डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ते ज्या पद्धतीने वागत आहेत, बोलत आहेत, ते निश्चितच महाशक्ती असलेल्या देशाच्या नेत्याला शोभणारे नाही. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी ’मेक अमेरिका ग्रेट अगेन’चा नारा दिला. मात्र, त्यासाठी ते जगाला वेठीस धरत आहेत. जगातील इतर देशांबरोबर बॅलन्स ऑफ ट्रेड साधण्यासाठी त्यांनी मनमानी पद्धतीने टेरिफ कर लादण्याचा वारंवार प्रयत्न केला. अनेकदा अमेरिकन कोर्टाने त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला.
गेल्या वर्षी त्यांनी नाहक इस्रायलच्या नादाला लागून अमेरिकेबरोबर पंगा घेतला. मात्र, त्यावेळी धडा घेऊनही यावर्षी 28 फेब्रुवारीपासून आखाती युद्धाची ठिणगी पडली आणि त्याला कारणीभूत अमेरिका ठरली. आपणच जगाचा पोलीस असल्याच्या आविर्भावात अमेरिका कायमच वागत आली आहे. आतातर ते अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे, मात्र, इराण-इस्रायल युद्धाच्या निमित्ताने इराणने अमेरिकेला त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्याबाबत हात दाखवून अवलक्षण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानिमित्ताने इराणने राष्ट्रवाद कसा असावा आणि कुठल्याही महाशक्तीविरोधात नमते न घेता कसा लढा द्यावा, याचा परिपाठ घालून दिला आहे. युद्धाच्या सुरवातीलाच इराणचे सर्वोच 40 नेते मारले गेले. एका शाळेवर इस्रायलने अमानुषतेचा कळस गाठत हल्ला करून 168 शालेय विद्यार्थ्यांचा जीव घेतला, इराण सैन्याचे मोठे नुकसान झाले तरी इराण तसूभरही झुकला नाही. याउलट ट्रम्प यांचा तोरा उतरवला.
या सगळ्यात आजवर कधी नव्हे एवढे भारताबाबत अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे. टेरिफ कर लावताना सर्वांत जास्त कर भारतावर लावला. नंतर त्यात कमी अधिक बदल झाले. मात्र, तरीही अगोदरपेक्षा जास्तच टेरिफ कर लावला जात आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताची बाजू मजबूत असताना, भारतीय लष्कर निर्णायक लढाई लढत असताना अनपेक्षितपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीची घोषणा अगोदर केली आणि भारताने ती निमूटपणे मान्यदेखील केली.
आजवर जागतिक व्यापारात केवळ भारताबरोबरच आपण फायद्यात होतो. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टेरिफ कर लावत भारताकडून आयात कमी केली आणि भारताला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागणार, हे स्पष्ट केले. याबाबत अमेरिकेकडून वारंवार अनेकदा वक्तव्ये येत असूनही भारताकडून मात्र चोख प्रत्युत्तर दिले जात नाही. सवार्ंत गंभीर बाब म्हणजे, गेल्या काही दिवसांत तीनदा भारतीय मालवाहतूक जहाजावर हल्ले झाले. त्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला, तरी भारत ठोस भूमिका घेत नाही की करारा जबाव देत नाही. अमेरिका परवानगी देईल तेव्हा रशियाकडून तेल खरेदी करायची, अमेरिकेने आदेश दिला म्हणून व्हेनेझुएला, अमेरिकेकडूनच महागडी इंधन खरेदी करायची. युद्धाभ्यासासाठी भारतात आलेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेने हल्ला केला तरी भारताकडून कुठलीही तीव्र प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेबरोबर होऊ घातलेल्या व्यापारी करारात भारत तोट्याचा व्यवहार करणार, हे स्पष्ट आहे. टेरिफ कराबाबत अमेरिका म्हणेल ते मान्य, अशी भारताची भूमिका. घर में घुसकरची भाषा केवळ पाकिस्तानबाबत केली जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील इतर देशांवर मनमानी पद्धतीने कर लावले तेव्हा अनेक देशांनी अगदी युरोपियन युनियन देशांनीदेखील अमेरिकेला जुमानले नाही. मात्र, भारत कुठल्याच बाबतीत चकार शब्द काढत नाही की विरोध करत नाही. आखाती युद्धाच्या निमित्ताने नाहक इराण, रशिया देशांशी संबंध दुरावून अमेरिकेशी जवळीक साधूनही अमेरिका मात्र भारताबाबत कठोरपणे वागत आहे.
अमेरिकन प्रशासनातील अधिकारी, खुद्द डोनाल्ड ट्रम्प हे भारत, तसेच भारताच्या सर्वोच्च नेत्यांबाबत सातत्याने अपमानास्पद, वादग्रस्त वक्तव्ये करत असताना भारताकडून मात्र केवळ सोपस्कार म्हणून निषेध नोंदवला जातो. कागदी घोडे नाचवले जातात यापलीकडे काही होत नाही. घर मे घुसकरची भाषा केवळ पाकिस्तानबाबत होते. चीन, अमेरिका वारंवार आगळीक करत असतानाही घर मे घुसकरची भाषा तर सोडाच, पण ठणकावून सांगण्याची हिंमत दाखवली जात नाही. अमेरिकेची भारताबाबतची भूमिका बिग बॉससारखी असल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे. ट्रम्प यांनी वारंवार भारताच्या सर्वोच्च नेत्यांबाबत अनेक वक्तव्ये केली. मात्र, विश्वगुरू काही बोलायला तयार नाही. वारंवार छप्पन इंची छाती, विश्वगुरू, महाशक्तीचा दावा केला जातो. मात्र, देशाचा
सर्वोच्च नेता ठोस भूमिका घेताना वा कडक शब्दात इशारा देताना का दिसत नाही, हे अनाकलनीय आहे.
The ‘soft’ stance towards America is baffling.