– अशोक थोरात
राज्यातील कानाकोपर्यात ज्यांचे कौतुक होत आहे, त्यांना नायक सिनेमातील अनिल कपूर समजले जात आहे. आता तर एकादशीची शासकीय पूजा तुकाराम मुंढे यांनी करावी, असे सोशल मीडियावर फिरत आहे. अगदी 2029 नंतर तुकाराम मुंढेच मुख्यमंत्री असे पण सुरू झाले आहे, पण ते असे काही करणार नाहीत. फक्त जबाबदारी जबाबदारीने पार पाडतील मग कुणाशीही दुश्मनी घ्यायची तयारी ठेवून व बदलीचे कळत असताना काम करीत राहतील. आता कळत नकळत तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यात जे काम सुरू केले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विधानसभेत तीन वर्षे आता बदली करू नका, असे अनेक आमदार बोलले म्हणजे त्यांचे काम सर्वांनाच आवडत आहे.
दुसरी बाजू म्हणजे जनतेचा जीव वाचवलाच पाहिजे, पण याच जनतेला विष खायची सवय झाल्याने शुद्ध पदार्थ त्यांना त्रासदायक ठरू शकतात. माणसांना केमिकलची सवयच झाली आहे. फरक पडत नाही. कॅन्सरचे पेशंट वाढत आहेत. दूध, पनीर व अन्य दुधाचे पदार्थ बोगस भेसळयुक्त असतात, पण कुणीच ते खाणे सोडले नाही. कारण ते विष हळूहळू शरीरात जाते म्हणून कॅन्सर होईल. आताच काय ती काळजी करावी. सोशल मीडियावर प्रत्येक पदार्थ घातक सांगतात. मग खायचे काय. तुकाराम मुंढे आयुक्त नसताना संपूर्ण खाते झोपले होते का, फक्त पैसेच खात होते हे समोरच दिसत आहे. आता राज्यभर धाडसत्र व अनेक खाद्यपदार्थ भेसळयुक्त सापडत आहेत. म्हणजे सर्व भेसळखोर आताच भेसळ करीत आहेत का, याआधी शुद्ध माल खायला मिळत होता असे समजायचे का? पण तसे नाही. वर्षानुवर्षे भेसळबहाद्दर गुटखासम्राट, बनावट औषधांचा पुरवठा सुरू होता व जनता खात होती व हळूहळू मरत होती. पण आता खायचे काय, प्रत्येक पदार्थ खाण्यास योग्यच नाही, अशी अवस्था झाली आहे.
घरात खातो ते पण खाण्यास योग्य नाहीच. प्रचंड औषधांच्या म्हणजे केमिकलच्या फवारण्या केलेला भाजीपाला सर्वच खात होते व आजही खातात. कोबी, फ्लॉवर, वांगी, भेंडी सर्वांवरच औषध फवारण्या होतात. गहू, बाजरी, ज्वारी, मका यावर फवारण्या, सर्वच फळांवर फवारण्या. द्राक्षवर्गीय पिकावर फवारण्या म्हणजे शुद्ध खायला मिळतच नाही हे नक्की.
दूध तर नको रे बाबा समोर नको. अमूलसारख्या कंपनीवर पण विश्वास राहिला नाही. चितळेसारखे पण संशयाच्या फेर्यात आहेत. खवा, मावा, आइस्क्रीम, लस्सीसारखे न खाल्लेले बरे. पोट्याटो चिफ्स, कुरकुरे नकोच. खाद्यतेल नाहीच. तूप नाहीच मग खावे काय? मुंढे यांनी सर्वांवरच बंदी आणल्यासारखी आहे. कोण म्हणतो गुटखा नाही. पन्नासची पुडी ऐंशी रुपयाला सर्वञ पण ठरावीक विश्वासू ग्राहकांना मिळत आहे. आजही गुटख्याच्या गाड्या सापडतच आहेत, म्हणजे गुटखा पुरवठा थांबलेला नाही. पूर्वी दहा टक्के पकडत होते, आता पन्नास टक्के एवढाच फरक. गुजरातमध्ये गुटख्याला बंदी नाही. फक्त महाराष्ट्रात आणायचा. अनेक युक्त्या शोधून काढतात व वर्दीवाल्यांचे जुने पंटर मग काय सर्व बंद होणारच नाही. सर्वत्र बजबजपुरी माजलेली असताना एकटे तुकाराम मुंढे सर्वांना भारी पडून जनतेच्या आरोग्याची काळजी करून भल्याभल्या माफियांशी कायदेशीर मार्गाने दोन हात करीत आहेत. मोजून दीड महिना झाला व पळापळ सुरू झाली. तीन वर्षांत राज्याचे चित्र पालटलेले असेल. बाहेर चहा घेतल्याशिवाय चैन पडत नाही असे लोक दिवसभरात पाच-सात कप चहा घोटतात, पण कॅन्सरचा प्रसार करणार्या प्लास्टिकच्या कपात. पाणी पण तशाच ग्लासात. पाववडा, वडापाव खातात वृत्तपञाच्या रद्दीत, बाटलीतील पाणी हीच तर्हा. लग्नात पत्रवाळी, ग्लास प्लास्टिकचा, पाणी रसायनयुक्त जारचे व जेवण भेसळयुक्त. सर्वच भेसळ व केमिकलयुक्त. मग दहाव्या वर्षीच जीवघेणा आजार येणारच. साठ ते पासष्ट वयाच्या सेवानिवृत्त लोकांना कॅन्सरचा जास्तच प्रादुर्भाव वाढत आहे. कारण समोर आले कार्यालयात सतत चहा प्लास्टिकच्या कपात, चार वाजेचा नाश्ता असाच व म्हणून कॅन्सर. पूर्वी पाटाचे, नदीचे, ओढ्याचे वाहते पाणी पीत होतो कधीच ञास झाला नाही. वाहते पाणी व ज्या विहिरीचे पाणी दररोज पिकांना देतात सकाळी ताजे पाणी विहिरीत येते, ते शंभर टक्के शुद्ध. त्यात शरीराला लागणारे घटक असतात. घरात मशिनचे शुद्ध पाणी म्हणजे त्यात शरीराला लागणारे घटकच नसतात. ब्रॉयलर चिकन पण न खाल्लेले बरे, पण खाये तो क्या खाये खावे लागते. स्लो पॉयझन हेच असते हळूहळू शरीरात पसरते व आजार सुरू. चहापेक्षा किटली गरम म्हणजे शुद्ध दूध 130 रु. लिटर, शुद्ध तेल 500 रुपये किलो. सर्वच खायच्या वस्तूंचे दर तिप्पट, चौपट होतील. हे दर जनतेला परवडतील म्हणून म्हणतील तेच बरं होतं. आज मुंढेसाहेब हे करीत राहिल्यास अनेक टपर्या, पानटपर्या, किराणा दुकाने, हॉटेल्स अनेकांना कुलूुप लागणार आहे. शेवटी निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. राज्याच्या झोपडपट्टी, फूटपाथ, महाल यातील प्रत्येकाला तुकाराम मुंढे संत तुकाराम, पंढरीचा पांडुरंग वाटत आहेत. पंढरपूरची महापूजा मुख्यमंत्र्यांऐवजी तुकाराम मुंढेंनी करावी, अशी मागणी होत आहे. आज तरी 95 टक्के समाजासाठी राज्यात देवाचा दर्जा मिळाला तुकाराम मुंढेंना. भविष्यात ते राजकारणात आले तर मला वाटते यशस्वी होतील. तीन वर्षे बदली करायची हिंमत कुणी दाखवणार नाही. बदली केलीच तर राज्य पेटून उठेल व क्रांती होऊन मुंढेसाहेब सहज मुख्यमंत्री होतील हे नक्की.
The Scourge of Adulterators