तीस वर्षे पूर्ण करणारी योजना युटीआय फ्लेक्झी कॅप फंड

युटीआय म्युच्युअल फंड हा देशातला सर्वांत जुना फंड असल्याने या फंडाकडे ज्या योजना आहेत, त्यापैकी काही योजना या उद्योगातल्या सर्वांत जुन्या योजना आहेत. पहिला क्रमांक युटीआय युलीप- 1 ऑक्टोबर 1971, 51 वर्षे पूर्ण, युटीआय मास्टर शेअर-15 ऑक्टोबर 1986, 35 वर्षे पूणर्र् आणि तिसरी योजना युटीआय फ्लेक्झी कॅप फंड- 30 वर्षे पूर्ण.
प्रत्येक योजनेत बदल झाले. ते बदल वेगवेगळ्या कारणांमुळे करावे लागले. परंतु, तरीसुद्धा ते बदल पचवून योजनेचा प्रवास चालू राहिला. युटीआय फ्लेक्झी कॅप फंड या योजनेची कामगिरी खालीलप्रमाणे आहे.
निव्वळ मालमत्ता मूल्य भांडवलवृद्धी पर्याय 239.50 रु. व्यवस्थापनासाठी असलेली मालमत्ता 24899 कोटी रु. योजनेची भांडवलवृद्धी मागील एक वर्ष 11.2%, मागील तीन वर्षे 18.5% आणि मागील पाच वर्षे 15.7%. योजनेकडे एकूण गुंतवणूकदार खाती 1826193 असून, 31 मार्च 2022 या दिवशी जर वेगवेगळ्या क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक आहे ही आकडेवारी जर बघितली तर 25% वित्तीय सेवा देणार्‍या कंपन्या, 16% इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ग्राहकोपयोगी उत्पादने 13%, इतर 12%, ग्राहक सेवा 10%, औषध उद्योग 9%, औद्योगिक उत्पादन 6%, वाहन उद्योग 5%, रोकड मालमत्ता 3% अशाप्रकारे गुंतवणूक विभागणी आहे. योजनेची निवड करताना गुंतवणूकदाराने ही आकडेवारी बघितली पाहिजे.
यानंतर योजनेच्या कामगिरीचा परामर्श घेताना कोणत्या निर्देशांकाशी तुलना करायची हे माहितीपत्रकात नमूद करावे लागते. निफ्टी 50 आणि निफ्टी 500 हे दोन निर्देशांक योजनेच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी वापरले जातात.
निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी किंवा खराब कामगिरी अशी नेमकी आकडेवारी दिल्यानंतर मग योजनेच्या व्यवस्थापकाने त्याचा स्वत:चा गुंतवणूकविषयक दृष्टिकोन स्पष्ट केलेला असतो, तो दृष्टिकोन काय आहे हेसुद्धा गुंतवणूकदाराला समजले पाहिजे.
निर्देशांकात प्रत्येक कंपनीचे स्थान किती आहे त्यानुसार गुंतवणूक केली तर मग तो पॅसिव्ह फंड होतो. पॅसिव्ह फंड असेल तर योजनेच्या व्यवस्थापकाला गुंतवणूक स्वातंत्र्य नसते. ऍक्टिव्ह फंड्स चांगले की पॅसिव्ह हा नेहमीच जगातल्या बाजारात वादाचा विषय राहिलेला आहे. छोट्या गुंतवणूकदारांनी या वादात पडू नये हे उत्तम. कारण निर्देशांक हासुद्धा एकप्रकारे एक फंडच असतो. मग संवेदनशील निर्देशांक म्हणजे मुंबई शेअर बाजाराचा फंड तर निफ्टी म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजाराचा फंड असे म्हणता येईल. म्हणून योजनेची कामगिरी निर्देशांकापेक्षा कमी-जास्त आहे, पाच स्टार, चार स्टार किंवा तीन स्टार अशा तारांकित मानचिन्ह असलेल्या योजनांमध्येच गुंतवणूक करायची अशी विचारसरणीसुद्धा चुकीची ठरते. तारांकित चिन्हे मागील कामगिरीचा अभ्यास करून दिली जातात. आणि त्यावर विसंबून राहून आज गुंतवणूक करायची, याच्याइतका वेडेपणा या क्षेत्रात दुसरा कुठलाही नसेल.
कामगिरीचे मोजमाप करताना एकाच प्रकारातल्या इतर म्युच्युअल फंडांच्या योजना तुलनात्मक परामर्श घेताना योजनेचे वय आणि योजनेची मालमत्ता इकडे लक्ष दिलेे जात नाही. एखादी योजना व्यवस्थापन करण्यासाठी मालमत्ता कमी आहे म्हणून चांगली कामगिरी दाखवत असली तरी त्या कामगिरीला फारसे महत्त्व देऊ नये. योजनेचे वय जास्त असेल तर बाजारातले चढ-उतार या योजनेने पचवलेले आहेत, असा अर्थ काढता येतो. तुलना करायचीच असेल तर फक्त लार्ज कॅप फंड्स योजनांची करावी. कारण फ्लेक्झी कॅपमध्ये लार्ज ऍण्ड मिड ऍण्ड स्मॉल अशा तिन्ही प्रकारात गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक किती टक्के आहे, त्यावरूनसुद्धा योजनेच्या कामगिरीत चढ-उतार होतात. युटीआय फ्लेक्झी कॅप फंड या योजनेत माहितीपत्रकात हीसुद्धा तुलना दिलेली आहे.
फंड फंड बेंचमार्क
लार्ज 66% 77%
मिड 25% 15%
स्मॉल 09% 06%
ही टक्केवारी कशी समजून घ्यायची, त्यालाही काही अर्थ आहे. परदेशी गुंतवणूक संस्था शक्यतो अपवाद वगळता स्मॉल कॅपकडे जात नाहीत आणि गेले काही महिने या संस्था लार्ज कॅपमधून बाहेर पडलेल्या आहेत. अशा वेळेस बेंचमार्कपेक्षा लार्ज कॅपकडे 11% कमी गुंतवणूक करणे हे फंडाच्या व्यवस्थापकाला करता आले तो निर्णय योग्य ठरला. मिड कॅपमध्ये 10% जास्त आणि स्मॉल कॅपमध्ये 1% जास्त हा निर्णयसुद्धा सध्याच्या परिस्थितीत योग्य वाटतो. आणखी खोलात शिरून माहिती घ्यायची ठरवले तर निर्देशांकात कंपनीचे जे स्थान आहे त्यापेक्षा जास्त गुंतवणूक लार्सन, इन्फोटेक, बजाज फायनान्स, माईंड ट्री, अव्हेन्यू सुपर मार्ट, को. फोर्ज या कंपन्यांत आहे, तर रिलायन्स, टीसीएस, आयटीसी, एल ऍण्ड टी, ऍक्सिस बँक या कंपन्यांमध्ये निर्देशांकाच्या तुलनेने कमी गुंतवणूक आहे.
वरील सर्व तांत्रिक विश्‍लेषण बाजूला ठेवून आता माहितीपत्रकात नसलेल्या परंतु माहीत असलेल्या अशा काही घटना विचारात घेऊ. 30 वर्षांपूर्वीचा हा कालावधी विचारात घ्यायचा ठरवला तर हा कालखंड हर्षद मेहताचा उदय आणि अस्त झालेला कालखंड होता. डिसेंबर 1991 मध्ये मास्टर प्लस योजना आणल्यानंतर मे 1992 मध्ये मास्टर गेन योजना आणण्याची खरोखर आवश्यकता होती का? या प्रश्‍नाला 1992 ते 1996 हे चार वर्षे उत्तर मिळाले नव्हते. योजनेकडे या कालावधीत गुंतवणूकदारांनी रांगा लावून पैसे भरले. 62 लाख अर्ज हा विक्रम आजपर्यंत कोणालाही मोडता आला नाही. परंतु, हा विक्रम आणि सहा साडेसहा हजार कोटी रु. भरणा हेच या योजनेला त्रासदायक ठरले. योजना सात वर्षांची क्लोज एंडेड योजना बाजारात युनिटची नोंदणी असलेली योजना असे स्वरूप होते. दहा रुपये दर्शनी किमतीचे युनिट बाजारात पाच रु.ला विकले जाऊ लागले. योजनेचे रजिस्ट्रार डाटा मॅटिक्स यांची तारांबळ उडाली. युनिट योजना-64, मास्टर शेअर या योजनांनी गुंतवणूकदारांना लाभांशाची चटक लावली होती. त्यामुळे पहिली चार वर्षे लाभांश नाही आणि भांडवलवृद्धी सुद्धा नाही, त्यामुळे या योजनेला मास्टर गेन म्हणायचे की मास्टर पेन म्हणायचे, असा प्रश्‍न पडला. यामुळे 1996 साली दहा रु.चे 14.47 रु. झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी योजनेतून पैसे काढून घेणे किंवा युनिट योजना 64 मास्टर शेअर या योजनांकडे पैसे वळवले. योजनेच्या नावात नंतर बदल करण्यात आला. इक्विटी फंड हे नाव झाले. परंतु योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य आणि त्यासमोर अत्यंत कमी लाभांश वाटप ते इतके कमी की उत्पन्न दर 3% सुद्धा मिळत नव्हता.
उदा. 2018 ला 112 रु. निव्वळ मालमत्ता मूल्य असताना 3.30 रु. लाभांश वाटप तर 171 रु. निव्वळ मालमत्ता मूल्य असताना फक्त 4.50 रु. लाभांश वाटप यामुळे नवीन गुंतवणूकदार येत नव्हता आणि जुना गुंतवणूकदार बाहेर पडू लागला होता. परंतु, योजनेच्या कामगिरीमध्ये फरक पडण्यास सुरुवात झाली होती. आणि हा फरक या क्षेत्रात काम करणार्‍या म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटर्सना सुद्धा फार उशिरा कळला. या सर्वांचा एकत्रित परिणाम आज या योजनेने या क्षेत्रात मानाचे स्थान मिळविले आहे.

शेअर बाजार : प्रमोद पुराणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *