नाशिक प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून आज जिल्हयात एकाचवेळी घेण्यात आलेल्या स्पेलिंग स्पर्धेत एकाचवेळी ११२२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सर्वाधिक विद्यार्थी सहभागासाठीचा विक्रम नोंदवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान प्राप्त केले आहे. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची दोन्ही रेकॉर्डसमध्ये नोंद घेण्यात आली असून आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानपदक देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आज जिल्हयातील सर्व १५ तालुकयात स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धत सहभाग घेतला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्कडून स्पेलिंग स्पर्धेत सहभागी झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा विक्रम निश्चित करण्यात आला. या अभिनव स्पर्धेत जिल्हयातील ११२२० विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला. आतापर्यतचा एकाचवेळी स्पर्धेत सहभागी होण्याचा हा पहिलाच उपक्रम ठरला असून या उपक्रमांची बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्कडून नोंद घेण्यात आली आहे.
गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आलेल्या नाशिक तालुक्याच्या स्पर्धत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्कडच्या परिक्षक डॉ. चित्रा जैन यांनी जिल्हा परिषदेने हा विक्रम केल्याची घोषणा करत जिल्हा परिषदेला दोन्ही संस्थाकंडून विक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानपदक देऊन सन्मानित केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, गटविकास अधिकारी सोनिया नाकोडा यांनी प्रमाणपत्र स्विकारले. यावेळी आदिवासी विकास आयुक्त डॉ. नयना गुंडे उपस्थित होत्या.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची स्पर्धा आयेाजित करण्यात आली. सकाळी ११ वाजता एकाचवेळी झालेल्या या स्पर्धेत जिल्हयातील ११२२० विद्यार्थी सहभागी झाले . एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड नुसार कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आणि निकष जारी केले असून जिल्हा परिषद, नाशिक ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यास पात्र ठरली होती.
स्पेलिंग टेस्टची वेळ सकाळी ११ ते १२ अशी ठेवण्यात आली यासाठी ५० शब्दांचे लेखन विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरसूचित करावयाचे होते. एका शब्दाचा उच्चार तीन वेळा करण्यात आला. लक्षपूर्वक ऐकुण उत्तरसूचीत शब्द लेखन करण्यात आले. या स्पर्धेचे सर्व ठिकाणी व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले आहे. गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आलेल्या नाशिक तालुक्याच्या स्पर्धेसाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील. गट शिक्षण अधिकारी मीता चौधरी, उपशिक्षण अधिकारी धनंजय कोळी, विस्तार अधिकारी संतोष झोले, निलेश पाटोळे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेज शेख यांनी केले.
जागतिक विक्रमात नोंद होणे ही अभिमानास्पद बाब
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी आतापर्यत विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. मात्र आज जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचा जागतिक दर्जाच्या एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच भारतामधील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ेे एकाचवेळी विक्रम प्रस्थापित करण्याची पहिली वेळ आहे. नाशिक जिल्हा परिषद तसेच नाशिक जिल्हयासाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे.
– आशिमा मित्तल