिनाभरातच रस्ता पुन्हा खोदला

मनपा-स्मार्ट सिटीच्या कारभाराचा फटका

नाशिक : प्रतिनिधी
शहराला ‘स्मार्ट’ बनविण्याच्या नावाखाली महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी खोदून खड्डे बुजविण्यात आलेला मुख्य रस्ता विविध सेवा पुरवठादार कंपन्यांच्या कामासाठी पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्ता पुन्हा खोदल्यामुळे वाहतूक कोंडी वाढून वाहनधारकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
केबल टाकणे आणि वाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्त्यावर पुन्हा बुलडोझर चालविण्यात आला. महिनाभरापूर्वीच रस्त्याचे काम करून खड्डे बुजविण्यात आले असताना, पुन्हा रस्ता खोदल्याने नागरिकांच्या कराच्या पैशांची उघड उधळपट्टी होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनात कामांच्या नियोजनाबाबत तसेच विविध सेवा पुरवठादार कंपन्यांशी समन्वयाचा अभाव असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
रस्ता खोदण्याची आवश्यकता आधीच माहिती असताना रस्ता दुरुस्त करण्यापूर्वीच केबल टाकणे किंवा वाहिनी दुरुस्तीचे काम का पूर्ण करण्यात आले नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
एकाच रस्त्यावर वारंवार खोदकाम आणि डागडुजी केल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असून, नागरिकांना त्याचा थेट फटका बसत आहे. रस्ता खोदण्यापूर्वी संबंधित सर्व विभाग आणि सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये समन्वय साधून कामांचे नियोजन करावे, तसेच नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

The road was dug up again within just a month.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *