लोणची बनवताना ही काळजी घ्यावी

लोणच्याची सर्व जिन्नस कैरी, लिंबू, इतर भाज्या ताज्या व करकरीत असाव्यात. स्वच्छ धुवून कोरड्या कराव्या.
मीठ, तिखट मंद आचेवर वेगवेगळे भाजून, गार करून लोणच्यात घालावे.
तेलाची फोडणी पूर्ण गार करावी.
खडा हिंग कुटून तळून वापरावा. स्वाद छान लागतो.
मेथी, मोहरी डाळ ताजी वापरावी, जुनी घेऊ नये,
बरणीला हिंगाची धुरी द्यावी, हिंग पेटून बरणी पालथी घालावी, धूर कोंडला जातो.
चिनी मातीच्या बरणीत लोणचे जास्त टिकते, कारण बाहेरील वातावरणाचा बरणीवर फारसा परिणाम होत नाही.
लोणचे एकाच मोठ्या बरणीत न भरता दोन-तीन मध्यम बरणीत भरावे, एक, दोन, तीन असे स्टिकर्स लावावे, चुकून बरणी फुटली, तडा गेला तर पूर्ण वर्षाचे लोणचे वाया जात नाही.
लोणचे काढल्यावर तेल कमी वाटले तर तेल घेऊन तापवावे, गार झाल्यावर परत लोणच्यात घालावे, तेलाची पातळी योग्य असावी म्हणजे तेल थोडे जास्त झाले तर चालेल, पण कमी नको.
लोणचे शक्यतो सकाळी घालावे.
मेथी जास्त झाली तर लोणचे चिकट होते. मोहरी जास्त झाली तर कडवट होते आणि हिंग जास्त झाला तर तिखट व उग्र होते.
लोणची मधून मधून ढवळून तेलाचा थर व मीठ पहावे.
लोणच्याला दादरा बांधल्यावर नाडीऐवजी इलेस्टिक वापरावे.
काही गृहिणी मसाल्यात एक टेबलं स्पून साखर घालतात, त्यामुळे लोणचे आंबट होत नाही.
– मीनल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *