फरार तीन जण जेरबंद

भावली पर्यटक मारहाण प्रकरण : सर्व संशयितांची धिंड

इगतपुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांना मारहाण करून फरार झालेल्या तीन मुख्य संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कैलास भागडे, आकाश भोईर व तुषार कडू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भावली परिसरात रविवारी (दि. 12) पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबाचा 15 ते 20 किलोमीटर पाठलाग करून मारहाण करण्यात आली होती. यातील 9 आरोपींना आधीच अटक झाली होती, तर तीन मुख्य आरोपी फरार होते. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप आणि गुन्हे शाखेचे राहुल मोरे यांनी नाकाबंदी करत शोधमोहीम राबवली होती. अखेर गुन्ह्यातील मोटरसायकलसह फिरणार्‍या या तिघांना मुंढेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
सर्व 12 आरोपींची गुरुवारी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर, कायदा व सुव्यवस्थेचा वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी सर्व संशयितांची इगतपुरी शहरातून तोंड झाकून धिंड काढली. नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक घनश्याम बळप आणि पथकाने केलेल्या या कडक कारवाईचे इगतपुरीकरांनी कौतुक केले आहे.

Three fugitives apprehended

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *