न बोलल्या जाणार्‍या गोष्टीची गोष्ट

घर म्हणजे फक्त एकत्र राहणे नसते. घर म्हणजे एकमेकांना समजून घेणे असते. प्रत्येक घरात माणसे एकमेकांवर प्रेम करणारी असतात, एकमेकांसाठी जगणारी असतात. पण या प्रेमात कधी कधी नकळत एक छोटासा असमतोल निर्माण होतो-जो कुणी मुद्दाम करत नाही, पण तो जाणवतो. घरातल्या घरात अनेकदा काही गोष्टी आपण सहज बोलतो स्वीकारतो, काही कबूल करतो आणि त्या अडचणी सुटतातदेखील. मात्र, काही गोष्टी या बोलता येत नाही, त्या व्यक्त करता येत नाही कारण मग त्यामागे अनेक कारणे असतात. आपल्या व्यक्त करण्याने कोणी दुखावले गेले तर, उगाच वादविवाद नको, किंवा घर आणि त्यातली माणसे जपणे याला प्राधान्यक्रम असतो म्हणून काही गोष्टी मुक्याने घडतात. कारण बर्‍याचदा त्या गोष्टीला इतरांच्या लेखी फारसे काही महत्त्वाचे मानले जात नाही. उदाहरणार्थ बाहेर नोकरी करणार्‍या मुलीला, सुनेला कामावरचा बराच ताण असतो. तिथे राजकारण सुरू असते. तिला वरिष्ठांची मर्जी सांभाळणे असते. या सगळ्याचा थकवा आपोआपच येतो. त्यामुळे कदाचित कधीकधी घरी तिच्याकडून काम होत नाही. अशा वेळी तिला दोषारोप करण्यापेक्षा किंवा तुलना करण्यापेक्षा समजून घेतले गेले तर न बोलणारी गोष्ट राहत नाही. घरातील महिला दिवसभर कुठल्या ना कुठल्या तरी कामात स्वतःची गुंतवणूक करीत असतात. त्यामुळे त्यांच्यापण अशा गोष्टींना समजून घेत आम्हाला तुझी कदर आहे, हे जाणवून दिले तर न बोलणारी गोष्ट मनात राहत नाही.
घरात काही जण सतत काळजी व्यक्त करतात. ते वारंवार विचारतात, कशी आहेस?, थकली असशील ना?, काही मदत हवी का? त्यांच्या शब्दांत आपुलकी असते आणि ती ऐकायला छान वाटते. पण काही जण असेही असतात, जे जास्त बोलत नाहीत. ते विचारत नाहीत, पण शांतपणे लक्ष ठेवून असतात. तुम्ही थकलेले असताना ते न सांगता एखादे काम करून ठेवतात. तुमची अडचण ओळखून ती हलकी करतात. त्यांची काळजी शब्दांत नसते-ती कृतीत असते. आणि अनेकदा, ही शांत काळजीच सर्वात खरी असते. घरात सूनबाईंच्या बाबतीतही असेच काहीसे दिसते.
जी सून घरात असते, ती दिवसभर घरासाठी झटत असते. स्वयंपाक, साफसफाई, सगळ्यांची सोय-ती न थांबता करत असते. तिचे काम घराशी जोडलेले असल्यामुळे ते सगळ्यांना दिसते.
पण जी सून नोकरी करते, तिचा दिवस घराबाहेर सुरू होतो. ती बाहेरच्या जबाबदार्‍या सांभाळते, वेळेच्या मर्यादा पाळते, मानसिक आणि शारीरिक थकवा सहन करते. दिवसभराचा ताण घेऊन जेव्हा ती घरी परतते, तेव्हा तिच्या शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज असते. पण तिच्या थकव्याची जाणीव नेहमी सगळ्यांना होत नाही.
कारण तिचे काम घराबाहेर झालेले असते-ते दिसत नाही. कधीकधी नकळत तुलना होते. जी घरात असते, तिचे योगदान स्पष्ट दिसते. आणि जी बाहेर काम करून येते, तिचे प्रयत्न शांतपणे मागे राहतात. पण या दोघींच्या भूमिकेत फरक असला, तरी त्यांच्या प्रयत्नांची किंमत समान असते.
आणखी एक गोष्ट अनेक घरात घडते. जी सून रोज घरात असते, सगळ्यांसाठी झटत असते, तिचे काम हळूहळू स्वाभाविक मानले जाते. तिची उपस्थिती इतकी सवयीची होते, की तिचे विशेषपण वेगळे दिसत नाही. पण जी सून दूर राहते आणि क्वचित काही दिवसांसाठी घरी येते, तिच्या येण्याने आनंद व्यक्त केला जातो, तिचे कौतुक केले जाते. हे ऐकताना, रोज घरासाठी जगणारी सून शांतपणे हसते. ती काही बोलत नाही. कारण तिला माहीत असते-तिने दिलेले प्रेम रोजचे आहे, आणि रोजच्या गोष्टींचे कौतुक अनेकदा शब्दांत व्यक्त होत नाही. ती तक्रार करत नाही, कारण ती नाती जपणारी असते. ती शांत राहते. कारण ती घराला महत्त्व देणारी असते. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे- नाती ही तुलना करण्यासाठी नसतात, ती समजून घेण्यासाठी असतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने घरासाठी काहीतरी देत असते. जेव्हा घरात प्रत्येकाच्या प्रयत्नांकडे समान नजरेने पाहिले जाते, तेव्हा तिथे खरे समाधान निर्माण होते. कारण शेवटी, घर सुंदर बनवते ती एखादी मोठी गोष्ट नसते, तर छोट्या छोट्या गोष्टी न सांगता समजून घेण्याची मोठी जबाबदारी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *