नाशिक

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन

नाशिक ः प्रतिनिधी
शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. बदललेल्या वातावरणामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली आहे. दरम्यान, मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांंना नांगरणी, वखरणी आदी शेती मशागतीसाठी उसंत मिळत नव्हती. यातच मॉन्सून लांबणार असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, सातत्यपूर्ण पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी आले असून, विहिरींनाही पाणी आल्याने शेतकर्‍यांंनी खरिपाची पूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यात सहा लाख 44 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे. ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे मशागत खोळंबलेली असली, तरी जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पेरणीला सुरुवात होईल, असा अंदाज आहे. यंदा एकूण सहा लाख 28 हजार हेक्टरवर तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य व कपाशी या नगदी पिकांची लागवड व पेरणी होणार आहे.
भुईमुगाचे क्षेत्र घटणार
तूर, मूग, बाजरी, नागली, उडीद, भुईमुगाचे क्षेत्र घटणार आहे. जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, चांदवड, सिन्नर, देवळा या भागांत कपाशीचे पीक घेतले जाते. कपाशीच्या 38 हजार हेक्टरपैकी 599 हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. पहिले पीक घेतल्यानंतर लागलीच लाल कांद्याची लागवड होते. गेल्या वर्षी लाल कांद्याची 80 हजार हेक्टरवर लागवड झाली होती. यंदाही त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

मका, सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

जिल्ह्यात यंदा मका, सोयाबीन व भाताचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. नागली, बाजरी, ज्वारी या तृणधान्यासह तूर, मूग, उडीद, भुईमूग, कारळे या कडधान्यांच्या पेरणीत घट होण्याची शक्यता आहे. भाताचे सर्वसाधारण क्षेत्र 93 हजार 934 हेक्टर आहे. त्यांपैकी 17 हजार हेक्टरवर त्याची आवणी होईल. जिल्ह्यात सोयाबीनचे 26 हजार 276 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापेक्षा जास्त पेरणी होऊ शकते. मक्याची 43 हजार 889 हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

यंदा बिगरमोसमी पावसाने खरीप हंगामाचे नियोजन बिघडवले असल्याने खरीप पेरणी करावी की नाही, या द्विधा मन:स्थितीत शेतकरी सध्या आहेत. मात्र, शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभाग व कृषितज्ज्ञांनी दिला आहे. अन्यथा, जून किंवा जुलैमध्ये पावसाने उघडीप दिल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते. तसेच शेतकरी खरीप पेरणीसाठी बी-बियाणे, खतांची तजवीज करीत आहेत. बी-बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे, खरेदीची पक्की पावती घ्यावी, बॅगवर छापील किमतीतच बी-बियाणे, खते खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खते, बियाण्यांचा साठा मुबलक

खरिपाच्या पेरणीसाठी खासगी व शासकीय कंपन्यांकडील एक लाख 21 हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. अडीच लाख टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यांपैकी एक लाख 9 हजार 567 टन खते सध्या दुकानदारांकडे शिल्लक आहेत. यात डीएपी, एमओपी, एनपीकेएस, युरिया आदींचा समावेश आहे. युरिया व डीएपी या खतांची संभाव्य मागणी विचारात घेऊन त्यांचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

16 भरारी पथकांची नियुक्ती

बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून महाराष्ट्रात गुजरात व मध्य प्रदेशातून बनावट बियाणे दाखल होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने कृषी विभागाने 16 भरारी
पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण संपर्क क्रमांक 0253-2504042 व 7821032408 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर शेतकरी आपली तक्रार नोंदवू शकतील. खतांचे लिंकिंग करणार्‍या विक्रेत्यांविरोधात या ठिकाणी तक्रार नोंदविता येईल.

अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे खरीपपूर्व मशागती खोळंबल्या आहेत. त्यामुळे मशागत न करता वापसा निघाल्याशिवाय पेरण्या करू नये. शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये.
– संजय शेवाळे, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

Gavkari Admin

Recent Posts

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

3 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

3 hours ago

सणांचा, व्रतवैकल्यांचा महिना श्रावण

श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…

3 hours ago

शाही थाटात चमका- लेहंग्यांचे ग्लॅमरस अवतार

लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…

3 hours ago

फाउंडेशन आधी की कन्सीलर?

परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ,…

4 hours ago