गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. अमेरिकेबरोबरच इतर देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न करून पाहिले. मात्र, अजूनही दोघांमधील युद्ध सुरूच आहे. त्याचबरोबर इस्रायल-पॅलेस्टाइन या पारंपरिक शत्रूंची लढाईदेखील दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. दोघांमधील युद्ध गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. याला पार्श्वभूमी आहे, ती 2023 मधे पॅलेस्टाइनच्या ’हमास’ या संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची आणि प्रत्युत्तरादाखल इस्रायलने केलेल्या कृत्याचे.
हमास आणि मोसाद या पॅलेस्टाइन आणि इस्रायलमधील दोन दहशतवादी संघटना, यांच्यामधील हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत असतात. गाझा पट्टी कायमच हिंसाचारग्रस्त बनली आहे. यात आता इस्रायल-इराण यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही देश एकमेकांना सर्व नाशाची धमकी देत आहेत. इस्रायलला प्रत्युत्तर देताना इराणदेखील हम भी कुछ कम नहीं हे दाखवून देत आहे. मधल्या काळात भारत-पाकिस्तान यांच्यातदेखील अचानक मर्यादित युद्ध सुरू झाले. मात्र, तितक्याच अनपेक्षितपणे युद्धबंदी झाली. इस्रायलला महाशक्ती अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा आहे. नव्हे, अमेरिकेमुळेच इस्रायलची निर्मिती झाली, हे वास्तव आहे.
यानिमित्ताने जग दोन गटांत विभागले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अमेरिका, फ्रान्स यांसारखे पश्चिमी राष्ट्र इस्रायलच्या बाजूने, तर अरब राष्ट्र, रशिया, चीन यांसारखे राष्ट्र इराणच्या बाजूने उभे राहिले आहेत. या सगळ्यांत कधीकाळी निरपेक्ष गटाचे नेतृत्व करणार्या भारताची मात्र मोठी कोंडी झाली आहे. इराण, अरब राष्ट्र, रशिया हे आपले पारंपरिक मित्र. इराणकडून भारताला तेलपुरवठा होतो, तर इस्रायलबरोबर आपले चांगले व्यापारी संबंध आहेत. या दोघांमध्ये कोणाची बाजू घेणे या पेचात भारताची कसोटी लागणार आहे. या भागात सुमारे एक ते दीड कोटी भारतीय राहतात.
गेल्या काही वर्षांपासून भारताचा झुकाव अमेरिकेच्या बाजूने होत आहे. मात्र, त्याचा फायदा होत आहे की तोटा होतो आहे, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून रशियासारखा आपला पारंपरिक सच्चा मित्र भारतापासून दुरावत चालला आहे. काही काळापासून भारत रशियाकडून स्वस्त कच्चे तेल घेत होता. मात्र, आता अमेरिकेच्या दबावामुळेच मार्चपासून तेल घेणे बंद केले आहे आणि अमेरिका भारताला आयात -निर्यातीचा समतोल राखण्यासाठी तेल तसेच विविध शस्त्र, वस्तू घेण्याची सक्ती करत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर तर अमेरिकेच्या प्रभावाखाली भारत निर्णय घेत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तानच्या बाजूने काही देश उघडपणे, तर काही देश अप्रत्यक्षपणे उभे राहिले. त्यावेळी भारताला तालिबान, इस्रायल उभे राहिले. मात्र, तेदेखील हातचे राखून. याच काळात भारताचा विरोध डावलून आंतरराष्ट्रीय नाणे निधी, संयुक्त राष्ट्रसंघ यांनी पाकिस्तानला कर्ज दिले. एवढेच नव्हे, तर दहशतवादाविरोधात लढणार्या समितीचे उपाध्यक्ष, तालिबानबाबत प्रतिबंध समितीचे अध्यक्षपद बहाल केले. एवढेच नव्हे, तर अमेरिकने पाकिस्तानचे सेनाप्रमुख मुनीर यांना स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. आपला पारंपरिक सच्चा मित्र रशियाने पाकिस्तानबरोबर करार केला. चीन तर आपला कधीही मित्र नव्हता. मात्र, तरीदेखील आपण चीनबरोबर सर्वाधिक व्यापार करत आहोत. 59 जणांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभर फिरले. तेहतीस देशांत भेटी दिल्या. मात्र, नेमके पदरात काय पडले? हा प्रश्नच आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 80 परदेशी दौरे करत 70-72 देशांना भेटले. सर्वाधिक दहा वेळा अमेरिका, सहा वेळा चीनचा दौरा केला. अनेकदा रशियाला गेले. मात्र, ऐनवेळी भारताच्या बाजूने कोणी उभे राहिले नाही, हे वास्तव आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर हे तर पूर्ण अपयशी ठरले आहेत. कधीकाळी भारत हा निरपेक्ष गटाचा नेतृत्व करत होता, जगात मान होता. मात्र, आता तसा मानसन्मान, पाठिंबा मिळत नाही, हे वास्तव आहे. गेल्या काही वर्षांपासून अशिया खंडात भारत एकटा पडू लागला आहे. जवळपास सर्वच शेजारील देशांशी भारताचे सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत. नेपाळ, भूतान, बांगलादेश यांसारखे देश भारतापासून दुरावत चालले आहेत. शत्रूच्या संख्येत भरच पडत आहे. जगातूनदेखील भारताची खुल्या मनाने पाठराखण केली जात नाही. अमेरिकेच्या नादाला लागून आपण आपला पारंपरिक सच्चा मित्र रशियाला दुखावत आहोत का, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांपासून आपले परराष्ट्र धोरण कुठेतरी चुकते आहे का, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. केवळ आभासी चित्र रंगवत आपल्याच विश्वात रममाण होऊन चालणार नाही, तर वास्तव स्वीकारावेच लागेल. आजवर बलाढ्य शक्ती केवळ शस्त्रास्त्रांचा व्यापार करत जगाला झुंझवत आहेत आणि तूदेखील दुसर्यांच्या धर्तीवर हा इतिहास आहे. अमेरिकेने व्हिएतनाममध्ये वीस वर्षे युद्ध लढले. मात्र, अखेर अमेरिकेला माघार घ्यावी लागली. असेच अफगाणिस्तानमधील तालीबानींबाबत घडले. इराण-इस्रायलच्या निमित्ताने तेच चालू आहे. मात्र, यानिमित्ताने जगावर तिसर्या महायुद्धाचे सावट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत चालले आहे. मात्र, कुठलाही परिस्थितीत युद्ध टाळले गेले पाहिजे. युद्ध कोणालाच नको आहे. युद्धाने केवळ नुकसानच होते आणि आजकाल नुकसान कोणालाही परवडणारे नाही. जगाबरोबरच भारतासाठीदेखील हा कसोटीचा आणि तितकाच कठीण काळ आहे.
अनंत बोरसे
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…