आज भाद्रपद शुक्ल पंचमी (ऋषिपंचमी) अर्थात, शास्त्राप्रमाणे सप्तऋषींच्या पूजनाचा दिन. तद्वतच ऋषितुल्य समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथीचा दुहेरी योग. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, श्री गजानन माउलींच्या कृपाशीर्वादाने 115 वर्षांनंतर तोच दिवस त्याच तिथीनुसार ऋषीपंचमी महोत्सव दि. 28 ऑगस्ट 2025 ला भाद्रपद शुक्ल पंचमी, वार गुरुवार हा अद्भुत योग घडून आला आहे. आजपासून 115 वर्षे आधी दि. 28 ऑगस्ट 1910, गुरुवारी शेगावी संत गजानन स्वामी समाधिस्थ झाले होते.
ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी, मरगळ येते आणि अनीतीचा मार्ग अवलंबिला जातो. नाना प्रकारच्या यातनेने लोक गांजलेले असतात, तेव्हा साक्षात ईश्वर कुठल्याही योनीवाचून भूतलावर प्रकट झाले आहेत. जसे की गोरक्षनाथ जन्मले उकिरड्यात, कानिफनाथ जन्मले गजकर्णात त्याचप्रमाणे संत गजानन स्वामी शेगावात. उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचताना प्रकट झाले. संत अवताराचे मुख्य प्रयोजन म्हणजे भूतलावरील लोकांना सात्त्विक भावाने मार्गदर्शन करणे होय. संत आपले ज्ञान, अनुभव लोकांशी वाटून घेतात. त्यामुळे लोकांना जीवनाचा खरा अर्थ समजायला लागतो, हे कळल्यानंतर ते सदमार्गाचे धनी बनतात. नैतिक आणि आध्यात्मिक मार्गावर ज्यावेळेस समाज पदक्रमण करतो तेव्हा सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय राहत नाही. नेमके हेच कार्य संत करीत आले आहेत व त्यांच्या पश्चात असेच पुढे चालत राहावे याकरिता संतांनी आपली बोधवचने समाजाला दिली आहेत. त्यांनी घालून दिलेल्या शिकवणीच्या मार्गावर चालणे हीच खरी संतसेवा ठरते.
श्री दासगणू महाराजांनी गजानन स्वामींनी दिलेल्या बोधवचनांचे सखोल चिंतन विश्लेषणपूर्वक श्री गजानन विजय ग्रंथात केले आहे. एकवीस अध्यायांचा विजय ग्रंथ हा केवळ संतचरित्र नव्हे, तर प्रत्येक अध्यायाद्वारे चिंतन, मननातून मानवी मनास बोध होतो. शिवाय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात महाराज उष्टया पत्रावळीतील शिते वेचून खात आहेत, हे महाराजांची आद्यकृती आहे. त्यातून अन्नाची नासाडी करू नये, हा बोध होतो. दुसर्या अध्यायातून कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर यांना उपदेश करतात की, बोलण्यात आणि वागण्यात ताळमेळ असावा. तिसर्या अध्यायातून माळी विठोबा घाटोळांची दांभिकता पाहून त्यास मार देतात आणि सांगतात की, प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे फळ मिळते. चौथ्या अध्यायात महाराज म्हणतात की, प्रपंच करताना परमार्थसुद्धा करावा.
परमार्थ महाधन। जोडी देवाचे चरण॥ असे संत वचन आहे. पाचव्या अध्यायात गजानन स्वामींनी योग बळाच्या आधारे भास्कर पाटलांच्या बारा वर्षांपासून कोरड्या पडलेल्या विहिरीला जल उत्पन्न करतात. सहाव्या अध्यायात मधमाशा भक्तांवर जेव्हा हल्ला चढतात तेव्हा सांगतात की, संकटे आल्यावर ईश्वराची भक्ती तुम्हाला तारून नेईल. सातव्या अध्यायात खंडू पाटील आजारी असताना उपदेश करतात की, पैसा हे सर्वस्व नाही. परमेश्वराची कृपा आणि आशीर्वादही तेवढेच महत्त्वाचे आहेत. आशीर्वादामुळे सगळे प्राप्त होते. आठव्या अध्यायात खंडू पाटलांना सांगतात की, कर्त्या पुरुषांना संसारात बर्याच अडचणींचा सामना करावा लागतो. तेव्हा डगमगून कधी जाऊ नये, तर ब्रह्मगिरी गोसावी यांचे गर्वहरणसुद्धा करतात.
नवव्या अध्यायात ’गण गण गणात बोते’ या सिद्ध मंत्राचा अर्थ विस्ताराने सांगितला आहे. जीव आणि ब्रह्म एकच आहे, हा महत्त्वाचा उपदेश सांगितला. दहाव्या अध्यायात गजानन स्वामींनी सुखलालाची द्वाड गाय शांत केली व सांगितले की प्राणिमात्रांविषयी भूतदया पाळावी. इतरांप्रति ईर्षा कधी करू नये. पुढे अकराव्या अध्यायात संचित, क्रियामान आणि प्रारब्ध या कर्मानेच फळ भोगावे लागते. याचे वर्णनसुद्धा केलेले आहे. बाराव्या अध्यायात बच्चुलाल आगरवाल यास धनाचा देखावा करू नये, हा उपदेश दिला. तेराव्या अध्यायात गंगाभारती व पुंडलिक या दोन भक्तांवर आपल्या लीलेद्वारे व्याधीतून मुक्ती दिली. परमेश्वरावर अपार श्रद्धा असलेली व्यक्ती कुठल्याही जर्जर व्याधीतून मुक्त होते, हा बोध पुरेसा आहे. चौदाव्या अध्यायात साक्षात नर्मदामाता बुडत्या नावेतील भक्तांचे रक्षण करते. पंधराव्या अध्यायात अकोल्यातील शिवजयंतीच्या उत्सवात गजानन स्वामींनी लोकमान्य टिळकांचे राष्ट्रप्रेम पाहून शुभाशीर्वाद देतात व पुढे ’लोकमान्य’ म्हणून ते अमर होतात. सोळाव्या अध्यायात भाऊ कंवरांच्या नैवेद्याची प्रतीक्षा करून गजानन स्वामींची भक्त वात्सल्यता दिसून येते. सतराव्या अध्यायात सर्वधर्म-समभावाची शिकवण दिली आहे. अठराव्या अध्यायात काळे या भक्ताला परमेश्वराविषयी तीव्र अशी ओढ होती. अशा खर्या भक्तांना भगवंत कोणत्याही रूपात दर्शन देण्यास सज्ज असतात, हा बोध होतो. एकोणिसाव्या अध्यायात बाळाभाऊ या भक्ताला कर्म, भक्ती आणि योग या तिन्ही मागार्ंचे महत्त्व समजावून सांगतात. गजानन स्वामी समाधी घेतल्यानंतर महाराज इथेच राहतील आणि वेळोवेळी भक्तांना दर्शन देतील याची खात्रीसुद्धा देतात.
संत सगुन देहाने इहलोकातून गेले तरी निर्गुणाने आज समाजात वावरत असतात. ते सुप्त शक्तीने सत्कर्मात सदाचारात अपार श्रद्धेतून ते असल्याची प्रचिती येते.
मी गेलो ऐसे मानूं नका।
भक्तित अंतर करुं नका ।
कदा मजलागी विसरुं नका।
मी आहे येथेचं ॥
असे हे संत गजानन स्वामींचे शेवटचे आश्वासित वचन आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…