मुलांची काय चूक?

या विषयावर कधीपासून आणि खूप काही लिहावुसं वाटलं. आजकाल डिव्होर्सचं वाढते प्रमाण कुणाच्या नजरेआड सुटलेलं नाही. त्याची कारणे काय…? अवाजवी अपेक्षा, बदलती जीवनशैली, मुलींचेही मुलांइतके स्वाभिमानी झालेलं आर्थिक जीवन, आई-वडिलांचा वाढलेला मुलांच्या संसारातला हस्तक्षेप, सोशल मीडियाचा गैरवापर याा अशा अनेक या-ना-त्या कारणामुळे विवाहसंस्थेतील प्रेमबंधनाला एक मोठा तडा गेलाय. आधीच्या काळात घरचे एक मुलगी पसंत करायचे आणि तिच्यासोबत विवाह केला जायचा, तरीही ती विवाहबंधनं अगदी आयुष्यभर आणि सुखकर टिकायची.
जसेजसे जीवनशैलीत आधुनिकतेचे पाऊल पडले लग्नाआधी मुलं-मुली भेटायला लागलेत त्यांची पसंती झाल्यानंतर घरच्यांतर्फे लग्न केली जाऊ लागली. सुरुवातीला सोबत खरेदीपासून भेटीपर्यंत सगळ्या गोष्टी सविस्तर असतात. मात्र, तेच लग्नानंतर काही ना काही कारणावरून वादविवाद सुरू होतात. आधीच्या काळात मुलींचा अतिशय छळ करून हुंडाबळीसारखी प्रकरणं घडत असायची. कायद्यात अनेक सुधारणा आल्या. मुलींसाठी, महिलांसाठी. इतके काही सहकार्यपूर्ण गोष्टी कायद्यात आल्या की, महिलांना होणारे घरगुती हिंसाचाराचे प्रमाण बरेच कमी झाले. मात्र, बदलती जीवनशैली, अवाजवी अपेक्षा यामुळे जोडीदारांसोबत खटके होऊ नयेत, आपणही कमावतो याचे कुठेतरी वर्चस्व गाजवणे आणि या छोट्या-छोट्या गोष्टींमधून लगेच वेगळ्या होण्याच्या गोष्टी करणे या व्हायला लागल्यात.
एकंदरीत आज मुलं-मुली स्वाभिमानी झाले आहेत. त्यामुळे त्यांना डिव्होेर्स घेऊन वेगळे होणं काही विशेष वाटत नाही पण या विवाहादरम्यान कधीकधी काही जोडप्यांना मुलं झालेली असतात. खेळण्या-कुदण्याच्या-बागडण्याच्या वयात त्यांना कोर्टकचेरीची पायरी चढवणे, हे अगदी विदारक आहे. या लेकरांचे मासूम चेहरे बघून अतिशय वाईट वाटतं. तुम्ही डिव्होर्स घेऊन दुसरा विवाह कराल, पण त्या लेकरांना दुसरी आई किंवा दुसरा बाप ते प्रेम देऊच नाही शकत, जे त्याचे सख्खे आई-वडील त्याला देऊ शकणार आहेत.
मुलांना अगदी लहानपणापासून तर मोठे होण्यापर्यंत त्यांच्या आई-बाबांची खूप गरज असते आणि ते आई-बाबांचं कर्तव्यदेखील असत.
कुठेतरी आई-बाबांच्या वेगळ्या उन्हाचा परिणाम बालमनावर होतो आणि आपोआपच त्याचादेखील विवाहसंस्थेवरून विश्वास उडायला लागतो. ते संबंध हे खरंच प्रेम जिव्हाळा देतात का, हा प्रश्न त्यांना पडतो. राग इतका टोकाचा की लेकराचाही विचार नाही..? भांडणाचा हा प्रकार तरी ठीक की, तुम्ही रुसतायेत, रागावता, वेगळे होत आहे. मात्र, त्या भांडणापोटी तुम्ही जर जीव देतायेत तर तुम्ही आई म्हणून आपल्या बाळाचे कर्तव्य विसरला आहात. तुमच्या नात्यातल्या भांडणांसाठी तुम्ही एका लहानशा लेकराचा विचार न करता जातायेत. त्या लेकराला नंतर दुसरी आई ते प्रेम देऊ शकणार आहे का किंवा दुसरे नातेवाईक ते प्रेम देऊ शकणार आहेत का, याचा कधी विचार केला आहे का? मला मान्य आहे काही विवाहांमध्ये खरंच खूप दोष असतो. काहींना खरंच खूप जाच असतो. मात्र, पूर्वीच्या काळी महिला या मोठ्या परिवारात अनेक प्रकारचा त्रास सहन करूनदेखील आपला संसार सांभाळत असत. आपल्या मुलांना घडवत असत. त्यांचे उदाहरण आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवले तर कदाचित आपल्या संसारातील काही कोडी सुटायला मदत होईल.
आधीच्या काळी परिवार एकत्र असायचा. त्यामुळे आई, बाबा सोबत असायचे, पण आताच्या काळी सून-मुलगा वेगळे राहतात म्हणून अनेक मातांना असे वाटते की, ते अगदी स्वतंत्र आयुष्य जगताय. त्यांना कुठलाही धाक नाही म्हणून ते ह्यांना त्या कारणावरून दोघांमध्ये वाद होतील अशा गोष्टी करत असतात. प्रत्येकाचा संसार आहे आणि तो कसा सांभाळायचा याचं त्या मुला-मुलींना नक्कीच माहीत असतं आणि या नात्याच्या कारणावरून वाढलेला हा हस्तक्षेप कधीकधी लग्न मोडायला कारणीभूत ठरतो. काही संसारामध्ये हुंडाबळीसारख्या अवाजवी अपेक्षांचे प्रकार असतो. तिथे जर तुम्हाला शारीरिक त्रास दिला जात असेल त्यावेळी तुम्ही कायद्याची मदत घेऊन नक्कीच आपल्या मुलाच्या आणि आपले संरक्षण करू शकता. सोशल मीडियामुळे मुलं-मुली आपलं आयुष्य अगदी मोकळेपणाने अगदी अनोळखी व्यक्तीसोबत जगण्याचा प्रयत्न करू लागले आणि यातून या-ना-त्यामार्गे विवाहबाह्य संबंध निर्माण व्हायला लागले. त्यातून होणारी तेढ आणि संसाराची होळी ही त्यांना वेळ निघून गेल्यावर समजते.
लग्न झाले म्हणजे तुमचे फक्त त्या नवर्‍यापुरतेच नाते मर्यादित नाही राहत, तर तुम्हीही कुणाच्यातरी अगदी जवळच्या आहात. मुलांसाठी, आपल्या पालकांसाठी तो क्षण किती दुःखदायक असतो जेव्हा ते आपली मुलगी गमावतात, याचाही विचार महिलांनी करायला हवा. कुठल्या विवाहबंधनात जर तुम्हाला पराकोटीचे प्रयत्न करूनदेखील यश मिळत नसेल तेव्हा तुम्ही वेगळे होणे, हे समजू शकतात. मात्र, रागात येऊन टोकाचे पाऊल उचलून आपला जीव गमावणे आणि मुलांना आयुष्यभर परके करणे हा चुकीचा पर्याय कुठल्याही समस्येवरचा उपाय असू शकत नाही. शेवटी संसार म्हणजे दोन गाडीची चाकं. कधी मी मागे होईल, तर कधी तू पुढे हो. कधी रुसणार, कधी हसणार, पण या चाकांशिवाय गाडी पुढे नाही जाणार!

What’s wrong with the children?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *